हा तर चित्रकारांनी साजरा केलेला अमृत महोत्सवी सोहळा: सुधीर मुनगंटीवार

30

🔸चित्र अमृत प्रदर्शनीचे मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्घाटन

✒️पंकज रामटेके(विशेष प्रतिनिधी)

नागपूर(दि.20डिसेंबर):-चित्र अमृत प्रदर्शन म्हणजे चित्रकारांनी साजरा केलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी सोहोळा आहे, अशा शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी चित्र अमृत प्रदर्शनाचे कौतुक केले. नागपुर मध्यवर्ती संग्रहालयाने नटराज आर्ट एँड कल्चर सेंटर च्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या “चित्र अमृत” या चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करतांना त्यांनी हे उद्गार काढले.

यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री सौरभ विजय, उपसचिव श्री विलास थोरात, नागपूर मध्यवर्ती संग्रहालयाच्या अभिरक्षिका डॉ जया वाहने, नटराज आर्ट कल्चर सेंटरचे प्राचार्य डॉ.रवींद्र हरिदास यांच्यासह अनेक अधिकारी व चित्रकार उपस्थित होते.

नागपूर मध्यवर्ती संग्रहालय (अजब बंगला) येथे हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. डॉ. जया वाहने आणि डॉ. रवींद्र हरिदास यांनी या उपक्रमाची माहिती मंत्री महोदयांना दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त “75 दिवस – 75 कलाकार – 75 चित्रे – 75 गावात प्रदर्शने” अशी या “चित्र अमृत” प्रदर्शनाची संकल्पना आहे. ही सर्व चित्रे स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित घटना वा व्यक्तींची आहेत. तसेच स्वतंत्र भारताला उंची गाठून देणाऱ्या व्यक्ती व घटनाही यात आहेत.