रात्रीच्या वीज पुरवठ्यामुळे आणखी एक बळी; गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत, महावितरणाविरोधात संताप

59

🔸दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, शेतकऱ्यांमधून केली जात आहे मागणी

✒️बीड, जिल्हा प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19नोव्हेंबर):-महावितरणाकडून शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पिकांना पाणी देण्यासाठी त्यांना रात्रीचा दिवस करावा लागत आहे. अशातच अनेकदा ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावरही बेतत आहे. रात्रीच्या अंधारात वीजेच्या धक्क्याने किंवा सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. मात्र, तरीही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नाही. अशातच आता आणखी एका शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

शेतात रात्री पिकाला पाणी देत असताना तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बीडमधून समोर आली आहे. गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका गावातून ही घटना उघडकीस आली. रामेश्वर भागवतराव लोणकर असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. या घटनेनंतर नागरिकांनी महावितरणाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

शेतासाठी रात्रीची वीज देवून महावितरण किती शेतकऱ्यांचा जीव घेणार? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. महावितरणाकडून शेतीसाठी रात्री वीज पुरवठा केला जात असल्याने ही गोष्ट शेतकऱ्यांच्या जीवावर बेतत आहे. त्यामुळे दिवसाची वीज शेतीसाठी द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

गेवराई तालुक्यातील शेतकऱ्याला रात्री पिकांना पाणी देत असताना सर्पदंश झाला. तात्काळ त्याला औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु दुर्दैवाने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. रात्रीची लाईट बंद करून दिवसा लाईट देण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

परंतु मायबाप सरकार ही मागणी कधी पूर्ण करणार? असा सवाल उपस्थित होत आहे. रात्री पिकांना पाणी द्यावं लागत असल्याने वन्यप्राण्यांचे हल्ले, सर्पदंश, शॉक लागणे अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या असून सरकार याकडे कधी लक्ष देणार? असा सवाल केला जात आहे. आज या घटनेने गेवराई तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.