जनता आणि प्रशासनातला सुसंवाद वाढला पाहिजे – आ.डॉ.रत्नाकर गुट्टे

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.26नोव्हेंबर):- प्रशासकीय कागदपत्रे आणि योजनेसाठी जनता व अधिकारी यांचा दैनंदिन संबंध येत असतो. अनेकदा त्यांच्यात संवाद ऐवजी विसंवाद होतो. त्यामुळे लोकांची गरज लक्षात घेऊन त्यांना जर सकारात्मक वागणूक मिळाली तर जनता व प्रशासन यांच्यातल्या सुसंवादात आपुलकी वाढेल. त्यामुळे जनतेचा प्रशासनावरचा विश्वास अधिक बळकट होईल. परंतु त्यासाठी जनता आणि प्रशासन यांच्यातला सुसंवाद वाढला पाहिजे, असे स्पष्ट मत गंगाखेड विधानसभेचे कार्यसम्राट आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले आहे.

पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या ​शासकीय निवासस्थान कामाचे भूमिपूजन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या शुभहस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सहाय्यक अभियंता मोरलवार, मित्रमंडळाचे तालुका प्रभारी सुभाषराव देसाई, तालुकाध्यक्ष गणेशराव कदम, रासप तालुकाध्यक्ष जगन्नाथ रेनगडे, युवक तालुकाध्यक्ष सुदाम वाघमारे, सोमनाथ सोलव, उपाध्यक्ष बापुराव डुकरे, दलित आघाडीचे विकास घाते, मारोती मोहिते, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष हबीब पठाण, सरपंच नवनाथ भुसारे, शिवाजी आवरगंड, विशालराव देशमुख, मीडिया प्रमुख दत्तराव पौळ उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी अंतर्गत पूर्ण होत असलेली शासकीय निवासस्थाने प्रकार २ व ३ मधील आहेत. त्यामध्ये ४ निवासी गाळे, विद्युतीकरण, मलनिस्सारण, पाणीपुरवठा व इतर बाबीचा समावेश आहे. त्यासाठी तब्बल १६१.९६ लक्ष खर्च होणार आहे. अतिशय आधुनिक पध्दतीने व सर्व सोईयुक्त हे बांधकाम कार्यालयाच्या लौकिकात भर घालणारे ठरेल, असा विश्वास संबंधित विभागास आहे.

पुढे बोलताना आ.डॉ.गुट्टे म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांना जशा सोई-सुविधा आवश्यक वाटतात. अगदी तसेच कार्यालयात येणाऱ्या लोकांनाही काही गोष्टी गरजेच्या वाटत असतात. त्यानुसार विना विलंब लोकांची कामे केल्यास कार्यालयाचाही गौरव वाढतो. तसेच लोक संबंधित कर्मचाऱ्यास आशीर्वाद सुध्दा देतात. म्हणून लोकांच्या कामाचे समाधान मिळवायचे असेल तर प्रामाणिक व पारदर्शक काम करणे अत्यंत गरजेचे आहे. याप्रसंगी तालुक्यातील सर्व पदधिकारी, कार्यकर्ते व बांधकाम विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र, लाइफस्टाइल, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED