नात्यातील सुरेल सबंधासाठी जोडीदाराची विवेकी निवड आवश्यक – प्रा हरीश पेटकर

36

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि. 28 जानेवारी):-स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ़ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स, ब्रम्हपुरी येथे महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती, महिला अध्ययन केंद्र, विद्यार्थी विकास विभाग, रा. से. यो. विभाग, एन. सि. सि. विभाग तथा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने नात्यातील सुरेल सबंधासाठी जोडीदाराची विवेकी निवड या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवश कांबळे यांनी भूषविले होते. या कार्यक्रमात प्रमुख संवादक म्हणुन प्रा. माधुरी झाडे, समाजशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ़ सोशल वर्क, वर्धा तसेच प्रा. हरीश पेटकर, समाजशास्त्र विभाग प्रमुख, सीपना कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चिखलदरा, महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती व महिला अध्ययन केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे विचारमंचावर उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.देवश कांबळे यांनी समाजात उच्च शिक्षित जोडप्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे कारण जोडीदाराविषयी असलेल्या दोघांच्याही आशा, अपेक्षा आणि कल्पना अवास्तवपणे वाढलेल्या आहेत असे विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे मुख्य संवादक प्रा. माधुरी झाडे आणि प्रा. हरीश पेटकर यांनी विद्यार्थ्यांशी हसत खेळत संवाद साधत वैवाहिक आयुष्य सुखी, समाधानी आणि आनंदी होण्यासाठी आयुष्याच्या जोडीदाराची निवड करताना आपण आपल्या विवेकी बुद्धीचा वापर करायला हवा. परस्पर शारीरिक आकर्षण आणि वास्तविक प्रेमाची अनुभुती यातील मूलभूत फरक समजायला हवा. कोणीही परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा धनी राहू शकत नाही म्हणुन सर्वप्रथम प्रत्येकाने स्वतःलाच आरशात पाहावे आणि स्वतःलाच निःपक्षपातीने तपासावे, आपल्यातील गुण-दोष याविषयी सजग होऊनच आपल्या भावी जोडीदाराविषयी स्वप्ने रंगवावी. जर आपण आपल्या जोडीदाराला त्याच्या गुणदोषासह पूर्णपणे स्विकारले तरच सहजीवन सहज आणि सुंदर आहे. अन्यथा पद, प्रतिष्ठा, पैसा असूनही व्यक्ति केवळ कौटुंबिक आयुष्यातच नव्हे तर सामाजिक आयुष्यातही बेचैन, असमाधानी आणि वैफल्यग्रस्त राहू शकतो असे प्रतिपादन करून जोडीदाराची निवड करताना आपला विवेक जागृत ठेवावा असे आवाहन केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला तक्रार निवारण समिती व महिला अध्ययन केंद्राच्या समन्वयक प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. तुफान अवताडे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. राजेश कोसे तसेच एन. सि. सि. विभाग प्रमुख लेफ्टनंट सरोज शिंगाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुफान अवताडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. स्निग्धा कांबळे यांनी तर आभार प्रा. राजेश कोसे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक तथा कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.