क्रिमीनल पॉलिटिक्स विरूद्ध क्रियटिव्ह पॉलिटिक्स!

44

पॉलिटिक्स म्हणजे पोलाईट पब्लिक ची पॉलिसी. सभ्य लोकांचे सभ्यता टिकवण्यासाठी सभागृह. त्याला पार्लमेंट, असेली, ड्युमा, सिनेटसभा, महासभा अशी नांवे देतो. हे सभ्य लोकांचे सभागृह असते. जे सभ्यता म्हणजे संस्कृती टिकवून ठेवतात. अशाच गुणवत्तेची माणसे आपण सभागृहात पाठवतो. ते आपल्यापेक्षा तुलनेने सभ्य असतात, प्रामाणिक असतात, बुद्धीमान असतात,ज्ञानी असतात, नैतिक असतात, साहसी असतात. अशी माणसे निवडून देण्याची संधी लोकशाहीत प्रत्येक प्रौढ नागरिकाला असते. शिवाय तो माणूस नागरिकांचा स्थानिक मित्र असावा, गावातील, शहरातील, जिल्ह्यातील, प्रदेशातील असावा. म्हणजे आपण त्याला किमान ओळखत असावे. तो चोरी तर करीत नाही.तो अत्याचार तर करीत नाही. तो बलात्कार तर करीत नाही. तो गुंडगिरी तर करीत नाही. तो दारू तर विकत नाही. तो सट्टा तर चालवत नाही. तो खंडणीखोर तर नाही. तो लाचखोर तर नाही. तो हप्तेखोर नाही. तो लबाड तर नाही. याची काही प्रमाणात खात्री असते, माहिती असते.

असतेच. मी जळगाव चा मतदार जळगाव नगरपालिकेत अमळनेर , भुसावळ, पुणे, मुंबई च्या माणसाला मतदान करीत नाही. तो जळगावचाच असला पाहिजे. तर मग मी त्याला ओळखत असला पाहिजे. नक्कीच. म्हणजे मी मत देतांना, प्रतिनिधी निवडतांना चूक करणार नाही. माझा चांगला माणूस नगरपालिकेत सभागृहात माझे प्रतिनिधित्व करील. याला पॉलिटिक्स म्हणतात. याला राजकारण म्हणतात. महाजन विरोधात खडसे, खडसे विरोधात गुलाबराव. अशी चिखलफेक करणारी, अभद्र बोलणारी, एकमेकांवर गुन्हे नोंदवणारी माणसे राजकारण करीत नाहीत. उठसूठ कोणाच्याही फोटो ला चप्पल मारणारी त्यांची पिलावळ तर राजकीय कार्यकर्ते नाहीतच. ते तर सामान्य नागरिकांपेक्षा खालच्या दर्जाची आहेत. ते राजकारण करीत नाहीत. ते फक्त व्यवसाय करतात. राजकिय व्यवसाय. म्हणून निवडणूक लढतात. सत्तेतून सार्वजनिक तिजोरी कडे जातात. इतकाच हेतू दिसतो.

गांधी नेहरुंची कांग्रेस. सभ्य, शिक्षीत, बुद्धीमान, प्रामाणिक लोकांची कांग्रेस आता तशी राहिली नाही. आमदार खासदार मंत्र्यांनी तिजोरीतून घबाड चोरले. जनहिताची कामे करणे सोडून शाळा, कॉलेज, कारखाने, पतपेढी, दारूबार काढले. जनतेकडे विकासाकरिता जाणारा निधी मधेच अडवला. खिशात घातला. अशा चोरांच्या मागे इडी, सीबीआय, सीआयडी तर लागणारच. काही चोरांवर लागली सुद्धा. म्हणून हे राजकीय चोर जेलच्या भीतीने भाजपकडे गेले. काही चुप बसले. काहींनी लगान देऊन सुटका करून घेतली. हिच कारणे आहेत, कांग्रेस चे आमदार खासदार भाजप कडे जाण्याची. कर्नाटक, एमपी, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब ,गोवा अशा अनेक ठिकाणी कांग्रेस चे आमदार खासदार भाजपकडे का गेले? त्यांना भाजपाचे धोरण आवडते म्हणून नव्हे. हे चोर आहेत. यांनी चोरी केली नसती तर यांना जेलची भीती राहिली नसती. हे भाजपकडे गेले नसते. यांना चोरी कोणी करू दिली? यांना चोरी का करू दिली? हा प्रश्न कांग्रेस मधील उच्च व उर्वरित नेत्यांनी केला पाहिजे.

चोर होते म्हणून पळाले.शिवसेना हा वारंवार फुटणारा पक्ष. शेतातील ढेकूळ फुटते तसा हा पक्ष आपोआप फुटतो. निमीत्त दुसऱ्यावर देतो. मुळातच शिवसेनेत किती माणसे राजकारण करीत होती? किती लोकांना राजकारण कळते?मुळातच हाणामारी आणि दंगाफसाद मधून एकत्र आलेली माणसे शिवसेनेत जमा झाली. राणे , भुजबळ, नाईक, आणि आता शिंदे, सोबत गुलाबराव वगैरे ढोलके चोणके ज्यांना उर्वरित शिवसेना गद्दार म्हणते, ते सुद्धा राजकीय माणसे नाहीतच. उद्धव ठाकरेंनी शिवसेना फुटली म्हणून दुःख उगाळत फिरण्याऐवजी शिवसेनेत राजकीय माणसे, राजकारण जाणणारी माणसे पक्षात घेतली पाहिजे. याला शेण मार, त्याला चप्पल मार हे थांबवले पाहिजे. ही राजकीय कृती नाही. याला राजकारण म्हणता येणार नाही.

