अँड्रॉइड मोबाईल व आॅनलाईन शिक्षण

15

आपण अँड्रॉइड मोबाइल वापरत आहोत म्हणजे आपले वडील गरीब होते. आपण स्वतः खूप कष्ट करून कमाई करत आहोत आणि आपल्या गरीबीमुळे आपण आपल्या इच्छेनुसार शिकू शकलो नाही. त्यामुळे आपणास जे बनायचे होते. ते आपल्या मुलाने बनावे. अशी आपली तीव्र इच्छा आहे. आपली कितीही पैसे खर्च करायची तयारी आहे. पण आपण मुलाला वेळ देऊ शकत नाहीत. आपण आपले स्वप्न साकार करायला निघालात तर हे करा.
मुलांचे मित्र बना.करिअर करण्याच्या नादात घरातील संवाद कमी झाला. घरात टीव्ही आणि मोबाईल आल्यामुळे सिरीयल आणि मित्र-मैत्रिणींसोबत बोलण्यात खूप वेळ घालवतो. अनलिमिटेड टॉकटाईम आणि इंटरनेटच्या सुविधेमुळे व्हॉट्सॲप आणि फेसबुक वर चॅटिंग करण्यात स्वतःला “वेल सेटल”, समजणार्‍या अनेक कुटुंबातील माता आणि पालक व्यस्त आहेत. त्यामुळे मुलाला अँड्रॉइड मोबाइल म्हणजे पर्वणीच होऊन बसली आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक पाहण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. त्यामुळे मुलं अनेकदा विचित्र गेम्समध्ये अडकतात व आत्महत्येकडे वळतात. इंटरनेटवर अश्‍लिल वेबसाईटचे जाळे पसरलेले आहे.
त्यामुळे पालकांनी वेळीच जागरूक होणे आवश्यक आहे व मुलांसोबत संवाद वाढवणे आवश्यक आहे. मुलगा मोबाईलवर अभ्यासाचंच पाहतो की आणखी दुसरं काही हे ही मधून मधून तपासणण्याची सवय ठेवा. आपण मोबाईलमुळे एखादी वाईट घटना घडली की मुलांचा मोबाईल तपासायला सुरुवात करतो. त्यामुळे मुलं मग आपल्याकडे संशयाने पहायला लागतात. अचानकच मोबाईल पहायला सुरुवात केल्यावर त्यांना आपला राग यायला लागतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच मोबाईल तपासण्याची सवय मुलाला होणे आवश्यक आहे. आपले वडील कधीही मोबाईल चेक करू शकतात. असे का आपल्या मुलांना माहित झाले तर मुलं इतर वाईट सवयींमध्ये गुरफटून जात नाहीत.
जबाबदारी झटकू नका. बर्‍याचशा पालकांचं असं होतं की मुलांना मोबाईल घेऊन देतात आणि त्यांच्याकडे संपुर्णतः दुर्लक्ष करतात. परंतु जेव्हा मुलं टोकाची भूमिका घेतात तेव्हा त्यांचे कान उघडतात आणि तेव्हा त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु हातातून गेलेली गोष्ट पुन्हा येणे शक्य नसते.आपला पाल्य मोबाईलवर काय करत आहे हे नेहमी तपासणे पालकांसाठी चांगली बाब आहे.
मुलांची चाचणी कशी घ्यावी?
अगदी सोप्प आहे. आपण जेव्हा बाहेरून आपल्या घरात प्रवेश करतो तेव्हा आपल्या पाल्याकडे नजर टाकावी. जर का त्याची नजर कावरीबावरी झाली नाही तर आपण समजून जावे की त्याचा अभ्यास सुरू आहे. आणि मोबाईलचे कव्हर बंद झाले किंवा मोबाईल वरची बोटं चालू लागली तर समजून जावे की, काहीतरी गडबड सुरू आहे. कारण अभ्यास करणारा मुलगा पालक आल्यावर घाबरून जात नाही किंवा मोबाईल बंद करत नाही.
