अनैतिक संबंधांच्या संशयातून खून; मृतदेह रेल्वे रुळावर फेकला!

  90

  ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  नागपूर(दि.14जुलै):-पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयातून पतीने साथीदारांच्या मदतीने युवकाचा खून केला. त्यानंतर अपघाताचा देखावा निर्माण करण्यासाठी त्याचा मृतदेह कळमना रेल्वे रुळावर फेकला. ही धक्कादायक घटना कळमना येथे घडली.

  पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून सूत्रधाराला अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार फरार आहेत.
  प्रमोद तेजराम उदापुरे (वय ३५, रा. चिखली झोपडपट्टी, कळमना),असे मृताचे तर सतीश उर्फ दादु वाघमारे (वय वय २५,रा.चिखली झोपडपट्टी),असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार साहिल व अंकित या दोघांचा पोलिस शोध घेत आहेत.

  प्रमोद हा कळमना बाजारात मजुरी करायचा. दादू व त्याचे साथीदारही मजूर आहेत. दादू व प्रमोद शेजारी राहातात. प्रमोद याचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय दादूला आला. यावरून दोघांमध्ये वादही झाला. रविवारी दादू, प्रमोद व त्याचे साथीदार दारू प्यायले. प्रमोद घरी गेला. काही वेळाने प्रमोद हा दादूच्या घरासमोर आला. त्याने दादूकडे रागाने बघितले. प्रमोद आपला ‘गेम’ करेल,अशी भीती दादूला वाटली. त्यातून साथीदारांच्या मदतीने दादूने प्रमोदचा खून करण्याचा कट आखला. प्रमोद याला मारहाण केली. दगडाने त्याचे डोके ठेचले. त्यात प्रमोद बेशुद्ध झाला. त्यानंतर तिघांनी प्रमोद याला मोटरसायवर बसविले आणि पुलावरुन प्रमोद याला रेल्वे रुळावर फेकले. यात प्रमोद याचा मृत्यू झाला.

  याप्रकरणी नागपूर येथील कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान तिघांनी प्रमोदची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी दादू याला अटक केली. साथीदारांच्या मदतीने प्रमोदचा खून केल्याचे दादूने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दादूला अटक केली.