कांग्रेस आणि शिवसेना सारखी अवस्था भाजप ची आहे. जळगांव महानगरपालिका निवडणुकीत गिरीश महाजन यांनी ५७ पैकी २७ गुंड गुन्हेगारांना इतर पक्षातून आयात करून घेतले. यांची मुलाखत कोणी घेतली? माननिय, सन्माननिय, आदरणिय खासदार ए टी पाटील. ए टी पाटील यांनी त्यांचीच आवडनिवड जपणारी, त्यांचाच शोकपाणी पुरवणारी माणसे सिलेक्ट केली. निवडून तर आणले. पण जेंव्हा माणसे भाजपच्या नाकावर टिच्चून शिवसेनेत पळाली तेंव्हा दुःख उगाळत बसले. ही चूक महाजन व ए टी नानांची आहे. प्राचार्य तसा आचार्य. आचार्य तसा गुरूजी. गुरुजी तसा विद्यार्थी.

राष्ट्रीय अस्मिता सांगणारे शरद पवार साहेब, प्रधानमंत्री च्या स्पर्धेत आहेत. कोणाच्या जिवावर? चोरांच्या? इतर पक्षांतील तद्दन कुशल आणि निवडक लोकांना सोबत घेऊन पवार साहेब राष्ट्रीय राजकारण करु पाहातात. हे महाराष्ट्र जनतेला मान्य नाही.पैशातून निवडणूक. निवडणुकीतून सत्ता. सत्तेतून तिजोरी. तिजोरीतून पुन्हा धनसंपदा. हे दुष्टचक्र महाराष्ट्र जनतेला मान्य नाही. हे राजकारण नाही. हा राजकीय व्यवसाय आहे.

महाआघाडीचे मागील अडीच वर्षे विश्वासघात, आरोप प्रत्यारोप, कुरघोडी, इडी, सीडी, सीआयडी, सीबीआय, हप्ते वसुली, खंडणी वसुली यात गेली. कोरोनाच्या आड ही पापे लपवता आली. पण कोरोना महामारी संपल्यानंतर ही राजकारण झाले नाही. विकासाची कामे झाली नाहीत.पुन्हा शिवसेना फुटली. सरकार पडले. सरकार बनले. तीन महिने झालेत अजूनही तोच कलह. तोच संताप. तोच आरोप प्रत्यारोप. खोका, गद्दार वगैरे वगैरे. ठाकरे आणि शिंदे राजकारण करीतच नाहीत. ते करतात फक्त यादवी. कौरव पांडवासारखे महाभारत. आज महाराष्ट्रात राजकारण, शासन, प्रशासन चालत नसून, आहे फक्त कुरूक्षेत्रावरचे युद्ध.

महाराष्ट्रातील बुद्धीमान, शिक्षीत, प्रामाणिक लोकांना याचा कंटाळा आला आहे. चीड आली आहे. या टोळी युध्दात आमचा विकास थांबला आहे. आमची प्रगती थांबली आहे. उद्योग पळाला आहे.पळत आहे. यातून पर्याय काढणे आवश्यक आहे. क्रिमीनल पॉलिटिक्स सोडून क्रियटिव्ह पॉलिटिक्स कडे वळण्याची गरज आहे.जळगाव जिल्ह्यातील दूध फेडरेशन संचालक मंडळाची निवडणूक चालू आहे. यात शेतकरी दूध पुरवतात.पण उमेदवार शेतकरी नाहीत. आमदारांनी तसे शेतकरी असल्याचे खोटे ठराव करून घेतले. येथूनच भ्रष्टाचाराची सुरूवात आहे. पुढे काय होईल, सांगणे न लगे. शिवाय यात आमदार, मंत्री सुद्धा संचालक पदाची निवडणूक लढवत आहे. यांना जिल्ह्यातील सर्वच पदे खिशात हवी आहेत. का? आपण येथे दूध फेडरेशन मधे दूध, लोणी, तुपाची चोरी केली तर कोणीही विधानसभेत प्रश्न करू नये. म्हणून आपणच चोर आणि आपणच पोलिस. या हेतूने आमदार मंत्री निवडणूक लढवत आहेत. ही माणसे राजकारण करीत नाहीत. ही माणसे राजकीय नाहीतच. कार्यकर्त्यांना संचालक निवडून आणण्याऐवजी स्वतः आमदार संचालक बनू पाहात आहेत. मुलाचे, नातूचे लग्न करण्याऐवजी स्वतः आमदार बोहल्यावर चढत आहेत. ही असामाजिक मानसिकता आहे. ही अराजकीय मानसिकता आहे.क्रिमीनल पॉलिटिक्स सोडून क्रियेटीव्ह पॉलिटिक्स कडे वळण्याची वेळ आली आहे. गुन्हेगार हे सज्जन होतील, अशी वाट न पाहाता सज्जन नागरिकांनी राजकीय पर्याय देण्याची गरज आहे.

✒️शिवराम पाटील(९२७०९६३१२२)महाराष्ट्र जागृत जनमंच,
जळगाव

https://www.purogamiekta.in/2022/11/29/56114/