प्रभाकरा… जगण्यातील संवेदनांचा मुक्ताआविष्कार व्यक्त करणारी कविता

30

प्रभाकर तांडेकर ‘ प्रदत्त’ हे एक संवेदनशील कवी आहेत. त्यांचा उर्मी हा पहिला कवितासंग्रह मानवीय भावजीवनाचे विविध पदर उलगडून दाखवणार होता. त्यांनी नुकताच आपला दुसरा कवितासंग्रह प्रभाकरा.. हा मला वाचायला दिला.

अतिशय रोचक व कलात्मक मुखपृष्ठ असलेला हा काव्यसंग्रह वाचकाचे मन वेधून घेते .उगवणारी प्रभा नवमांगल्याचे गीत गात चराचरातील प्राणिमात्रांना जागवत आहे.

प्रभाकरा….हा कवितासंग्रह अत्यंत आशयगर्भी आहे .मुक्तचंद आणि यमकधारी ही कविता वाचकाला वेगळ्या कवितेच्या दुनियेत घेऊन जाणारी आहे. या कवितासंग्रहाची उजळपत्रिका ही अत्यंत परिवर्तनवादी आहे .अंधारातून उजेडाकडे येण्यासाठी झटपटणाऱ्या तमाम जीवांना समर्पित अशी ही पत्रिका कवीच्या मनातील मानवी संवेदनशीलता किती प्रगल्भ आहे त्यांची जाणीव करून देणारी आहे. आपल्या प्रस्तावनेत डॉ.प्रमोद मुनघाटे म्हणतात की ,”प्रभाकर तांडेकर’ प्रदत्त’ यांच्या कविता वाचल्या .कविता हा प्रकार अतिप्रसवनशील आहे कवितेच्या किती परी आणि किती त-हा आहेत. हे अशा अनेक कविता वाचताना जाणवत राहते .कवितेत कवीच्या विशिष्ट क्षणाच्या मनस्थितीची भाववृत्ती प्रकट असते. तर कधी कधी भोवतालच्या दृश्याला तो शब्दात पकडूनच पाहतो. कधी अवतीभवतीच्या माणसाशी तो मनातून अंतःस्थ संवाद करतो”. हे अवतरण कवीची विशालता रेखांकित करते .

कवी प्रभाकर मांडेकर हे जन्मजाणिवाचा आलेख घेऊन आपल्या शब्दाला वाट मोकळी करून देतात .वास्तवगर्भी, चिंतनात्मक विचारांची ही कविता शब्दजंजाळात गुरफटूत नाही. तर ती सामान्य माणसासोबत संवाद साधते. ते आपल्या मनोगत लिहितात की, “माणूस ,माती, मती व महाकाश यातील घट्ट भाऊबंधाशी सांगड घालणारी माझी कविता अशीच अनुरक्त होत संवेदना, धारणा, भावना, वेणा याचे संमिश्र रंग लेवून आपणास समोर येऊ पाहत आहे.” हे त्यांचे मन अत्यंत वाकण्याजोगे आहे. आपल्या कवितेविषयी स्पष्ट बोलणे हा कविता स्थायीभाव आहे .

प्रभाकर या कवितासंग्रहात एकूण बासष्ट कविता आहेत. प्रत्येक कवितेला स्वतःचं विश्व आहे. कवितेचा अर्थ गहन व मानवहितैशी आहे. कुठेही अक्राळविक्राळपणा नाही. जीवनाचे चित्रण करणारा चित्रकार आज कसा नागवला जात आहे .त्याचे संवेदनात्मक भावगर्भ त्यांनी चित्रकार हा कवितेतून साकारलेले आहे. चित्रकाराच्या जीवनाची होणारी वाताहात व तगमग त्यांनी मोठ्या खुबीने प्रस्तुत केली आहे. ते लिहितात की,

