‘लॉकडाउन नको ना, मग हे करा… अजूनही वेळ गेलेली नाही’

16

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(16जुलै):-अजूनही वेळ गेलेली नाही. नियम पाळले नाही तर प्रशासनाला परत लॉकडाउन घोषीत करावा लागेल. यापासून सुटका हवी असेल तर जबाबदारीने वागा. नियम पाळा. दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करा, असे कळकळीचे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले.
‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली. काही बंधने टाकली. दिशानिर्देश आणि नियमांच्या अधीन राहून दैनंदिन व्यवहार सुरू करण्याची मुभा दिली. मात्र, ज्या दिवशी लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली त्याच्या दुसऱ्या दिवसापासून रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ सुरू झाली. याचाच अर्थ नागरिक नियम पाळत नाही, असे स्पष्ट होऊ लागले. परत लॉकडाउन घोषीत करण्याची वेळ येऊ नये यासाठी महापौरांनी बुधवारी महाल व इतवारी बाजारपेठेतील व्यापारी-नागरिकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले. पाहणी करताना गर्दी आढळून आली. काही दुकानदार स्वत:च मास्क लावलेले नव्हते. महापौरांनी अशांना जाब विचारला. अशा दुकानांवर उपद्रव शोध पथकाने दंड ठोठवावा असे निर्देश दिले. त्यानंतर अशांवर ऑन द स्पॉट दंड ठोठावण्यात आला.

पोलिसाला करोनाची लागण,११ होम क्वारन्टाइन
दरम्यान, नागपूर, सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत एका पोलिस शिपयाला करोनाची लागण झाल्याचे तपासणीदरम्यान समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या संपर्कात असलेल्या दोन पोलिस हेडकॉन्स्टेबलसह ११ कर्मचाऱ्यांना होम क्वारन्टाइन करण्यात आले. यापूर्वी विशेष शाखेतील महिला पोलिस अधिकाऱ्यासह तिघांना तर आर्थिक गुन्हेशाखेतील एका महिला सहाय्यक निरीक्षकाला करोनाची लागणी झाली. दोन्ही शाखेतील २७ पेक्षा अधिक कर्मचारी अधिकाऱ्यांना सुरेंद्रनगरमधील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील विलगीकरण कक्षात हलविण्यात आले.