तालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य व वेळेत माहिती दयावी : ना.विजय वडेट्टीवार

18

🔸सिंदेवाही तहसिल कार्यालयात आढावा बैठक

✒️सिंदेवाही(पुरोगामी संदेश नेटवर्क)

सिंदेवाही (दि.11जुलै): कोरोना संक्रमण काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह संक्रमितांची संख्या वाढत आहे. तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या नागरिकाची माहिती वेळेत मिळावी, त्या संदर्भातील निर्णय वेळेत व्हावा, याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

सिंदेवाही येथील तहसील कार्यालयामध्ये आज त्यांनी आढावा बैठक घेतली. आज दुपारी सिंदेवाही येथे पालकमंत्री यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी इंदूरकर, नगरपंचायत सिंदेवाहीच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, सिंदेवाही तालुका आरोग्य अधिकारी ललित पटले, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे, उपनगराध्यक्ष स्वप्निल काळे, पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार आदींची उपस्थिती होती.

सिंदेवाही तालुक्यामध्ये सध्या फक्त दोन पॉझिटिव्ह संक्रमितांची नोंद आहे. मात्र बाहेर जाऊन मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्यामुळे ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपलब्ध असणाऱ्या आरोग्य यंत्रणेचा देखील यावेळी पालकमंत्री ना.वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. चंद्रपूर येथे कोरोना प्रयोगशाळा तयार करण्यात आली आहे. याही पुढे जाऊन आता लवकरच चाचणी अहवाल कळेल, अशा पद्धतीची यंत्रणा जिल्हास्तरावर विकसित केली जात आहे. त्यामुळे अलगीकरण, विलगीकरण करण्यात येणाऱ्या सर्व नागरिकांच्या चाचण्या पुढील काळात घ्यायच्या आहेत. यासाठी आरोग्य यंत्रणेने तत्पर असावे व आपले मनुष्यबळ तयार करावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

नगरपंचायत सिंदेवाही यांच्यामार्फत सुरू असलेल्या स्वच्छता व अन्य पूरक व्यवस्थेबद्दलची माहिती त्यांनी घेतली. याशिवाय त्यांनी पालकमंत्री पांदन रस्त्याबाबत आढावा घेतला. संपूर्ण तालुक्यांमधील बारमाही रस्त्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जावे व कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा असू नये, याबाबत दक्ष असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या. 14 व्या वित्त आयोगातील कामाचा आढावा देखील त्यांनी यावेळी घेतला. याशिवाय राज्य शासनाच्या विविध योजना संदर्भात तालुका स्तरावर सुरू असलेल्या उपाययोजना व गरीब, गरजूंसाठी असणाऱ्या लाभार्थ्यांच्या योजनाबाबत माहिती जाणून घेतली.

संजय गांधी निराधार योजना सारख्या लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळेल, यासाठी तालुक्यातील सर्व बँकांना देखील अवगत करावे, त्यांच्या व्यवस्थापकांना तशा सूचना कराव्यात असे निर्देश त्यांनी दिले. पेरणीच्या दिवसांमध्ये कृषी केंद्रांकडून शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणेने भरारी पथकांच्या मार्फत विशेष दक्षता, घ्यावी असेही त्यांनी सांगितले.