स्थानिक विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणातून जिल्हयात योगदान देण्याची संधी : पालकमंत्री ना.वडेट्टीवार

32

🔹पालकमंत्र्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.18जुलै): जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी इयत्ता 12 वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेवून चांगल्या पदावर जावून पून्हा जिल्हयातील विकास कामांमध्ये समर्पित व्हा असा संदेश दिला. ही एक संधी समजून, घेतलेल्या शिक्षणातून जिल्हयात योगदान द्या असे ते म्हणाले. जिल्हयाला समर्पित होवून कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची गरज आहे. ती गरज स्थानिक विद्यार्थ्यांना भरून काढता येईल. जिल्ह्यात आज मोठ्या संख्येने असे अधिकारी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून भविष्यात स्थानिक विद्यार्थीही काम करू शकतील. त्यांना शिक्षणातून मोठया प्रमाणात संधी आहे. नोकरी किंवा व्यवसाय करून जिल्हयात चांगल्या प्रकारे योगदान देता येईल. जिल्ह्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही यश संपादन केले आहे. गडचिरोलीत अनेक बदल होत आहेत. शैक्षणिक सुविधा बदलत आहेत. मेडीकल कॉलेज ही लवकरच सुरु होत आहे. दर दिवसी मंत्रालय स्तरावर याबाबत मी पाठपूरवा करत आहे. जिल्हाधिकारी यांचे जिल्हयातील शैक्षणिक सुविधा सुधारण्यासाठी चांगले कार्य आहे. जिल्हयात 5 आय.पी.एस. 5 आय.ए.एस. अधिकारी सेवेत असतात. आता त्यांच्या मार्गदर्शनातून मोठी आभ्यासिकाही सुरु करतोय. यातून वरिष्ठ अधिकारी व इतरांचे मार्गदर्शन जिल्हयातील मुलांना मिळणार आहे असे पालकमंत्री यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील तिनही शाखेतील प्रथम तीन गुणवंत विद्यार्थ्यांना शाल, श्रीफळ देवून पालकमंत्र्यांनी गौरव केला. यामध्ये विज्ञान शाखेतून गायत्री सोनटक्के (96.77 टक्के), धीरज भोयार (96.31 टक्के) व मार्टीना हेमाणी ( 92.77 टक्के), कला शाखेतून वैभव शेरकी (87.84 टक्के), सायली धोरे (84.46 टक्के) व सोनी चक्कावार (84.14 टक्के) तर उच्च माध्य.व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) मधील शाबाद मन्सुरी (80.77 टक्के), ऐश्वर्या राऊत (78.77 टक्के) व सावित्री मंडले (76.31 टक्के), निनाद कांबळे (CBSE) नवोदय – 98%, यांचा समावेश होता. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करताना जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, ॲड.रामहरी मेश्राम जि.प. सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, शिक्षणाधिकारी माध्यमिक राजकुमार निकम, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राघवेंद्र मुनघाटे, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
शिक्षणाधिकारी निकम व मुनघाटे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. प्रास्ताविक आर.पी.निकम यांनी केले. शिक्षक विद्यार्थी, पालक यांचे स्वागतही त्यांनी यावेळी केले. प्रास्ताविकेमध्ये निकम म्हणाले वर्षभर शिक्षण विभागाचे चांगले प्रयत्न, सराव परिक्षा यामुळे 88 टक्के निकाल लागला. गेल्या वर्षी पेक्षा महाराष्ट्रात सर्वांत मोठी आघाडी घेत मागील वर्षात सुमारे 20% टक्के सुधारणा करत 88% निकाल लागला आहे. जिल्हयातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या अंगी खूप चांगले गुण, कौशल्ले आहेत. त्यांना भविष्यात चांगल्या संधी देण्यासाठी शासनकडून प्रयत्न व्हावेत अशी अपेक्षा जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी व्यक्त केली. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार श्री. मुनघाटे, शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी मानले.

चौकट

*दीपक सिंगला, जिल्हाधिकारी* – जिल्हयातील 88% मुलं पास झाली आहेत. उर्वरीत अपयश आलेल्या मुलांनीही पुन्हा प्रयत्न करावेत. आदिवासी बहुल जिल्हयातील मुलांनी शिक्षण सुरु ठेवून आपल्या जिल्हयासाठी आदर्श निर्माण करावा. प्रत्येक विद्यार्थ्यांने आत्मसात केलेल्या शिक्षणाचा जीवनात उपयोग करुन स्व-विकास साधावा. जिल्हयातील मध्यमवर्गीय लोकांना चांगल्या शिक्षणातूनच भविष्यात स्व-विकासबरोबर सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची मोठी संधी आहे असे जिल्हधिकारी दीपक सिंगला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

*महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेतून (महाज्योती) फायदा घ्या – पालकमंत्री*

ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून महाज्योती या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. महाज्योती कार्यान्वित करण्यात येत आहे. ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी विद्यार्थ्यांना पुणे दिल्लीत जाऊन यूपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करताना आर्थिक मदत मिळू शकणार आहे. या संस्थेतर्फे राज्य लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. महाज्योतीमुळे राज्यातील ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी प्रवर्गातील एक हजार विद्यार्थ्यांना दिल्लीत स्पर्धा परीक्षेसाठी शिष्यवृत्ती मिळू शकणार आहे. राज्य लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग आणि इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना आर्थिक मदत यातून मिळू शकेल. उच्च शिक्षण आणि परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, यूपीएससी, एमपीएसी, बँकिंग, एसएससी, एमपीएससी, बँकिंग, एसएससी यासारख्या स्पर्धा परीक्षांच्या शिकवणीसाठी महाज्योती निधी उपलब्ध करेल असे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे सांगितले.