ओव्हरटेक करणाऱ्या बसवर धावत्या ट्रॅक्टरमधून युवकाने घेतली उडी; खाली आदळून जागीच ठार

44

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

माजलगाव(दि.29नोव्हेंबर):- तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटी बसवर अचानक ट्रॅक्टरमधील युवकाने उडी मारली. यामुळे तो एसटीच्या डाव्या बाजूला धडकून रोडवर आदळला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. गजानन मारोती बनाईत (३२, रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता.माजलगाव ) असे मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिरसदेवीहून २ ट्रॉल्या असलेले ट्रॅक्टर कोळसा घेऊन माजलगावकडे जात होते. याच दरम्यान पाठीमागून एक बस ( कल्याण – वसमत, एम.एच.20 बी.एल.4088 ) ओव्हरटेक करत होती. बस ट्रॅक्टरच्या पुढे निघत असतानाच मागील ट्रॉलीमध्ये बसलेल्या गजानन मारोती बनाईतने अचानक बससमोर उडी मारली. एसटीच्या डाव्या बाजूला समोरील टायरच्या बाजूला तो धडकडा. त्यानंतर तो खाली आदळला. गजाननच्या ओरडण्याने आजूबाजूचे नागरिक बसकडे धावले. मात्र, खाली आदळून डोक्याला पाठीमागून जबर मार लागल्याने गजाननचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान संबंधित ट्रॅक्टर चालकाने तेथून पळ काढला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.