अँड्रॉइड मोबाईलचा वापर आपल्या नजरेखालीच करू द्या. मुलाच्या अभ्यासात व्यत्यय नको. म्हणून पालकांची इच्छा असते की मुलाला वेगळी स्टडी रूम असावी आणि ही स्टडी रूम नंतर मात्र आपल्यासाठी प्रश्नचिन्ह होऊन बसते.
मुलाला एकांतवास मिळाला की अभ्यासाचा वेळ संपल्यावर तो मोबाईलचा वेगळा उपयोग करायला लागतो.
मोबाईल वापरण्याची वेळ ठरवा.महागडा मोबाईल घेऊन दिला की आपले काम संपले. असे बऱ्याच पालकांना वाटते आता तर मुले दिवसभर घरीच आहेत. त्यामुळे माता- पिता -पुत्र- पुत्री यांनी एकत्र येऊन ऑनलाइन अभ्यासाच्या वेळापत्रका विषयी चर्चा व्हावी व तेवढाच वेळ मोबाईलचा वापर व्हावा. यादृष्टीने नियोजन करावे. नाहीतर पुढील पाच दहा वर्षांत मुलांच्या एकलकोंडेपणामुळे व मोबाईलच्या अतिवापरामुळे मेंदू विकाराचे व मानसिक रुग्णांचे प्रमाण निश्चितच वाढेल. त्यामुळे मेंदू विकार तज्ञ व मानसोपचार तज्ञांकडे रांगाच्या रांगा लागण्यास वेळ लागणार नाही.
मुलांचा कल ओळखा.
आपल्या पाल्याचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हे पाहण्यासाठी लाॅकडाऊन च्या काळात वेळच वेळ आहे. त्यामुळे मुलांचा कल ओळखून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम निवडण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे.
आपले व्यक्तिमत्त्व प्रसन्न बनवा.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा परिणाम आपल्या आपल्यावर व कुटुंबावर निश्चितच होत असतो. त्यामुळे आपल्या दिवसभर केलेल्या कार्याचा तान चेहऱ्यावर न ठेवता प्रसन्न मुद्रेने आपण जर घरी परतलो व कुटुंबातील सदस्यांसोबत आपला थकवा गेल्यानंतर तासाने चर्चा केली तर त्यामुळे कुटुंबातील संवाद आपोआपच वाढेल. आपण घरी आल्यावर आपल्या चेहर्‍यावरील भाव मुद्रा जर चांगली असेल तर घरातील सर्व मंडळी सुखी राहतील. एखादे दिवशी आपणाला जर थकवा आला असेल तर घरातील मंडळींना सांगून द्यावे की मी आज थकलेला आहे. आपण अर्ध्या तासानंतर चर्चा करूया. परंतु असे होताना दिसत नाही त्यामुळे मुलांना आपली भावमुद्रा ओळखायला कधी वेळच मिळत नाही. आपण घरी केव्हा येतो आणि केव्हा बाहेर जातो याच्या निश्चित वेळा मुलांना माहीत नसल्यामुळे मुले बिनधास्त असतात. त्यामुळे आपली बाहेरून येण्याची वेळ निश्चित असेल आणि राहिलेली कामे नंतर केली तर मुले आपापल्या वेळेबद्दल जागरुक राहतात व त्यांना सुद्धा आपल्या हजरजबाबीपणाची सवय होऊन जाते.
आपल्या मुलांच्या जुन्या स्वाध्यायपुस्तिका काढून त्या पूर्ण करून घ्या. कारण आपल्या कामाच्या व्यस्ततेमुळे बऱ्याच मुलांच्या मागील वर्षाच्या स्वाध्यायपुस्तिका अपूर्ण असतात आणि वर्ष संपून जाते. त्यामुळे त्याच्या काही न समजलेल्या बाबी स्वाध्याय पुस्तिका पूर्ण केल्यामुळे समजून जातात. आता घरबसल्या माता-भगिनी त्या स्वाध्याय पुस्तिका पूर्ण करून घेऊ शकतात.