आधुनिक तंत्रज्ञानाने मात्र
त्यांच्या पदरी बेकारीचा आहेर दिला उपासमारीने कंपित होऊन लागली त्याच्या जिंदगीची आधारशीला रक्तवाहिन्यांनी गती थंडावली आहे गिर्‍हाईक शोधण्यातच
नजर थकली आहे
बिचारा ! खेटून असतो
पडक्या घराच्या रुंद कोपऱ्यात उदासीनतेत रंगलेला म्लान चेहरा घेऊन
ऑर्डरची पुसटशी वाट पाहत
आणि खुद्द दिसू लागतो
कॅनव्हासवर अवतरल्यासारखा.. चित्राप्रमाणे
निश्चल आणि निर्जीव!

आज देशातील वातावरण कलुषित होत आहे .आपल्या ,परका असा भेद केल्या जात आहे. संविधान लागू होऊनही आज लोकांवर अन्याय होत आहे.अशा अन्याय करणाऱ्या मुजोरवृत्तीचा कवी निषेध करतो. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची ऊर्जा घेऊन नव्या परिवर्तनवादी विचारांची कास धरतो डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक क्रांतीसूर्य नव्या युगाचा निर्माता .बांधून ठेवलेले आयुष्याला मुक्त करणारा मुक्तिदाता. पिढ्यानपिढ्या अवदास आलेल्या मनाला क्रांतीची नवी ऊर्जा देणारे युगप्रवर्तक . कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानून ते बाबासाहेब..! या कवितेत लिहितात की ,

आक्रोशाचे आभाळ पेलत
विकृत वादळांशी लढत
सनातनी विस्तवाला झेलत
मोकळे केल्यास आमचे बंदिस्त श्वास

अव्याहतपणे पेरत गेलास चेतना युगानयुगे थंडावलेल्या आमच्या धमन्या
आणि
जागवली नवी पहाट माणुसकीपणाची
संविधानाच्या पानापानातून…

भारतीय संविधानाने भारत नावाचा नवा देश निर्माण केला. जी व्यवस्था भारतीय माणसाला माणूस मानत नव्हती तिला हद्दपार करून मानवाच्या जीवनाला उजळणारा संविधानसूर्य दिला. या संविधानसूर्यानेच भारत आज प्रगती करत आहेत .पण काही मृत्यूतत्त्वादी संविधानाला बदनाम करतात .वर्तमान व्यवस्था संविधान विरोधी कृत्य करत आहे. तरी आपली न्यायव्यवस्था काही कळत नाही. कवी प्रभाकर दांडेकर हे अन्याय करणाऱ्या वृत्तीविरुद्ध एल्गार पुकारत आहेत .ते चाहूल या कवितेत लिहितात की ,

आम्ही भेदरलो असा गैरसमज
मुळीच वाढवू नका
पूर्वापार झालेल्या अन्यायाविरुद्ध खदखदणाऱ्या ज्वालामुखीच्या उद्रेकाची
चाहूल आहे ही…
नेत्यांनी आज देशात गुलामीच जु पांगरलेला आहे. काही नेते स्वच्छ कपड्यात वाईटकृत्य करत आहेत. काही नेते हे तर अंधार पेरणारे स्वापदेचे आहेत. या नेत्यांच्या भाषणात देशाचा उद्धार ,देशाभिमान दिसते पण अंतरंगात काळोख तृष्णा असते .काळोख या कवितेतून मोठ्या खुबीने त्यांनी मांडलेली आहे.

कालच्या सभेत
पांढ-याशुभ्र पोशाखातला नेता
समाजउद्धाराची भाषा बोलला सकाळी वर्तमानपत्रात
मुग्ध कळीला कुस्करल्याची
काळी बातमी आली…

ही संवेदना कवीच्या हृदयात घट्ट बसून गेली आहे. अशा नेत्यांच्या चौकात फासावर लटकवले पाहिजेत तेव्हाच ही विकृती समाप्त होईल असा आग्रह कवी आहे.

