देशाची शान, भारतीय संविधान

29

जगातील सर्वात जास्त विविधता असलेला भारत हा एकमेव देश आहे. भारतामध्ये रंग, रुप, उंची, जात, धर्म, पंथ,वर्ण, खान पाण राहणीमान, बोलीभाषा, संस्कृती, उपासना प्रत्येक बाबींमध्ये विविधता आढळते. या विविधतेला एकत्रीत करून आदर्श देशाची निर्मीती भारतीय संविधानाने केलेली आहे. भारतीय संविधान व भारतीय लोकशाही ला जगामध्ये एक आदराचे स्थान निर्माण झालेले आहे. सर्वात मोठे लिखित संविधान आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेले एकमेव राष्ट्र म्हणजे भारत आहे. भारतीय संविधान तयार करणे हे अत्यंत कठीण व बौद्धिक मेहनतीचे काम होते. बौद्धिक मेहनत घेणारा, देशाप्रती प्रामाणिक व माणसाप्रती इमानदार असलेला विद्वानच हे निर्माण करू शकत होता. म्हणून अनेक उच्च वर्णीय धर्माच्या ठेकेदारांनी, विषमतेच्या पालकांनी एक गोष्ट ठरवून घेतली होती ती म्हणजे घटना समीती मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना येऊच द्यायचे नाही. ते का येऊ द्यायचे नाही तर याचे उत्तर धर्मग्रंथात दडलेले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर अतिशुद्र वर्णातील अस्पृश्य समाजातील, आणि मनुस्मृती सांगते शुद्रवर्णातील कितीही विद्वान व्यक्ती असेल तर तो पूजनीय, वंदनीय नाही. शुद्रांनी फक्त वरच्या तिन वर्णाची सेवा करायची , त्यांना शिकवायचे नाही कारण शिकवण्याचा अधिकार एका वर्णाने स्वतः कडे ठेवून हजारो वर्षांपासून त्यावर मक्तेदारी निर्माण केली.

म्हणून अस्पृश्य समाजातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जर घटना समीतीमध्ये आले तर त्यांच्या सोबत बसावे उठावे लागेल, त्यांचे किमान ऐकुन घ्यावे लागेल आणि हे सर्व करताना धर्म बुडेल. धर्म वाचवण्यासाठी का होईना पण डॉ बाबासाहेब आंबेडकर हे घटना समितीमध्ये येऊ नये म्हणून अनेक कटकारस्थान केले गेले. परंतु भारत देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एवढा प्रामाणिक, देशाप्रती व मानसाप्रती इमानदार, आणि विशेष म्हणजे कायद्याचा विद्वान, आणि जबाबदार व्यक्ती यांना शोधूनही सापडेना म्हणून एकमेव पर्याय म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वता, प्रामाणिक पणा, आणि देशाविषयी असलेली निष्ठा यावर शत्रुला देखील शंका नव्हती म्हणून फक्त घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घेतले नाही तर देशाच्या घटनेचा अर्थात संविधानाचा मसुदा बनवण्याची अंत्यत महत्वाची जबाबदारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना द्यावी लागली ती केवळ आणि केवळ त्यांची विद्वता, प्रामाणिक पणा व देशनिष्ठा बघुनच. देशामध्ये वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था, आणि विषमता एवढी माजली होती की मानुसकी ला काळीमा फासणाऱ्या गोष्टी देशात जाहीर होत होत्या त्या आजही थांबल्या असे नाही पण आज संविधानीक संरक्षण आहे हेच सर्वात मोठे परिवर्तन आहे.

