चक्क महिलांचा जुगार अड्डा; रंगला होता ‘अंदर बाहर’चा डाव!

81

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(14जुलै):-पोलिसांना माहिती मिळाली, त्यांचा अगोदर विश्वासच बसला नाही, पण खात्री करून घेण्यासाठी छापा टाकला तर कोल्हापुरातील टेंबलाई नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा मालकिणीसह चक्क पाच महिला जुगार खेळता आढळल्या. ‘अंदर बाहर’ नावाचा जुगार या खेळणाऱ्या या महिलांसह अन्य दोघांना पोलिसांनी अटक केली. पण या कारवाईने पोलीसही चक्रावून गेले. महिला चक्क जुगार खेळतात, तेही कोल्हापुरात हे प्रथमच उघडकीस आले.

राजारामपुरी परिसराला लागून असलेल्या टेंबलाईवाडी नाका झोपडपट्टीत जुगार अड्डा चालतो, अशी माहिती राजारामपुरी पोलिसांना मिळाली. शोभा हेगडे ही महिला हा अड्डा चालवते आणि तेथे महिला जुगार खेळतात, अशी माहिती खबऱ्याने दिली. पण पोलिसांना ते पटले नाही. कारण अनेक महिला मटका घेतात, गावठी हातभट्टीच्या दारू अड्डे चालवतात, पण कोल्हापुरात जुगार अड्डा महिला चालवतात, हीच माहिती पोलिसांना नवीन वाटली. त्यांनी दुपारी त्या अड्ड्यावर छापा टाकला. तेव्हा चक्क मालकिणीसह पाच महिला व दोन पुरूष जुगार खेळत बसले होते. या सर्वांना अटक केली.

कोल्हापुरात मटका, जुगार पूर्णपणे बंद आहे, असा पोलिसांचा दावा आहे. पण अनेक ठिकाणी तो राजरोसपणे सुरू आहे. लॉकडाऊन च्या काळात तर त्याला आणखी ऊत आला आहे. दुपारच्या वेळी तर चक्क महिलाच जुगार खेळत आहेत. कोल्हापुरातील या कारवाईने पोलीसही चक्रावले आहेत. या प्रकारची ही पहिलीच कारवाई आहे. अशा पद्धतीने आणखी कुठे जुगार अड्डा सुरू असेल तर माहिती द्यावी, त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे यांनी सांगितले.

या कारवाईत शोभा संजय हेगडे, निलम विजय कांबळे, वर्षा इकबाल लोंढे, भिंगरी अविनाश सकट, सुरेखा राजू नरंदेकर, सुनील संभाजी जाधव, करीम मोहिद्दीन खान यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून सहा हजार रूपये रोख,दोन मोबाइल आणि जुगार खेळण्याचे साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई शहर पोलीस उपअधीक्षक प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक नवनाथ घोगरे यांनी केली.