चौदा वाड्या अन् एक स्मशानभूमी

  51

  स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानंतरही महाराष्ट्रासह भारतात विषमतावादी,जातीवादी दृष्टीकोन आजही फार मोठ्या प्रमाणात दिसून येतो.राजकीय मंडळी,लोकप्रतिनिधींनाचं सामाजिक परिस्थिती बदलण्याची, जातीय व्यवस्था मोडण्याची इच्छाशक्ती नाही असेच दिसून येते. अशिक्षित नव्हे तर,फार मोठा सुशिक्षित समाजही परंपरागत विषमतावादी जातीवादी व्यवस्थेच्या पाशातून मुक्त होतांना आजही दिसून येत नाही.स्पर्शाने विटाळ होणारी जातीयता नष्ट झाली असली तरी तिचे स्वरुप बदलून,जातीयता हिच काही लोकांची मानसिकता बनली आहे अन् तीच समाजाला,देशाला घातक आहे.कारण,प्रत्येक जात आपण दुसऱ्या जातीपेक्षा कसे श्रेष्ठ आहोत हे सिध्द करण्याचा फुटकळ प्रयत्न करत असल्यानेचं जातीयता वाढत आहे. त्यामुळे स्वच्छ भारत योजनेबरोबरच,जातमुक्त योजना देशात राबविली पाहिजे.त्यामुळे समाजात,जातींमध्ये असलेले वैर संपुष्टात येण्यास मदत तरी होईल. जातीयतेच्या माध्यमातून मानवता अन् माणूसकीला लागलेले ग्रहण सुटले पाहिजे.

  जातीय तेढ निर्माण करुन विध्वंसक होण्यापेक्षा, जातीयतेचे निर्मुलन करुन मानवतेचे दूत होण्याची नितांत गरज आहे. वेळ आल्यावर जातीच नाही तर,माणूसकीचेचं रक्त कामी येतेच ना? मात्र त्याची विभागणी जाती,धर्मानुसार केलेली नसते.छत्रपती महाराजांनीही सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र करुन त्यांना मावळेपण दिलं अन् रयतेच राज्य निर्माण केलं होतं.त्यामुळे,महापुरुषांच्या महान कार्याचा वारसा सांगतांना त्यांचा वैचारीक वारसा आपण खरच जपतो का?
  जाती व्यवस्था ही भारतीय समाजाची पायाभूत व्यवस्था आहे. प्राचीन भारतात ही व्यवस्था विकसित झाली अन् आधुनिक काळात ती बदलत गेली असे मानले जाते. देशात जाती धर्माचा संसर्ग झाल्याने,सामाजिक वातावरण दुषित बनले आहे.

  जातीय व्यवस्थेवर मात करण्यासाठी भारतीय उपेक्षित समाजामध्ये राजकीय,सामाजिक अन् शैक्षणिक पातळ्यांवर आरक्षणाची व्यवस्था निर्माण करण्यात आली.अनेक कायदे अन् सामाजिक उपक्रम तसेच सामाजिक,आर्थिक योजना राबविण्यात आल्या तरी सुध्दा जाती व्यवस्था अन् समाजाची जातीय मानसिकता नष्ट होतांना दिसून येत नाही.जातीय पातळीवर भेदभाव करणे हे भारतीय संविधानाच्या कलम १५ नुसार बेकायदेशीर ठरविण्यात आलेले असतांना,अनेक ठिकाणी आजही भेदभाव दिसून येतो.कारण,माणसात माणूस आहे हे सजविण्यात धर्म अपयशी ठरल्यानेच,जाती धर्माच्या नावाखाली माणसा माणसांमध्ये विषमता येते. मरण कोणत्याही जाती धर्माच्या माणसाशी भेदभाव करत नाही मग, माणूसच माणसाशी जिवंतपणी अन् मरणानंतरही भेदभाव का करतो?

  आधुनिक अखंड भारताचे प्रणेते डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राष्ट्रीय सामाजिक ऐक्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. म्हणून, ‘ज्या दिवशी जातीभेद मिटेल,त्याच दिवशी भारतात खरीखुरी सामाजिक,राष्ट्रीय एकता साकारेल’ असे त्यांनी वक्तव्य केले होते.सामाजिक विषमता, जातीयता दूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून अनेक धोरणे जाहीर करण्यात आली. भारतीय राज्यघटनेच्या कलम १७ अन्वये अस्पृश्यता नष्ट करण्यात आली असतांना, कायद्यानुसार अपराध असतांना आजही अनेक ठिकाणी जातीयतेच्या भस्मासुराचे विषाणू जोपासले जात आहेत.जाती धर्माचा माज बाळगून माणसा माणसांमध्ये भेदभाव निर्माण झाला तरी, शेवटी मेल्यावर स्मशानात सर्वांची राखच होणार असते.माणूसकी मारुन जगलेल्या माणसात अन् स्मशानभूमीत पडलेल्या राखेत काहीही फरक नसतो.जिथे जात, धर्म,चमत्कार अन् श्रध्दा निकामी ठरते तिथे माणसातील माणूसकीचं कामी येते हे कोरोनाने दाखवून दिले आहे. मग,जीवनाचे अंतीम सत्य काय आहे? त्यामुळे,स्मशानातील राख पाहून मनात एकच विचार येतो,फक्त राख होण्यासाठीच माणूस प्रबोधन अन् परिवर्तन सोडून आयुष्यभर एकमेकांवर जळत असतो का?

