महागाईचा विस्फोट… सरकार दरबारी नसलेल्या आणि सामान्यांच्या पाचवीला पुजलेला!

20

आपण जगात 21 व्या शतकात वावरत असताना आपल्या भारत देशाने स्वातंत्र्याची पंचाहात्तरी गाठली आहे. दोन हजार बावीस हे साल संपूर्ण देशभरात देशवासीयांतर्फे स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष म्हणून मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले आहे.1947 पासून आपल्या देशाने विविध क्षेत्रात उतुंग आणि अविश्वसनीय अशी झेप घेतली आहे.त्यामध्ये विविध क्षेत्रातील उद्योग असतील,कृषी क्षेत्रातील अमुलाग्र बदल असतील, छोटे उद्योग, मोठे उद्योग या सर्वच क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी केली आहे. भारताने जागतिक उदारमतवादी धोरण स्विकारल्यानंतर भारत एक जागतिक बाजारपेठ बनली आहे.जगातील अनेक विकसित राष्ट्र भारताला आर्थिक चालना देणारी बाजारपेठ म्हणून पाहत आहेत. त्यामुळे भारताने विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. मग अशा विविध आघाड्यांवर यशस्वी होऊन सुद्धा भारतात आजही खुप मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारच्या समस्या आढळून येत आहेत.

त्यातील प्रमुख समस्या म्हणजे वाढती लोकसंख्या, आर्थिक विषमतेची खाई,बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, राजकीय अनागोंदी, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव, मताचे राजकारण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महागाई. महागाईचा प्रश्न सर्वसामान्य लोक, रोजंदारीवर काम करणारे लोक, मध्यमवर्गीय लोक यांच्या रोजच्या जीवन जगण्याशी निगडित आहे. म्हणून भारतातील जवळपास सत्तर टक्के लोकांवर महागाईचा परिणाम पडत आहे.

वरील सर्वच समस्या या ना त्या प्रकारे एकमेकांवर अवलंबून आहेत. आतापर्यंत देशात अनेक सरकारे येऊन गेली आहेत. स्वातंत्र्यानंतर जवळपास पंधरावी लोकसभा नवीन सरकारसह 2024 साली अस्तित्वात येईल. पण आजतागायत एकाही सरकारास महागाईचा प्रश्न सोडवता आला नाही. महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. बकासुरासारखा सर्वसामान्यांना गिळंकृत करत आहे.

आता जी लोकं सत्तरीच्या आसपास आहेत ती सांगतात आमच्या काळत एका रूपयात बराच बाजार येत असत. पाच रूपयामध्ये पिशवीभर बाजार यायचा.पण ती बाब आतामात्र आपणास परिकथेच्या दंतकथेप्रमाणे भासत आहे. खरंच कधी पाच रूपयात पिशवीभर बाजार येत असेल? हो येत होता.हे त्यांचे ठामपणे उत्तर असते.यानंतर चाळीशीच्या घरातील लोक सांगतात आम्ही लहान असताना शंभर रुपये म्हणजे खुप मोठी रक्कम असायची. त्यात आपणास घर किमान आठ पंधरा दिवस चालेल एवढे सामान येत किंवा पंधरा दिवस घर चालवण्यासाठी शे दोनशे रूपये बक्कळ होत असायचे असे ते सांगतात.सध्या खिशात हजार रुपये असले तरी आठ दिवस पुरेसे होतील याचीही शाश्वती नाह. ही महागाई नको नको करत आहे. या महागाईच्या विळख्यातून सुटका कशी होईल याचाच विचार डोक्यात रेंगाळत असतो.

भारतात महागाई वाढण्याची अनेक कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढल्या अथवा कमी झाल्या की त्याचा परिणाम थेट भाजिविक्रेते ते किरकोळ व्यापारी, छोटे मोठे उद्योजक, बसचे भाडे ते खाजगी वाहतूक, प्रवाशी तसेच मालवाहतूक या सर्वावर पडत असतो. हल्ली इंधनाच्या किमती रोज बदलत असतात.त्या ठरवण्याचे अधिकार सरकारने इंधन कंपन्यांना दिले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या की आपल्या देशात इंधनाचे दर हमखास वाढतात त्यामुळे महागाई भरमसाठ वाढते. परंतु आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव जरी कमी झाले तरी आपल्याकडे मात्र इंधनाचे दर कमी होत नाहीत. मग वाढलेली महागाई जशीच्या तशीच राहते.

दुसरे कारण असे सांगता येईल की साठेबाजारी करून सुद्धा व्यापारी लोक तात्काळ महागाई सदृश परिस्थिती निर्माण करू शकतात.असे साधारणतः खाद्यपदार्थ आणि किरकोळ घाऊक सामानाच्या बाबतीत केले जाऊ शकते. पण ही महागाई चिरकाल टिकणारी नसते.

भारतात महागाई वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव. आपल्या देशात राजकारण छोट्या छोट्या गोष्टीवरून होते.पण महागाई वरून हल्ली देशातील सत्ताधारी पक्षास काहीच वाटत नाही. ते महागाई देशात आहे हेच मान्य करायला नाहीत. देशाच्या अर्थमंत्री म्हणतात, कांदे महाग झाले तर खाऊ नयेत, महागाई सध्या विरोधात असलेल्या पक्षामुळे वाढत आहे कारण ते पुर्वी सत्तेत होते, इतर देशांच्या तुलनेत महागाई आपल्या देशात नाहीच.अशी वक्तव्ये जबाबदार पदावर असलेल्या व्यक्ती कडून होत असल्यास त्यांना महागाई ही समस्या वाटतच नाही. एकेकाळी कांद्याच्या प्रश्नावरून लोकसभेत रणकंदन माजले होते आणि केंद्रातले सरकार कोसळण्याच्या मार्गावर होते. पण आजघडीला महागाई वाढली आहे हेच सरकार आणि सत्ति पक्षातील लोक मान्य करायला तयार नाहीत.

2014 नंतर करप्रणाली धोरणामध्ये भारत सरकारने बदल केला असून एक देश एक कर अशी नवीन प्रणाली जिएसटीच्या रूपाने आणली आहे. पण याचा फायदा जनतेला कमी भारत सरकारला मोठ्या प्रमाणावर होतो आहे. जिएसटीच्या नावाखाली व्यापारी आणि सरकारने वस्तुच्या भरमसाठ किमती वाढवल्या आहेत. त्यामुळे जिएसटीचा भार महागाईचा रूद्र अवतार घेऊन भारतीय जनतेला छळत आहे.

जगभरात 2020 मध्ये कोरोना महामारीने रौद्र रूप धारण केले होते. जगाबरोबर भारतालाही त्याच्या झळा सोसाव्या लागल्या. भारत सरकारने देशभरात टाळेबंदीचा निर्णय जाहीर केला होता. त्यात अनेक व्यवसाय, व्यापार बुडाले.कामधंदे बंद पडली होती. त्याचा विपरीत परिणाम सध्या दोन वर्षानंतर भारत आणि जगावर झाला आहे. महागाईने कोरोनाचं रूप पांघरूण मोठ्या वेगाने आपल्या चढत्या आलेखाची गती वाढवली आहे.

सरकार दरबारी महागाई निर्देशांकाची जी आकडेवारी येते त्यानुसार सप्टेंबर महिन्यात 10.70 टक्के होता. एप्रिल 2021 पासून सप्टेंबर 2022 पर्यंत दहा टक्क्यांपेक्षा जास्त दर राहिला आहे. सरकारी आकड्यांचा विचार करता 2013 -14 साली महागाई निर्देशांकानुसार महागाई दर दहा टक्यांच्या वर गेला होता. सरकारी आकडे आणि सरकारचे मत यापेक्षा वास्तविक परिस्थिती खुप भिन्न अनुभवायला मिळते. सरकार निर्देशांकाच्या आकड्यावर महागाई आहे की नाही यावर बोलत असते.पण वास्तविक पाहता बाजारपेठेत जी परिस्थिती वर्तमानात असते त्यावर महागाई आहे अथवा किती आहे हे समजू शकते. महागाईचा चटका फक्त सर्वसामान्य आणि मध्यवर्गच जास्त प्रमाणावर वास्तविक पणे सांगू शकतो.

सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास 2014 पुर्वी आपला घरगुती गॅस 450 रु.,गोडं तेल 70 ते 80 रू,पेट्रोल 70 ते 80 रू.,डिझेल 50 ते 60 रू,कागदी रिम 150 रू,डाळी 60 ते 70 रु,भाजीपाला 10 ते 20 रु किलो वा भाजीची जुडी बाजारात भेटत असत.आज मात्र तुलनात्मक दृष्ट्या विचार केला असता तर असे लक्षात येईल की,वर उदाहरणादाखल दिलेल्या वस्तूंच्या किंमती जवळपास दुपटी तिपटीने वाढल्या आहेत. घरगुती गॅस 1100 रू, गोडं तेल 150 रू किलो, पेट्रोल 114 रू प्रती लिटर,डिझेल 86 रू, भाजीपाला 20 रू जुडी, वांगी 100 रू,टोमॅटो 60 रू,दुध 70 रू ,जवळपास सर्वच खाद्यान्न्याच्या किंमती प्रचंड प्रमाणात वाढलेल्या दिसून येते आहेत.असा महागाईचा चढता दर दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांना रोजगार कमी आणि जगणे महाग झाले आहे.

सरकार आकड्यांची फेरफार करून महागाई कमी झाल्याचे जोरकसपणे प्रदर्शन करत असते.पण जमिनीवर मात्र परिस्थिती उलट आहे. महागाईने सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे.
बांधकाम व्यवसायाचे यापेक्षा वेगळे असे काही नाही. सर्वसामान्य लोकांना घरे बांधणे,विकत घेणे परवडणारे सद्य परिस्थितीत दिसून येत नाही. लोखंड, स्टिल यांच्या किंमती ,विट,सिमेंट यांच्या किंमती, बांधकाम कारागीर यांची मजुरी अवाक्याबाहेर गेल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे गरज असूनही लोक घरे बांधू शकत नाहीत. महागाईचे चटके सर्वसामान्य लोकांना रोजच ऐन त्या प्रकारे भोगावे लागत आहेत.

https://www.purogamiekta.in/2022/11/23/55808/

आपण वरील मंथनातून फक्त भारताचा विचार केला आहे. पण आपल्या आजुबाजुची राष्ट्रे सुद्धा महागाई त्रस्त आहेत. श्रीलंकेत महागाई मुळे तेथील राष्ट्राध्यक्ष राजपक्षे यांना राजीनामा द्यावा लागला. तशीच काहीशी परिस्थिती पाकिस्तान राष्ट्रात आहे. युरोप खंडातील राष्ट्र असतील,अमेरिके सारखे प्रगत राष्ट्र असेल महागाईने भरडले जात आहे. पण प्रगत राष्ट्र त्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आपल्या देशात तसे प्रयत्न होताना दिसून येत नाही.

सरकार हे स्वतः चा फायदा होतो अथवा होत नाही हे पाहण्यासाठी नसते.परिणामी तोट्यात जाऊन जनतेचा विचार करणारं सरकार असावं.म्हणून सरकारने सर्वसामान्य लोकांना महागाईच्या विळाख्यातून सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत.जनतेला वाऱ्यावर सोडता येणार नाही. कारण सरकारची ती जबाबदारी असते.सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन महागाई कमी करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचलणे गरजेचे आहे. जसे की,

जिएसटीच्या स्वरूपात बदल करावेत.इंधन दर ठरवण्याचे अधिकार स्वतः कडे घेऊन त्यावरील शुल्क कपात करावी. साठा करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करावी. उत्पादन वाढवावे.लोकांना रोजगार उपलब्ध करून द्यावेत.सबसिडी बहाल करावी. जेणेकरून गरजू आणि गरीब लोकांना जगणे सुसह्य होईल. सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असते.त्यामुळे महागाई कमी करण्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची आहे.

https://www.purogamisandesh.in/news/62282

वाढले दर भाज्यांचे
भिडले गगनाला
काय खावे कळेना
भुकेल्या पोटाला

गोड महाग ,महाग तिखट
तोंड झाले कडू
झाला विचका संसाराचा
गाडा कसा आता ओढू..

जगणे झाले महाग
स्वस्त काय राहिले
मरणही झाले महाग
स्वप्न महागाईत विरले

✒️सतीश यानभुरे(मो:-8605452272)

https://www.purogamiekta.in/2022/11/24/55834/