प्रभाकरा… हा कवितासंग्रहातील कविता अंतरंगातील वेदनेचा अविष्कार प्रस्तुत करणाऱ्या आहेत. बाप ,नवा अध्याय ,संत रविदास, आसवे, कावा, सांगाती, प्रभव, चैत्र चैतन्य ,बंध, संकेत ,इस्लाम ,शिस्तभंग या कविता अत्यंत विचार वेधक आहेत. कवी स्वतः शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांच्या समस्येवर उपाययोजना करताना पालकाची भूमिका कशी असते त्याची ओळख शिस्तभंग या कवितेतून करून दिली आहे.

तथागत गौतम बुद्ध हे मानवतावादाचे प्रथम पुरस्कर्ते आहेत. त्यांचा धम्म हा मानवाला नव्या विचारांची ओळख करून देणारा आहे. ते तथागता ! या कवितेत लिहितात की ,

तुझा धम्म म्हंजे मानवतेचा विचार विज्ञान सुज्ञपणा नैतिकतेचा सार
…………………..
तूच या युगातील महान क्रांतिकारी देशोदेशी रोवली मानवी मूल्ये सारी..

ही कविता तथागताच्या विज्ञानवादी विचारांची ओळख करून देणारी आहे. मूलतत्त्ववादी व सनातनित्व विचारांनी हा देश भकास झाला होता. पण आज नवे उजेडगीत नवे पक्षी त्यांच्या विचाराला नकार देत आहेत. प्रभाकर ही कविता कवीच्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडणारी आहे. सकाळचा सूर्य जसा अंधारलेल्या वाटाणा उजेडाची लीपी देते. तसेच कवीचे जीवनही उजेडाचा प्रकाश समाजात पसरवत आहे. त्यांचे आयुष्यातील सोनेरी क्षण ते वाटतात . ते प्रभाकर या कवितेत लिहितात की ,

निशेच्या घनगाभ्यात
समस्त सृष्टी थिजली
उषःकालाच्या लालीने
धुंद पहाट भिजली

वाकलेल्या क्षितिजांची
शामल लेपाची धार
प्राचीचा हा प्रभाकर
चिरत जातो अंधार …

अंधार चिरून जेव्हा प्रभाकर उजळतो तेव्हा सारे सृष्टी प्रकाशमान होऊन जाते. त्या प्रकाशाने आपण दिपून जातो.

प्रभाकरा..हा कवितासंग्रहातील शब्दकडा प्रासंगिक व भावप्रधान आहेत .छांदोग्यबद्ध यमकधारी, मुक्तछंद,ओवी, अभंग अशा सामर्थ्याने ल्याली आहेत. कवीचा पिंड हा मानवतावादी आहे. कवीला माणसाबद्दल कळवळ आहे. समाजात होणाऱ्या अन्याय अत्याचाराने कवी व्याकुळ होतो. समाजाचे काहीतरी देणे आहोत म्हणून ते शब्दांच्या माध्यमातून समाजाला नवसृजनत्व देतात. त्यातून मूल्यनिरपेक्ष समाज निर्माण व्हावा अशी आशा कवीची आहे. प्रभाकरा.. हा कवितासंग्रहातील कविता जगण्यातील संवेदनाचा मुक्त आविष्कार आहे . काही मर्यादा या कवितासंग्रहात जरी असल्या तरी त्या गौण आहेत. कवीने वाचकांपर्यंत आपली कलाकृती पोहोचवून एक दमदार पाऊल मराठी साहित्यामध्ये टाकलेली आहे .कवीची पुढील कविता ही भारदस्त ,वैचारिकता घेऊन येणारी असावी अशी अपेक्षा. याकरिता कवीला लाख लाख मंगल कामाला चिंतितो ….

✒️प्रा.संदीप गायकवाड(नागपूर)मो:-९६३७३५७४००

प्रभाकरा…
प्रभाकर तांडेकर ‘प्रदत्त ‘
संवेदना प्रकाशन,नागपूर
मूल्य १३० रूपये
९४२१८०३४९८