राजकीय नेत्याने केले शेतकऱ्याच्या जमिनीवर अतिक्रमण

  42

  ?विठाबाई घुगुल या वयोवृद्ध महिलेने मांडली पत्रकार परिषदेत कैफियत
  ?तत्कालीन तहसीलदार यांनी 50 रुपये प्रतिदिन दंड वसूल करण्याचे दिले होते आदेश
  ?सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे पत्राची शासनदरबारी साधी दखलही नाही
  ?शेवटी जगाच्या पोशिंद्यानें जगावे कि फासावर लटकावे ?
  ?आयुष्याच्या उत्तरार्धात 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेचे अश्रूपूर्वक कथन

  ✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  चंद्रपूर(दि.16जुलै):-राजुरा तालुक्यातील माथरा येथील आपल्या वाडवडिलांपासून शेतीची लागवड करीत असलेल्या जमिनीवर गावातील हरिदास झाडे या राजकीय नेत्याने जबरीने, खोटी माहिती देऊन व तलाठ्याला मॅनेज करून आपल्या जमिनीवर ताबा घेतला आहे. सर्व कागदपत्रे असतानाही आपल्याला प्रशासन न्याय देत नसून उलट माझ्या मुलाला व त्याचे मित्रांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. या प्रकरणी आपली शेती मिळवून देऊन आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी माथरा येथील श्रीमती विठाबाई काशिनाथ घुगुल या पंच्याहत्तर वर्षीय वयोवृद्ध महिलेने पत्रपरिषदेत केली आहे.
  राजुरा तालुक्यातील माथरा गावाजवळील मौजा खैरगाव येथील सर्वे क्रमांक 22 (जुना भूमापन क्रमांक 20 ), आराजी 5.77 हेक्टर आर या जमिनीवर अर्जुना देवाळकर हे सन 1966 पासून 1986 पर्यंत अतिक्रमक म्हणून स्वतः शेती कसत होते. अर्जुना यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची विवाहित मुलगी विठाबाई ही या शेती वर कास्त करून आपली उपजिविका करीत असे. सन 1986-87 व 1987-88 मध्ये सम्पूर्ण शेत विठाबाई कडे होते आणि त्याची नोंद सातबारा व गाव नमुना ई यावर आहे. सन 1988-89 मध्ये अचानक श्यामराव घोंगडे याचे नाव अतिक्रमक म्हणून दर्शविण्यात येऊन त्याने दोन हेक्टर जमीन ताब्यात घेतली. या शेतावर माझी वाहीती आहे, हे अधिकाऱ्यांना सांगून काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर उरलेल्या 3.77 हे.आर. वर विठाबाईची कास्त होती. दिनांक 9 फेब्रुवारी 2015 ला विठाबाईला त्यांचे अतिक्रमण नियमित करण्याबाबत राजुरा उपविभागीय अधिकारी यांचेकडून पत्र आले. त्याच्याच निर्देशानुसार 16 एप्रिल 2015 ला जमिनीची मोजणी करण्यात आली. त्यात 3.43 हेक्टर आर वर विठाबाई चा ताबा दर्शविला असून त्याची ‘क’ प्रत त्यांचेकडे आहे.
  या शेतामध्ये जुलै 2015 मध्ये कापूस पेरलेले असताना राजकीय नेते हरिदास झाडे, तलाठी नामदेव मेश्राम व इतर काही लोक विठाबाई च्या शेतात आले आणि ही जमीन माजी सैनिकाला देण्यात आल्याचे सांगितले. तलाठी सोबत असल्याने विठाबाईला हे खरे वाटले. परंतु लवकरच ही जमीन कोणत्याही माजी सैनिकाला दिली नसून तेव्हाचे राष्ट्रवादी पक्षाचे राजुरा तालुकाध्यक्ष व आताचे भाजप नेते हरिदास झाडे यांचे अतिक्रमण असल्याची खोटी नोंद करण्यात आली. यानंतर विठाबाईने अनेक वेळा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजविल्या.
  चौकशीत तत्कालीन तहसीलदार यांनी झाडे यांचे विरुद्ध मौजा खैरगांव रिठ येथील शेत सर्वे नं. 22 पैकी आराजी 2.00 हे.आर. जमिनीवर केलेले अतिक्रमण गैरकायदेशीर व अनाधिकृत असल्याचे निदर्शनास आल्याने हरिदास झाडे यांचे विरुद्ध महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 50(2) अन्वये 1000/- (एक हजार रुपये) दंड आकारून सदर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करण्यात येऊन तीन दिवसाचे आत अतिक्रमण काढण्यात यावे, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 50(3) व (4) अन्वये 1000/- (एक हजार रुपये) दंड व प्रतिदिन 50/- (पन्नास रुपये) प्रमाणे दंड वसूल करण्याचा आदेश दि. 26-11-2015 रोजी दिला.
  विशेष म्हणजे, तत्कालीन वित्त आणि नियोजन वन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दि. 26-7-2017 रोजी विठाबाई घुगुल यांचा निवेदनातील नमूद बाबी तपासून मागणीचा पुरतेबाबत आपल्या स्तरावरून झाडे यांचे विरुद्ध उचित कार्यवाही करून कार्यवाहीचा अहवाल तात्काळ सादर करण्याची सूचना दिली होती. पण कुठे पाणी मुरले समझलेचं नाही, झाडे यांचेवर काहीच कारवाई तर झाली नाहीच उलट हरीदास झाडे यांनाच सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली असल्याचा आरोप विठाबाईने केला आहे.
  घुगुल यांनी सामाजिक कार्यकर्ता अशोक राव यांना सांगितली. अशोक राव शेत पाहणी करीता घुगुल यांचे शेतात गेले असता पाहणी करित असतांना हरिदास झाडे यांनी राजुऱ्याचे अपक्ष नगरसेवक व नुकतेच शिवसेनेत गेलेले राजु डोहे व इतर सात-आठ लोक शेतामध्ये घेवुन आले. त्यांना पाहून शेतात वाद होवु नये म्हणुन अशोक राव तिथून निघुन गेले. तरी हरिदास झाडे यांनी अशोक राव व इतर चार लोकांवर तलवारीचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी दिली व शेतीचा ताबा घेतला अशी खोटी तकार राजुरा पोलीस स्टेशन येथे दाखल केली.
  प्रथम माझ्या वडिलांसोबत व नंतर पती सोबत या भूमीत आपण श्रम केले, परंतु आता आयुष्याच्या उत्तरार्ध्यात आपल्याला व आपल्या मुलाला न्याय मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त करीत याप्रकरणी हरिदास झाडे यांची सन 2013-14 पासून एक ई ला घेतलेली नोंद रद्द करून तलाठी मेश्राम व झाडे यांचे वर कारवाई करावी आणि हरिदास झाडे सतत धमक्या देत असल्याने त्यांचेपासून आपल्या जीवितास धोका असल्याने आपण शेतात जाण्यास घाबरत आहोत, म्हणून त्यांना शेतात येण्यास मज्जाव करावा, अशी मागणी डिजिटल मीडिया एसोसिएशन येथे आयोजित पत्र परिषदेत विठाबाई काशिनाथ घुगुल या वयोवृद्ध महिलेने केली आहे. पत्रपरिषदेला बंडू घुगुल, बापूजी घुगुल, सदाशिव गाडवे उपस्थित होते.