कच्चे दुवे शोधा
मुलं आपले कच्चे दुवे सांगत नाहीत त्यामुळे त्यांचा एखादा विषय तसाच कच्चा राहतो म्हणून पायाभूत संकल्पना स्पष्ट करून घ्या. त्यासाठी अनुलेखन, श्रुतलेखन, शुद्धलेखन, हस्ताक्षर, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, शाब्दिक उदाहरणे अशा गणितीय क्रियांचा सराव घ्यावा.
संकटांना सामना करायला शिकवा
जीवनाचा प्रवास हा दीर्घ पल्ल्याचा असतो. प्रत्येक दिवस हा नवीन आव्हाने, बदल संकटे घेऊन येत असतो कोणत्याही परिस्थितीत निराश न होता नवीन धोरणं ठरवावी लागतात. आज-काल मुलांना एखादी गोष्ट नाही असं म्हटलं तर ती टोकाची भूमिका घेताना दिसतात. “हम दो हमारे दो” च्या काळात “केजी टू पीजी” पर्यंत मुलांना प्रत्येक गोष्ट वेळेवर मिळत असल्याने त्यांना कधी समस्याच जाणवत नाही. पालकही आमच्या वेळी आम्हाला काहीही भेटले नाही पण आपल्याकडे आहे तर मुलांना दिलेच पाहिजे. या मानसिकतेत आहेत. त्यामुळे मुलांना त्या गोष्टींचे महत्त्व वाटत नाही. पण हे सर्व बालवयात ठीक आहे. पण मुलांच्या वयानुसार गरजसुद्धा वाढत जातात. त्या पुरवताना पालकांच्या नाकीनऊ येते. मग त्यांनी अँड्रॉइड मोबाईल साठी मागणी केली आणि दिला नाही तर मुलं पळून जाणे किंवा सुसाईड करण्यासारखे निर्णय घेताना दिसतात. म्हणून त्यांना समस्यांना सामोरे जाणे शिकवा. सुट्ट्यांचा यासाठी आवश्य फायदा होईल. मुलांना उनिवा भासुद्या, तेव्हा त्यांच्यात जाणीवा आपोआपच निर्माण होतील.
मुलांना शिकवू नका त्यांना शिकू द्या.
पालक आपल्या पाल्यासमोरच त्याला आपण किती नामवंत व खर्चिक शाळेत टाकले हे शेजाऱ्यांशी, मित्रांशी सांगत असतात. मी त्याला काहीही कमी पडू देणार नाही असं सांगतात. त्यामुळे मुलांना या गोष्टी आपल्या पालकांकडून इतक्या सहज मिळत असल्यामुळे गांभीर्य वाटत नाही व पालकांच्या इच्छेखातर प्रवेश घेतल्यामुळे ते आपल्या ऑफर वाढवत जातात. म्हणून पालकांना विनंती आहे की, त्यांना त्यांच्या पद्धतीने शिकू द्या. तुम्ही त्यांना शिकवू नका. ज्याप्रमाणं अंडं जेव्हा आतून फुटतं, तेव्हा त्यातून नवीन जीव निर्माण होतो. आणि आपण अंडं बाहेरून फोडलं तर त्यातील जीव गुदमरून मरतो. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी त्याच्या बालमनावर दडपन टाकू नका. त्याला ज्या विषयात गोडी आहे त्या विषयाचा अभ्यास करू द्या.
वेळेचा सदुपयोग करा.
कोरोना महामारीमुळे जो वेळ मिळत आहे. एवढा वेळ पुन्हा कधीच मिळणार नाही. कोरोनामुळे शाळा बंद आहेत. याचा नकारार्थी विचार न करता तुम्हाला तुमच्या पाल्यासोबत जास्तीचा वेळ देण्याची एक उत्तम संधी आलेली आहे. लोकमान्य टिळक बीएला असताना त्यांची तब्येत ठीक राहत नव्हती. म्हणून त्यांनी मध्येच शिक्षण सोडून एक वर्ष व्यायाम केला होता. म्हणजेच यावरून असं लक्षात येतं की, आपल्या पाल्याचे सुद्धा एक वर्ष वाया गेल्यामुळे भले मोठे नुकसान होईल असे नाही.

✒️लेखक:-गजानन गोपेवाड
राज्य समन्वयक महाराष्ट्र
अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य