खा.!खा..!!…अन्न हे औषधासमान खावे, नाहीतर भविष्यात ?

24

मनुष्य जन्म हा खाण्यासाठीच झाला आहे असा मानवजातीचा ठाम समज आहे. निसर्गातील पशू, पक्षी, किटक या भूतलावर अनादी काळापासून जे अन्न खात होते, तेच आजही खात आहेत. लाखो करोडो वर्षांपूर्वी वाघ, सिंह मांस खात होते, ते आजही मांसच खातात, काळ बदलला म्हणून त्यांनी फळे, फुले, पाने खाणे सुरू केले नाही, अगदी तसेच हत्ती, हरिण, म्हैस, शेळी, वगैरे प्राणी तेव्हाही शाकाहारी होते, ते आजही तसेच आहेत.

मानव मात्र आपल्या बुद्धीच्या (अति) वापराने मिश्रहारी झाला. झाडावरून गुहेत गेल्यावर, आणि पुढे आगीचा शोध लावल्यावर, खाण्याच्या प्रगतीच्या पहिल्या टप्प्यात, सर्वात प्रथम मांस व भाजीपाला भाजून, उकळून खाऊ लागला, त्यातून त्याची जिभेची चवच बदलून गेली. आता त्याला कच्चे पदार्थ आवडेनासे झाले, पुढे भाजलेल्या/ उकडलेल्या पदार्थात तो जिभेचे चोजले पुरविण्यासाठी इतर पदार्थ मिसळू लागला, यातूनच मसाल्यांचा शोध लागला. या ग्रहावर मानव सोडून कोणताही प्राणी जेवणात मीठ, मसाला, मिरची वापरत नाही.

आधुनिक काळात विविध पदार्थ बनविण्याचा मानवाने अगदी कहर केला असेच म्हणावे लागेल. जोपर्यंत घरात आजी-आईच्या रूपात अन्नपूर्णा होती तो पर्यंत पौष्टिक, रुचकर पदार्थ मिळत होते. जगात “शेफ” नावाचा प्राणी आला आणि आमच्या जेवणाची दशा बदलून गेली. आम्ही कधीही न ऐकलेले, समजलेले, खाद्य पदार्थ ताटात सॉरी “डिश” मध्ये येऊन पडू लागले, आणि एकंदरीत खाद्य संस्कृतीची वाताहत झाली. आजची तरुण पिढी पुरण पोळी, श्रीखंड, भाकरी, झुणका, वांग्याचे भरीत याना पाहून नाक मुरडते, त्या ऐवजी नूडल्स, पिझ्झा, बर्गर, मोमो आणि पास्ता यांची त्यांना आपुलकी वाटू लागली आहे. जागतिकीकरण (ग्लोबलायझेशन) आमच्या स्वयंपाकघरात घुसून त्याचा ताबा घेईल हे स्वप्नातही वाटले नाही. आज एकविसाव्या शतकात संगणक संस्कृती आली, त्याचा परिणाम म्हणजे शारिरीक कष्ट करण्याची शक्ती जणू संपुष्टात आली आहे. आता एकच काम आहे, दिवसभर खुर्चीत बसायचे आणि हे विदेशी पदार्थ पोटात ढकलायचे.

जगातील मानव सोडल्यास इतर प्राणी (अपवाद मुंग्या, मुंगळे, व मधमाशी) अन्न साठवून ठेवण्याच्या कलेत निपुण नसल्याने, भूक लागली की अन्न शोधण्यास बाहेर पडतात, मिळेल ते खातात व जगतात. हे होताना अनेकदा त्यांना उपवास घडतो किंवा अर्धपोटी रहावे लागते. तसेच पाणी सुद्धा हे सर्व प्राणी-पक्षी गरजेनुसार पितात, त्याचमुळे त्यांच्यात नेहेमी एकप्रकारची चपळाई दिसते.

आज जगात माणसांचा स्थूलपणा प्रचंड प्रमाणात वाढीस लागला आहे, याची कारणे अनेक आहेत, त्यातील प्रमुख कारण म्हणजे सतत खात-पीत राहणे.

उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर सर्व प्राणी शरीरात अन्न साठवू लागले, आणि त्याचा फायदा असा झाला की कित्येक दिवस अन्न न मिळता सुद्धा प्राणी उर्जावान राहू लागले. ती देणगी मानवाला पण मिळाली, पण बौद्धिक संपदेमुळे मानवाने शरीरात अन्न साठवण्यासोबत, घरात अन्न साठवण्याची कला आत्मसात केली आणि घात झाला.

आपल्या सतत खाण्याने, आपले शरीर जास्त मिळालेल्या अन्नाला चरबीत रूपांतरित करून शरीरातील काही भागात साठवून ठेवते. ही चरबी प्रमाणापेक्षा जास्त साचू लागली की शरीर बेढब दिसू लागते, व या वजनदार शरीराच्या हालचाली करण्यासाठी जास्त ऊर्जा लागल्याने, जास्त ऑक्सिजनची गरज भासते, म्हणूनच स्थूलपणा असणाऱ्या लोकांना लवकर दम व धाप लागते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर, शरीर हे यंत्र आहे, यात स्थूल यंत्राची efficiency निम्न दर्जाची ठरते.

