प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

17

✒️नागभीड(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागभीड (दि.11जुलै): प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. याकरिता खरीप हंगाम 2020 व रब्बी हंगाम 2020-21 पासून राज्यात पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. योजनेत सहभाग होण्याची अंतिम मुदत दि. 31 जुलै 2020 पर्यंत आहे. तरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन नागभीडचे तालुका कृषी अधिकारी शिरीष भारती यांनी केले आहे.

अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडे कराराने शेती करणाऱ्या शेतकऱ्यासह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. भात (तांदूळ) या पिकास पिक विमा संरक्षित रक्कम रुपये 42 हजार 500 प्रती हेक्टर असून शेतकऱ्यांना भरावयाचा हप्ता 850 रूपये हेक्टर असा आहे.

खरीप हंगाम 2020 योजनेत सहभाग घेण्यासाठी पिक विमा प्रस्ताव बँकेत, आपले सरकार सेवा केंद्र (येथे ऑनलाइन पद्धतीने भरला येईल) सादर करण्यासाठी सर्व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, पेरणी घोषणा पत्र आणि बँक खाते पासबुकची झेरॉक्स प्रत सादर करणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांनी प्रस्तावासोबत मोबाईल नंबरसह आधार नंबरचे स्वसांक्षाकन करावे.

खरीप हंगाम 2020 मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होणेसाठी कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्याचा किंवा न होण्याचा पर्याय या तत्वावर कार्यान्वित आहे. शेतकऱ्यांचे ज्या बँकेमध्ये किसान क्रेडीट कार्ड खाते आहे किंवा ज्या बँकेमध्ये पिक कर्ज घेतले आहे. त्या बँकेच्या शाखेमध्ये जमा करणे अपेक्षित आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होणेसाठी किंवा न होणेसाठी स्वतंत्र अर्ज करावेत. कर्जदार शेतकरी योजनेतील सहभागाबद्दल स्वतः निर्णय घेऊ शकतात. शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेसाठी घोषणापत्र हंगामाच्या आधी किवा 31 जुलै 2020 या अंतिम मुदतीच्या दिवसाआधी देणे आवश्यक आहे. जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाही. त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल.