✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार, जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.18जुलै):-जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक मजबूत करण्यासाठी लवकरच 20 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील आणि वैद्यकीय महाविद्यालयासाठी राज्य शासनाकडून 130 कोटींचा निधीदेखील लवकर मिळविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी दिली.

राणीपुर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ.हिना गावित, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जि. प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, सभापती जयश्री पाटील, अभिजित पाटील, रतन पाडवी, पं. स.सभापती बायजाबाई भिल, दीपक पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.डी.एन.बोडके आदी उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे दुर्गम भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील. लवकरच या केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याचा प्रयत्न करण्यात येईल आणि आरोग्य केंद्रासाठी आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात येईल.

आरोग्य, शिक्षण आणि पाण्याची समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत असून यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. जिल्ह्याच्या दुर्गम भागाचा विकास करण्यासाठी अंदाजपत्रकातही तरतूद करण्यात आली असून आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याने दुर्गम भागात चांगली सेवा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमती वळवी म्हणाल्या, आरोग्य केंद्रासाठी अत्याधुनिक यंत्रणा आणि मनुष्यबळ लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल. एक महिन्याच्या आत साधन सामुग्री आणि रुग्णवाहिका उपलब्ध होईल. या केंद्रामुळे ग्रामीण भागात चांगली सेवा मिळेल.

डॉ.गावित म्हणाल्या, राणीपुर आरोग्य केंद्रामुळे तोरणमाळ येथे येणाऱ्या पर्यटकांना संकटाच्यावेळी तात्काळ सेवा मिळू शकेल. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आरोग्य केंद्राची उभारणी होत असल्याने आरोग्य सेवा अधिक बळकट होईल. राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि आकांक्षीत जिल्हा कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यात आरोग्य सुविधा सक्षम करण्याचा प्रयत्न होत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी पालकमंत्र्यांच्या हस्ते कोनशीला अनावरण करण्यात आले. त्यांनी आरोग्य केंद्राची माहिती घेतली व चांगल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. आरोग्य केंद्राच्या परिसरात ॲड.पाडवी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

महाराष्ट्र, स्वास्थ 

©️ALL RIGHT RESERVED