दिव्यांगांचे प्रश्न प्राध्यानाने मार्गी लावण्यात जिल्हा उत्कृष्ट मॉडेल ठरेल -जिल्हाधिकारी राऊत

26

✒️नांदेड(पुरोगामी न्युज नेटवर्क)

नांदेड(दि.3डिसेंबर):- दिव्यांगांचे प्रश्न प्राध्यानाने मार्गी लावंत नांदेड जिल्हा या कार्यातून उत्कृष्ट मॉडेल ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग ,जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिपच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दिव्यांगाकरीता न्यायालयीन तरतुदी, दिव्यांग निर्मूलनासाठी शीघ्र निदान व उपचार या विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अध्यक्षीय मनोगतात जिल्हाधिकारी अभिजित राऊत बोलत होते व्यासपीठावर जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सतेंद्र वी. आऊलवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज, लॉयन्स क्लबचे प्रेमकुमार फेरवाणी, डॉ.लक्ष्मीकांत बजाज व डॉ. अर्चना बजाज, देवसरकर आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी राऊत म्हणाले की, दिव्यांगांना एखादे अवयव कमी दिले असले तरी त्याची भर अन्य कलेच्या माध्यमातून भरून काढलेली असते दिव्यांगांच्या या कलांना चालना दिल्यास आणखी उत्तम कार्य ते करू शकतात तसेच खेळातही जिल्हा-राज्य नव्हे तर राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय पातळीवर यश मिळवू शकतात. आता पर्यंत समाज कल्याण विभागाच्या वतीने चांगले कार्य केले आहे यापुढेही दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी सदैव तत्पर रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

या प्रसंगी बोलताना जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर म्हणाल्या की, देशात प्रथमच महाराष्ट्रात दिव्यांगांसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला यामुळे आगामी काळात अधिकाधिक दिव्यांगांना गतीने मदत मिळू शकेल. दिव्यांगांच्या कौशल्य विकासासाठी प्रयत्न करावा यातून ते दिव्यांगांना स्वावलंबी करणे शक्य होईल. जिल्ह्यांतील शेवटच्या दिव्यांग व्यक्तीस शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी शिबीर,मेळाव्याचे आयोजन करावे अशी सूचना केली. देशातील इतरांसाठी प्रेरक,प्रेरणा देणारे कार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

यावेळी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजितकौर जज यांनी दिव्यांगां करीता न्यायालयीन तरतुदी तर डॉ. लक्ष्मीकांत बजाज यांनी दिव्यांग निर्मूलनासाठी शीघ्र निदान व उपचार या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी लॉयन्स क्लबचे प्रेमकुमार फेरवाणी,डॉ. अर्चना बजाज यांनीही विचार मांडले जिपच्या माजी सदस्या सौ.पूनम पवार उपस्थिती लावली. प्रास्ताविकात जिल्हा समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आउलवार यांनी दिव्यांगांना सहानुभूतीची नाही तर संधीची गरज असल्याचे सांगितले दिव्यांगां बाबत जनजागृती,शिक्षण,पुनर्वसन यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे स्पष्ट केले.

सूत्र संचलनात मुख्याध्यापक नितीन निर्मल यांनी दिव्यांग दिनाचा इतिहास, शासन तसेच स्वयंसेवी संस्था माध्यमांतून होणारे काम याची उपस्थितांना माहिती दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील दिव्यांग शाळेच्या शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वसरणी अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरेख स्वागत गीत गात उपस्थितांचे लक्ष वेधले.