डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम

31

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि. 20जानेवारी):- मराठी भाषा विभाग, भाषा संचालनालय, मुंबई आणि डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर तर प्रमुख वक्ते म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड उपस्थित होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संजय बेले, भाषा संचालनालयाचे विभागीय सहाय्यक संचालक हरेष सुर्यवंशी, समन्वयक स्नेहा पुनसे, मराठी विभाग प्रमुख डॉ. विजया गेडाम, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

‘मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. बन्सोड म्हणाले, चंद्रपूर हे चळवळीचे केंद्र आहे. डॉ. आंबेडकरांनी नागपूरला दीक्षा घेतल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या अनुयायांना चंद्रपूरात दीक्षा दिली. या जिल्ह्यात कला, संस्कृती, पर्यावरणप्रेमी, साहित्यिक, शैक्षणिक विचारवंत, समाजसुधारक, नाट्यकलावंत आदी जन्माला आलेत. अभिमान बाळगावा असा हा चंद्रपूर जिल्हा आहे. चंद्रपूरचे वैभव जगाला कळू द्या. विद्यार्थ्यांना आकाश ही मर्यादा आहे. बोलीभाषेत किंवा ज्या भाषेत शब्द सुचतात त्यावर लिहा. साहित्य हे कधीच मर्यादीत राहात नाही, असे त्यांनी सांगितले.

तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दहेगांवकर म्हणाले, तंजावरपासून अटकेपर्यंत मराठी साम्राज्य होते. मराठी भाषेचा इतिहास फार मोठा आहे. भारूड, अभंग, ओवी, गजल, पोवाडा, लावणी, बखर, पोथी, लोकगीत, गोंधळ, दंडार ही मराठी भाषेची देण आहे. आपल्या साहित्याचे आणि संस्कृतीचे संवर्धन करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक संचालक हरेष सुर्यवंशी यांनी केले. संचालन सुशील सहारे यांनी तर आभार डॉ. विजया गेडाम यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.