परमार्थात मन लावून संतांच्या चरणावर डोके ठेवा मस्तक शांत राहते – राम महाराज डोंगर

31

🔹वै.वामन महाराज गिरी यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास भाविकांचा जनसागर उसळला

🔸श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थानच्या ५१ व्या सप्ताहाची उत्साहात सांगता

✒️बीड प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.29जानेवारी):-संताचे अंतकरण हे विशाल असते. त्यांचे विचार हे महान असतात संताचे आचार,विचार, आपल्या आचरणात आणले पाहिजेत. वै. ब्रम्हानिष्ठ गुरुवर्य वामन महाराज गिरी सिद्ध हस्त पुरुष होते. पंचक्रोशीतील समाजासाठी ते शेवटपर्यंत झिजले म्हणून अशा सिद्ध हस्त महान संताची पुण्यतिथी करावी लागते. असे गौरवोद्गार व्यक्त करून, गोरक्षनाथ गडाची महती दिवसेंदिवस वाढत आहे. संत हे समाजाच्या कल्याणासाठी काम करतात म्हणून आपल्या कल्याणासाठी परमार्थात मन लावून संतांच्या चरणावर डोके ठेवा. संत चरणांवर मस्तक शांत राहते असे प्रतिपादन ह.भ.प.राम महाराज डोंगर यांनी व्यक्त केले.

श्रीक्षेत्र गोरक्षनाथ संस्थान, कुंभेजळगाव (ता.गेवराई) येथे वै.ब्रम्हनिष्ठ गुरुवर्य महंत ह.भ.प.वामन महाराज गिरी यांच्या ५१ व्या पुण्यतिथीनिमित्त सुरु असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची महंत ह.भ.प दत्ता महाराज गिरी यांच्या अध्यक्षतेखाली ह.भ.प.राम महाराज डोंगर यांच्या काल्याच्या किर्तनाने उत्साहात सांगता झाली यावेळी ते बोलत होते. यावेळी कीर्तनाच्या सुरवातीला संस्थानचे महंत गुरुवर्य दत्ता महाराज गिरी यांची भाविकांनी गडाच्या परिसरात ढोल ताशांच्या तसेच टाळ मृदगांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले. यावेळी आ.निलेश लंके यांच्या पत्नी सौ.राणीताई लंके, माजी सभापती युध्दाजीत पंडित, मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोटे, तालुकाध्यक्ष जयदीप गोल्हार, रासपचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर महाराज वाघमोडे, रामेश्वर महाराज राऊत, किसन महाराज आहेर, गोविंद महाराज, कैलास महाराज गिरी, संजय काळे, श्याम गायकवाड, धनंजय जोगदंड, दादाभाऊ घुगे, रामबप्पा लेंडगुळे, किरण आहेर, यांच्या सह संत – महंत व विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना राम महाराज म्हणाले की वै. ब्रम्हानिष्ठ वामन महाराज गिरी हे बंकट स्वामीचे चांगले जवळचे होते. ते योगी पुरुष होवून गेले. संताच्या आधाराने जगणे सुंदर करता येते.एकमेकांवर प्रेम करणे म्हणजे काला, काल्याच्या किर्तनाने शेवट गोड होतो. म्हणून, परमार्थात भक्तीतल्या काल्याला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेले असून, काला दोघांमध्ये रंगत आणतो. त्यामुळे, देवाची संगत धरून चालत राहा. कोणत्याही भक्ताला कधीच, काही कमी पडणार नाही. असे विचार राम महाराज डोंगर यांनी मांडले. ज्ञान गिळता आले पाहिजे नसता अहंकार निर्माण होतो. संताचे मन विशाल असते, त्यांच्याशी स्नेह राहू द्या विचार आचाराला महत्त्व आहे. चांगले वागा, भक्तीत मधुरता आवश्यक आहे.

संताने समाजाला सात्विक स्वाभिमान शिकवला. संत चिंतन करत असतात.चिंतन करा, उत्कर्ष होतो. चिंता करू नका. त्याने माणसांना मानसिक त्रास होतो. परमार्थात मन स्थिर राहते. संत चरणांवर मस्तक शांत राहते. संताच्या आधाराने जगणे सुंदर करता येते देवाची संगत धरून चालत रहा. काहीच कमी पडणार नाही असा मौलिक सल्लाही शेवटी बोलताना त्यांनी दिला. कीर्तनानंतर उपस्थित हाजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सांगता सोहळ्यास महिला व पुरुष भाविकांचा अक्षरक्षा: जनसागर उसळला होता.