अस्पृश्यतेमुळे, जातीय द्वेषामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गात बसण्याची मुभा नव्हती, शाळेतील पाणी पिण्यास मनाई होती, अशा प्रकारे अनेक मनाला चटके लावणाऱ्या गोष्टी होत्या ज्यामुळे माणूस असुन माणसे माणुसकीने वागत नव्हते. त्याचे चटके सहन केलेल्या विद्वानालाच त्या देशाचे संविधान लिहण्याची जबाबदारी मिळाली ही विषमतेवर, वर्णव्यवस्थेवर आणि विसमतेच्या पालकावर खूप मोठा घनाघात होता. ज्या व्यवस्थेने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर अन्याय केले, विकासाचे द्वारे बंद केले होते त्याच व्यवस्थेला न्याय, व त्यांच्या ही विकासाची द्वारे उघडून देशाला मानुसकी आणि मानवतेची देन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली. आणि हे जगातील एकमेव आदर्श उदाहरण आहे. स्वतः विषमतेचे चटके सहन करणाऱ्या महामानवाने देशात समता प्रस्थापित केली आहे येथील दबलेल्या, पिळलेल्या, उपेक्षित, दूर्लक्षीत घटकांना समोर येण्याची संधी निर्माण झाली. आणि याच संधिचा फायदा घेऊन शेती करणारा शेतकरी देशाच्या संसदेत गेला, गावाबाहेर भटकंती करणाऱ्यांचे मुल कलेक्टर, कमीशनर झाले, अस्पृश्य समाजातील लोक देशाचे नियोजन करू लागले. आणि ज्यांना दरवाज्याची चौकट ओलांडता येत नव्हती, पुरुषांच्या दबावाखाली राहून फक्त घरच सांभाळावे लागत होते अशा महिला राष्ट्रपती बनून देश सांभळत आहेत हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या देशाच्या मानवतावादी संविधानामुळेच. आणि म्हणून देशाचा मान भारतीय संविधान आहे.

संविधानाच्या अगोदर स्त्रियांची परिस्थिती बघितली तर स्त्रिला गुलामच नाही तर पशु सारखे जिवन जगावे लागत होते. स्त्रियांवर येथील समाजाने अमानुष अत्याचार केले आणि स्त्रिला कधी माणूस म्हणून वागवलेच नाही. सावित्रीमाई फुले यांनी स्त्रियांसाठी जेव्हा पहीली शाळा सुरू तेव्हा स्त्रि शिकली म्हणजे धर्म बुडतो म्हणून सावित्रीमाई फुले यांना महिलांना शिक्षण देऊ नये, त्यासाठी अडथळा निर्माण व्हावा म्हणून सावित्रीमाई फुले यांच्या अंगावर शेण माती, घरातील खरकटे पाणी टाकून अवमानीत केले जायचे. जी महिला महिलांना शैक्षणिक प्रवाहात आणुन महिलांचे जिवन प्रकाशमय करण्यासाठी समोर येते त्या महिलेच्या अंगावर शेणमाती फेकणे हा कोणता, धर्म आणि हि कोणती संस्कृती होती. आणि विषेश म्हणजे महात्मा जोतिबा फुले हे मोठे उद्योजक होते, सुशिक्षित होते. महात्मा फुलेंकडे पैशाची अडचण नव्हती. अशा सुशिक्षित व उद्योगपतीच्या पत्नीला म्हणजे सावित्रीमाई फुले यांच्यावर येथील धर्म व्यवस्थेने शेण फेकले परंतु संविधान लागु झाले आणि महिलांना शिकवणाऱ्या सावित्रीमाई फुले यांच्या फोटोवर फुले वाहून सन्मान झाला आणि सावित्रीमाई फुले यांच्या शैक्षणिक मार्गाने जाणाऱ्या महिलांचा आदर सत्कार हा फुलांनी केला जातो हि देन डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची आहे.

