दिव्यांगांच्या महाविद्यालयीन जीवनप्रवासात मित्रांचे महत्त्व

मित्र हा असा शब्द आहे की आई-वडिलांनंतर किंवा आपल्या कुटुंबा नंतर आपल्या सर्व वैयक्तिक गोष्टी आपण ज्या व्यक्तीला सांगतो तो आपला मित्र असतो. मित्र आपल्या सर्व सुखदुःखात सहभागी तर होतोच पण जो आपल्या भावभावना समजून घेतो किंवा आपल्या चेहऱ्यावरून आपण दुःखी आहोत का आनंदी हे सहज ओळखतो तो म्हणजे एक जवळचा मित्र मी अनुभवलेले आहे प्रेम नक्कीच रडून जाते पण ब्रेक-अप झाल्यानंतर स्वतःचा अनुभव सांगून चेहऱ्यावर स्मित असणारा हा मित्रच असतो. तर मला असं वाटतं की मित्राचे दोन प्रकार पडतात. एक प्रकार म्हणजे तो मित्र आपल्या खूप जवळचा असतो आणि आपल्या सर्व समस्या समजून घेणारा असतो. आणि मित्राचा दुसरा प्रकार म्हणजे आपला मूड नसताना देखील आपल्याला हसवण्याचा प्रयत्न करतो असे दोन प्रकारचे मित्र प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये असतात. तर आपण थोडं दिव्यांगांच्या मैत्री बाबत बोलूया.

तर मी डोळ्यांनी 75 टक्के अंध आहे. आणि मी सध्या महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे तर माझ्या या महाविद्यालयीन जीवनाच्या प्रवासामध्ये मित्राचे स्थान हे खूप महत्त्वाचे आहे. आणि योगायोग असा की मित्रही असे भेटले की मला कुठल्याही गोष्टीची कमतरता भासू देत नाहीत. या महाविद्यालयीन जीवनात मित्र तर खूप सारे भेटले पण ज्याला मी अतिशय जवळचे मित्र मानतो असे चार-पाचच आहेत पण तेही हजारो मित्रांच्या बरोबरीचे आहेत. पहिला मित्र म्हणजे सावंत चव्हाण जो अकरावीपासून माझ्यासोबत आहे आणि विशेष म्हणजे आमची मैत्री इतकी घट्ट आहे की माझ्या मनामध्ये काय चालू आहे ते सहज ओळखतो किंवा मी कुठल्या टेन्शनमध्ये आहे हे समजतो. एकदा त्याला अनुभवण्यासाठी मी एक नाटक केले ते असे की आमच्या सत्र चार चे पेपर सुटल्यानंतर मी घरी उशिरा गेलो पण मला त्याला अनुभवायचं होतं तर त्याला मी फोन केला आणि म्हटलं की सावंत माझा पेपर व्यवस्थित गेलेला नाही मी आत्महत्या करणार आहे आणि असं बोलून मी माझा मोबाईल स्विच ऑफ केला तर लगेच त्याने प्रयत्न सुरू केले मी कुठे असेल कसा असेल माझ्या घरी देखील त्यांनी फोन केला आणि स्वतःचे काम सोडून मला शोधण्यासाठी निघाला ज्यावेळेस मोबाईल मी स्विच ऑन केला मला 118 फोन त्याचे दिसले आणि ज्यावेळेस मी त्याला फोन केला आणि सांगितलं की मी तुला आजमावण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा त्याने माझ्या जोरात कानाखाली मारली आणि मिठी मारून रडायला लागला.

दुसरा मित्र आहे ओंकार चव्हाण नावाचा याच्याशी संपर्क खरंतर मी द्वितीय वर्षाला असताना आला परंतु जेव्हापासून याच्या संपर्कामध्ये मी आलो मला त्याच्या रूपात एक मार्गदर्शक मिळाला काय चांगला आहे काय वाईट आहे किंवा कोणत्या परिस्थितीशी कशी मात करायची हे तो आपल्या अनुभव नेहमी सांगत असतो कारण तो अनुभवी व्यक्ती आहे आणि मी खरंच भाग्यवान आहे कारण एक मार्गदर्शकच नाही तर मोठ्या भावाप्रमाणे समजून सांगणारा किंवा आपल्या ला आधार देणारा असा एक तरी मित्र भेटला. तिसरा आणि अगदी जवळचा मित्र म्हणजे अश्फाक शेख हा मित्र माझा अगदी जवळचा मित्र म्हणून मी त्याला म्हणतो कारण तीन वर्षापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहे तरीसुद्धा आमच्या मैत्रीमध्ये कधी जात आडवी आले नाही का कधी धर्म आडवा आला नाही जाती धर्म तोडून आम्ही एकमेकांशी एकनिष्ठ आहोत.

परिस्थितीने आम्ही दोघेही सारखेच आहोत आणि या परिस्थितीतून कसं वर यायचं याचा आम्ही सतत विचार करत असतो. बऱ्याचदा हिंदू मुस्लिम वाद होताना दिसतात किंवा आमचे मैत्री असताना देखील बरेच हिंदू मुस्लिम वाद झाले परंतु याचा आमच्या मैत्रीवर काहीही फरक पडलेला नाही हेच असते खरी मैत्री. दिवाळीला तोही माझ्या घरी येतो आणि ईद-ए-मिलादला मी सुद्धा त्याच्या घरी जातो कुठलाही प्रकारे तुझ्या भावना ठेवता मैत्री टिकवणे हेच आपल्या खऱ्या मैत्रीचे मोठेपण असते.मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो…ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.

✒️लेखक:-स्वप्निल गोरे(पत्ता,सावरगाव गोरे,तालुका:पुसद,जिल्हा: यवतमाळ)मो:-8767308689

महाराष्ट्र, यवतमाळ, लाइफस्टाइल, लेख, शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED