कमलापूरवासी तब्बल ३५ वर्षापासून नाल्यातील पाणी पितात

29

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)

जिवती(दि.25जानेवारी):-तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले भारी पासून अवघे चार किलो मिटर अंतरावर असलेल्या या कमलापुर गावाची हकीकत अगदी मनाला चटका लावून जाणारी आहे.गावातील नागरिक मोतीराम राय सिडाम यांनी सांगितले की गावाला बसून पस्तीस पेक्षा जास्त वर्षे झाली ? आता गावाची परिस्थिती पाहिली तर अत्यंत गंभीर आहे.गावात लोकसंख्या सत्तर ते अंशी आहे.गावातील शाळा कधीच बंद झाली.गावात ग्राम पंचायत कडून केवळ तीस मीटर काँक्रिट रोड तयार करण्यात आला आहे.त्यामुळे पावसाळ्यात गावात चिखलाचे साम्राज्य असते.

गावात सहा महिन्यांत एखादे वेळी ग्राम सेवक येतात तेही तर कधी कधी वर्षभर येत नाही.आम्हला घर पट्टी चे काम पडले की आम्हीच ग्राम पंचायत ला जाऊन घर टॅक्स भरत असतो.आम्ही नाल्यातील पाणी पितो आणि पाणी पट्टी मात्र दरवर्षी घेतली जाते असे लक्ष्मीबाई यांनी सांगितले.पूर आला की नदीत पाण्यासाठी यावे लागते कधी कधी पूर स्थिती गंभीर असताना जीवाची बाजी लावून पाणी भरावे लागते.

वरून पाण्याची लाट कधी येईल अन कधी घेऊन जाईल अशी स्थिती झालेली असते.असे पाणी पिऊन आम्ही वर्षभर कोणत्या ना कोणत्या बिमारीशी झुंज असते.गाव बसल्यापासून केवळ एकदा पाण्यासाठी बोअरवेल मारली होती तिला पाणी लागले नाही.त्यानंतर नदीत विहीर खोदली मात्र त्यावरून पुराचे पाणी वाहून जाते आणि ती विहीर जमिनीपासून सात फूट उंच आहे. त्यामूळे तळे उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण झाली आहे असे भगवंतराव सलाम यांनी परिस्थिती सांगितली.आदिवासी समाजाकरीता शासनाकडून खूप योजना राबविल्या जातात पण आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पिण्यासाठी योग्य पाणी मिळत नाही तर हे स्वतंत्र कसले असे.मोतीराम राय सिडाम यांनी सांगितले.