(इनपुट) आवक= जावक (आउटपुट) हे समीकरण असेल तर वजन वाढत नाही, म्हणजे शरीरात विनाकारण जास्तीची चरबी जमा होत नाही. जर आवक जास्त झाली तर त्यातून शरीर अतिरिक्त अन्नाला चरबीच्या रूपात शरीरातील विविध भागात साठवण्यास सुरवात करते, त्यात ओटीपोट व मांड्या, हे प्रमुख भाग असतात, जिथे मोठ्या प्रमाणात चरबी साठते.

*”भूक नको पण शिदोरी हवी” या म्हणी प्रमाणे शरीराने चरबीला आपल्या शरीरात शिदोरी रुपात साठवण्याची योजना आखली होती, पण मानवाच्या लोभी वृत्तीने शरीराला कोठार बनवले.*

आता प्रश्न आहे किती, कधी व कसे खावे? याचे सरळ साधे उत्तर हे की “कडकडून भूक लागली तरचं खावे”. भुकेची पहिली घंटा वाजली की लगेच खायला सुरवात न करता, पुढे अर्ध्या तासांनी खाल्ल्यास जिभेला अन्न आवडू लागते, त्यातून मोठ्या प्रमाणात लाळ स्त्रवून अन्न सहज पचते. साधारण, पहिल्या भुकेच्या घंटीनंतर मेंदू शरीरातील चरबीला साखरेत रूपांतर करण्याची आज्ञा देतो, त्यामुळे साचलेली/साठवलेली चरबी वापरात येऊ लागते, ज्यातून जास्तीची चरबी नष्ट होण्यास मदत होऊन वजन आटोक्यात राहण्यास मदत होते. पुढे ताजे अन्न खाल्याने पुन्हा चरबी बनणे सुरू होते, थोडक्यात काय तर शिदोरी संपते व पुन्हा साठवली जाते.

*आपण बौद्धिक रित्या संपन्न झालो असलो तरी, शरीर निसर्ग नियमानुसारच काम करत आहे.*

अन्न विविध रूपात साठवण्याच्या आपण केलेल्या प्रगतीमुळे इतर प्राण्यांच्या सारखे आपल्याला भूक लागली म्हणून अन्न शोधायला जाण्याची गरज नाही, ही बाब लक्षात घेतल्यास कडकडून भूक लागल्यावरच जेवणाच्या सवयीने उपासमारीची वेळ नक्कीच येणार नाही.

आता हे सर्व माहीत असतानाही बहुतेकांना खाण्याचा मोह आवरतच नाही, समोर काहीही येऊ दे, खाण्यास तत्पर असतात, हे ही एक प्रकारचे व्यसनच म्हणावे लागेल, याचे विपरीत परिणाम पचन क्रिया तसेच शरीरावर होतात. मधुमेह अर्थात डायबिटीस या घातक विकाराचे मूळ कारण अती खाणे, अवेळी खाणे, आणि अभक्ष खाणे हेच आहे.

पाणी पिण्याच्या सवयी सुद्धा अतिशय घातक रूपात आजच्या जगात दिसतात. भरपूर पाणी प्या या डॉक्टरांच्या सल्याचा विपर्यास करून अनेक लोकांना मी नको तितके पाणी पिताना बघतो, तेव्हा त्यांची किव करावी वाटते. जसे भूक लागली तरच खावे म्हणतात, अगदी तसेच “तहान लागली तरच पाणी प्यावे”. विज्ञानाच्या प्रगतीमुळे पाणी आपण कुठेही साठवू शकतो, व गरजेनुसार वापर करू शकतो, थोडक्यात इतर प्राण्यांच्या प्रमाणे तहान लागली की पाणवठ्यावर जाण्याची गरज नाही, म्हणून गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शक्यतो टाळावे. अती जास्त पाणी पिण्याने मूत्रपिंडावर (किडनी) कामाचा प्रचंड दबाव येतो. उन्हाळ्यात शरीरातून घामाद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी जाते, म्हणून पाणी जास्त लागते, मात्र हिवाळ्यात व पावसाळ्यात शरीराला पाण्याची गरज कमी असते. त्याच प्रमाणे शारिरीक कष्ट करणाऱ्यांना जास्त पाणी प्यायला हवे, त्यांना स्वाभाविक जास्त तहान लागणार. वातानुकूलित खोलीत व टेबल खुर्चीवर दिवसभर काम करणाऱ्यांना तितके पाणी लागत नाही. सारांश हाच की, प्रत्येकाने खाण्यापिण्याच्या बाबतीत स्वतःचे अवलोकन स्वतःच केले पाहिजे.

अन्न-पाणी हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याचे तितकेच सेवन करावे जितके शरीराला आवश्यक आहे.

कुठेतरी लिहिलेलं आठवले, *”अन्न हे औषधासमान खावे, नाहीतर भविष्यात औषध हेच अन्न म्हणून खावे लागेल.”*

✒️विजय लिमये(मो:-9326040204)