घरामध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम वागणूक दिली जायची. राहणीमानापासुन तर खामपान पर्यंत महिलांना दुय्यम आणि हिन वागणूक मिळत होती. घरातील पुरुषांना चेहरा ही दाखवण्याचे स्वातंत्र्य नव्हते. घरातील पुरुष व्यक्ती जेवल्यानंतरच महिलांना उरलेले वा शिळे अन्न खावे लागे, परंतु आज महीला पुरुषांप्रमाणे पोशाख, पुरुषांबरोबर आहार, घराबाहेर स्वतंत्र व संरक्षित विहार करू शकतात ते फक्त आणि फक्त भारतीय संविधाने. एवढेच नव्हे तर ज्या महिलांना घरातील व्यवहारात लक्ष देऊ आपले मत मांडता येत नव्हते आता महिला देशाच्या अर्थ मंत्री होतात. घरातच नव्हे देशात काय करायला पाहिजे आणि काय करू नये यावर परखड, निर्भिड मत मांडतात, कोणत्याही ठिकाणी शासकीय पातळीवर नोकरी करत असताना पुरुषांएवढाच पगार महिलांना मिळतो हा अधिकार बहाल केला भारतीय संविधानाने. कोणत्याही क्षेत्रात महिला कार्यरत असेल. मातृत्व हे निसर्गाची देण आहे म्हणून तिच्या मातृत्वाचा तिच्या आर्थिक आणि वैयक्तीक जिवनावर कोणताही परिणाम होऊ नाही म्हणून पगारासह प्रसुती रजा देऊन महिलांच्या मातृत्वांचा देखील सन्मान भारतीय संविधान करते हीच सर्वात मोठे संरक्षण स्त्रियांना मिळाले आहे.

गावकुसाबाहेर राहणारा असो मोठ्या शहरात मोठ्या इमारतीमध्ये राहणारा असो, कार्यालयातील प्रथमवर्ग अधिकारी असो वा चतुर्थ श्रेणी कर्मचारी असो, शिक्षीत असो वा अडाणी असो, महिला असो वा पुरूष असो प्रत्येकाच्या मताला एकच किंमत देऊन प्रत्येक नागरिकांना स्वाभिमान, सन्मान बहाल करणारे भारतीय संविधान जागतिक अभ्यासाचा विषय आहे. ज्यांना व्यवस्थेने गावाच्या बाहेर ठेवले अशाही समुहाला भारतीय संविधानाने गावात तर आणले, त्यांचे गावात घरे झाली, मुले शिकले, प्रवाहामध्ये आली, ज्यांना गावात येता येत नव्हते त्यांना विधान सभा लोकसभा मध्ये जाण्याची आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांच्या हिताचे कामे करण्याची संधी निर्माण करून दिली आणि त्यांच्या सन्मानही केला. भारताच्या संविधानाचा आपण सखोल अभ्यास केला आणि इतिहास वाचला तर प्रत्येक नागरिकांना ज्यांच्या मध्ये प्रामाणिकता आहे त्यांना संविधान स्वतः च्या विकासाचा सर्वात मोठा मार्ग आहे याची जाणीव होईल. भारताचे संविधान जरी दोन वर्षे अकरा महिने, अठरा दिवसात तयार झाले असले तरी हे तयार होताना दोन हजार वर्षांपासुन चालत आलेल्या अन्याय, अत्याचार, विषमतावादी व्यवस्थेला सुरुंग तर लावलाच. परंतु देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचा, त्या नुसार उपासना करण्याचा अधिकार प्रत्येक धर्माला दिला. परंतु देशात कोणत्याही धर्माला महत्त्व न देता माणसाला महत्व देऊन प्रत्येकाची ओळख भारतीय असेल. म्हणून देशात जरी अनेक धर्म असतील तरीही आमची ओळख फक्त भारतीय आहे. अशा प्रकारे विविधते मध्ये एकता प्रस्थापित करून मानसाला माणुसकी सोबत विकासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहचवणारे भारतीय संविधान आहे. आणि तेच खऱ्या अर्थाने देशाची शान आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या मंगलमय सदिच्छा
**************************************
✒️विनोद पंजाबराव सदावर्ते(समाज एकता अभियान
रा. आरेगाव ता मेहकर)मो:-9130979300
**************************************