२९ वे झाडीबोली साहित्य संमेलन आणि पितृभाषा

  84

  मातृसत्ताक संस्कृतीचा प्रभाव आजही भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे . सांस्कृतिक उत्क्रांतीत अनेक स्थित्यंतरे उलथापालथ करून गेली असली , तरी संस्कृतीचा मूळ गाभा भारतीयांच्या परंपरेचा आत्मा आहे . एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीसंवहनाचे कार्य करणारी भाषा त्यातून सुटणार कशी ? आजही जन्मजात लाभलेली भाषा मातृभाषा म्हणून जीवनाच्या अंतापर्यंत मानवाची संगिनी बनून व्यक्तिमत्वाला आकार देत आहे . भारतीय इतिहासातील मातृसत्ताक संस्कृतीचा हा सन्मान आणि परिपाक असल्याचा एक उत्कृष्ट उदाहरण विश्वालाही वंदनीय आहे .

  मातृसत्ताक परंपरेत मातृभाषा या शब्दाला छेद देत पितृभाषा हा शब्द बऱ्याच जणांना नक्कीच बुचकाळ्यात पाडेल . तसे काहीसे माझे पण झाले होते . प्रसंग होता जुनासुर्ला येथील २९ वे झाडीबोली साहित्य संमेलन . झाडीबोली शोधमहर्षी डॉ . हरिश्चंद्र बोरकर मंचावरुन बोलत होते . त्यांच्या भाषणातील एक वाक्य कानावर पडले , “लक्ष्मण खोब्रागडे झाडीबोलीत लिहितो आणि त्याच्या कवितेतील भाषा ही पितृभाषा आहे .” नी मी सावध होऊन ऐकू लागलो .

  त्यांच्या भाषणातील प्रत्येक शब्द न शब्द मी कान टवकारून श्रवण केला . डॉ. बोरकर सांगत होते , ” मातृभाषा म्हटली की ती आईकडून येणारी भाषा . आपली आई म्हणजे ज्या मातीत जन्म झाला ती भूमी . जन्मभूमी ही आपली माता नी त्या भूमीशी नाळ जुळलेली मातृभाषा . पण कित्येकदा अपरिहार्य कारणास्तव त्या भूमीपासून दूर गेलो तर , नवीन नाते जुळलेल्या भूमीतील भाषेचा आपल्यावर परिणाम होऊन मूळ भाषेत बदल होतो . दुसरे सांगायचे झाले तर , मुलगा आईच्या कुशीत शिकतो म्हणतात . मग ही आई पित्याच्या घरी बाहेर भूमीतून आलेली असते , तिच्यावर दोन प्रदेशातील बोलीचा प्रभाव असतो. आपला जन्म पित्याच्या भूमीत होत असताना मातेच्या भूमीतील भाषा आपली मातृभाषा होऊच शकणार नाही . जन्मभूमितील पित्याची भाषा हीच आपली मूळ बोली . हे इतक्यासाठी सांगायचे आहे की , मुलगी सासरी आपल्या पित्याची आणि सासरची भाषा बोलत असते . पण पितृभाषा म्हटली की त्यात कोणताही प्रभाव नसते 

  पित्याकडून चालत आलेला वारसा जसेच्या तसा पुढील पिढीकडे जात असते . मातेकडे दोन प्रदेशातील संस्करण असले तरी पिता हा एकाच प्रदेशातील संस्कारात वाढलेला असल्याने त्या प्रदेशाची खरी संस्कृती पित्याद्वारे प्राप्त होऊ शकते . म्हणूनच लक्ष्यार्थाने बघायचे झाल्यास झाडीबोलीतील साहित्यिकांनी पितृभाषा अवगत केली पाहिजे . म्हणजे खरी बोली आणि तिचा इतिहास व विज्ञान समोर येईल .

  डॉ . हरिश्चंद्र बोरकरांच्या या नवीन प्रांजळ विधानाचा गाभा चटकन माझ्या लक्षात आला . आणि मनाला उभारी देत सांगत होता की , आपल्याला आपली बोली समजून घ्यायची असेल तर त्यात झालेली भेसळ दूर सारून , दुसऱ्या कोणाचे हातचे न घेता ,आपल्या वाडवडिलांनी / पूर्वजांनी जतन केलेल्या आणि विस्मरणात गेलेल्या संस्कृतीला उजाळा देऊन आपली बोलीपरंपरा उजेडात आणली पाहिजे . पूर्वजांनी दिलेला वारसा गमावणारी पिढी नालायक म्हणून गणल्या जाते ,हे जगजाहीर आहे . त्यासाठी वाडवडिलांच्या वतनात भर घालून पुढील पिढीला भरभराट दाखविण्यासाठी आपण सर्व सज्ज झालो पाहिजे . पितृभाषा टिकवून आपल्या मातृभाषेला अधिक समृद्ध केले पाहिजे .

  ✒️लक्ष्मण खोब्रागडे(जुनासुर्ला,ता.मूल,जि.चंद्रपूर)मो:-९८३४९०३५५१