  कपड्यात,राहणीमानात,विचाराबरोबरचं मानसिकतेत,विचारधारेत,भूमिकेत बदल घडून येत असतील तर तिथे सामाजिक परिवर्तन निश्चितच दिसून येते. गावच्या विकासाबरोबरच,गावचे सामाजिक मुल्यमापन झाले पाहिजे.मुंबईसारख्या काही शहरी भागात कोणाचेही निधन झाल्यास सर्वांसाठी एकच स्मशानभूमी असते.त्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करतांना त्यांना किंवा त्यांच्या ग्रामीण मंडळींना जातीची अडचण निर्माण होत नाही. मात्र,ग्रामीण पातळीवर आपल्या समाजाची स्मशानभूमी पाहिजे असा त्यांचा हट्ट असतो. त्यावेळी,मुंबईसारख्या शहरी भागात राहणारे त्यांचे कुटुंब किंवा नातलगही त्यांना आपल्या गावात अंत्यसंस्कार करण्यासाठी एकच सार्वजनिक स्मशानभूमी पाहिजे असा सल्ला देत नाहीत.कारण,ग्रामीण भागात सर्वांची वेगळी मानसिकता निर्माण झालेली असते.मुंबईसारख्या शहरी भागात त्यांना जातीयता आडवी येत नाही पण,ग्रामीण पातळीवर त्यांच्या जातीच्या अस्मिता आपसूक जागृत होतात.शासन किंवा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या सार्वजनिक स्मशानभूमीवरही मग ते आपला हक्क सांगून,इतर मागासवर्गीय जातींना तिथे विरोध केला जातो. मात्र रत्नागिरी जिल्ह्यातील,राजापूर तालुक्यातील आजिवली गाव याला अपवाद आहे. कारण,त्या गावात १४ वाड्या असून फक्त एकच स्मशानभूमी आहे. खरच अशा गावांना आदर्श गाव मानलं पाहिजे कारण,त्या गावी विषमतेला थारा नसतो. त्या ठिकाणी जात धर्म न पाहता माणसामधली माणूसकीचे दर्शन घडते.स्मशानभूमीवरुन महाराष्ट्रात अनेक ठिकाणी वाद झाले आहेत. काही गावांमध्ये आमच्या गावात आम्ही जातीयता पाळत नाही असे कितीही नाक वर करुन जरी बोलले जात असले तरी, काही तरी घटना घडली की त्यांची खरी मानसिक प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे जाती धर्माच्या भिंती भक्कम करत सामाजिक सलोख्याची भाषा करुन जातीयता कधीच नष्ट होणार नाही. धर्मनिरपेक्ष भारत देशाला आज कास्टलेस’ची गरज आहे.

  आजिवली गांवचे आमचे बंधू दिवं. पुणाजी हरी पवार (जावडेकर) यांच्या मुलाचे ३ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. ४ डिसेंबर रोजी त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार होते, म्हणून आम्ही काही मंडळी आजिवली मुक्कामी सकाळी पोहचलो. सकाळी ११:०० वाजण्याच्या दरम्यान अंत्ययात्रा निघाली.अर्ध्या तासाच्या अंतरावर स्मशानभूमी होती.आजिवली गावात बौद्धवाडी,खडकवाडी,डेपवाडी,पोदार वाडी,गुडेकर वाडी,सोनार वाडी,नाव वाडी,राणे वाडी,गुरव वाडी,माने वाडी,तेली वाडी,धावडे वाडी,खरचादेवीची वाडी अन् सुतार वाडी अशा चौदा वाड्या असून,त्या सर्वांसाठी एकच सार्वजनिक स्मशानभूमी असल्याचे महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक,आमचे बंधू प्रकाश आजविलकर यांच्याकडून ऐकून सुखद धक्का बसला.गावात काही कार्यक्रम असेल तर बौद्ध समाजालाही पंगतीमध्ये जेवणाला बसविले जाते,कधी कोणाच्या घरी कामानिमित्त गेल्यास घरात बसवून चहा, पाणी दिला जातो.जातीयता किंवा सामाजिक विषमता कधीच केली जात नाही.काही वेळा वैचारीक मतभेद झाले पण, हाणामारीचे प्रसंग कधीही उद्भवले नाहीत असेही त्यांनी पुढे सांगितले.सर्व माहिती ऐकून गावाबद्दल अन् सर्व गावकऱ्यांबद्दल सार्थ अभिमान वाटला.

  अंत्यसंस्काराची वेळ असूनही आजिवली गावाबद्दल ऐकतांना फार समाधान वाटले.आपल्याला स्वतः काही गोष्टी सुधारता येत नसल्या तरी,दुसऱ्याच बघून तरी आपल्यात निश्चितच काही तरी सुधारणा करता येतात. त्यामुळे,ग्रामीण भागातील प्रत्येक गावांने रत्नागिरी जिल्ह्यातील आजिवली गावाचा आदर्श घेतल्यास,जातीयतेचे निर्मुलन व्हायला वेळ लागणार नाही.त्यामुळे आदर्श समाज व्यवस्था घडवायची असेल तर,तंटामुक्ती गांव पुरस्काराबरोबरचं अशा आदर्श गावांना विशेष पुरस्काराने सन्मानित केल्यास, सामाजिक सलोखा वाढून,जातीय व्यवस्थेचे निर्मुलन होण्यास निश्चितच मदत होईल यात शंका नाही.

  ✒️मिलिंद कांबळे(चिंचवलकर,मुंबई)मो:-९८९२४८५३४९