पवित्र भारतीय संस्कृती कोणती?

29

[विश्व महिला दिवस सप्ताह विशेष]

भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथामध्ये स्त्रीचे गुणगौरव केलेले दिसून येते. “यत्र नार्यस्तु पुजंते, रमते तत्र देवता!” या पवित्र संस्कृत विधानाची आपल्याला आता खात्री पटली आहे. आपल्या देशात पुरुषसत्ताक पद्धती आहे, याचा बऱ्याच संधीसाधूंनी विपर्यास केला. स्त्रीला एक भोग्य वस्तू, डावी, गौण, अपशकूनी, अबला अशा आदी उपाध्यांनी तिचे श्रेष्ठत्व मलिन आणि दुबळे केले. परंतु तिच्या महात्म्याचे दर्शन किंवा अनुभूती एखाद्यालाच होते. हे आपण आज छातिठोक सांगू इच्छितो. अशी आपबिती अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरूजी यांनी व्यक्त केली आहे… 

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. संपूर्ण विश्वाच्या पाठीवर इ.स.१९११ साली पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला. दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता. तथापि सन १९१०च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला. भारतीय संस्कृतीत महिलांना अनन्य साधारण महत्त्व आहे. पौराणिक ग्रंथामध्ये स्त्रीचे गुणगौरव केलेले दिसून येते. “यत्र नार्यस्तु पुजंते, रमते तत्र देवता!” या पवित्र संस्कृत विधानाची आपल्याला आता खात्री पटली आहे. आपल्या देशात पुरुषसत्ताक पद्धती आहे, याचा बऱ्याच संधीसाधूंनी विपर्यास केला. स्त्रीला एक भोग्य वस्तू, डावी, गौण, अपशकूनी, अबला अशा आदी उपाध्यांनी तिचे श्रेष्ठत्व मलिन आणि दुबळे केले. परंतु तिच्या महात्म्याचे दर्शन किंवा अनुभूती एखाद्यालाच होते. हे आपण आज छातिठोक सांगू इच्छितो.

घरात जोपर्यंत स्त्रीचा वावर असतो, तोपर्यंतच त्या घरास घरपण असते. म्हातारे लोक म्हणतात त्याप्रमाणे ती देवता- लक्ष्मीच असते. त्या घरात तिच्या सहवासाने जीवंतपणा, शांती, प्रेम, वात्सल्य, दया, नम्रता, हे दैवी गुण ठासून असतात. स्त्रीविरहित घर एकप्रकारचे स्मशान असते. कोरोनाच्या जबरदस्त प्रादुर्भावात सन २०२१मध्ये माझी प्रेमळ पत्नी- आशाताई मरण पावली आणि माझ्या घराची आण, बाण व शान पुरती धुळिला मिळाली. कोना न कोना प्रसन्न वाटणारा तेव्हा अडगळ भासू लागला. सगेसोयरे, शेजारी व समाज यांच्या दरम्यान प्रचंड मोठी दरी निर्माण झाली. त्यांचे पाहुणे म्हणून येणे, बसणे, ऊठणे, हसणे, खिदळणे, बागडणे सारे काही हराम झाले. “अतिथी देवो भवः!” या सुवर्ण क्षणासाठी मन आतुर होऊ लागले.ती माऊली गेल्यापासून घरातील शीतल साऊलीच हरपली, असे वाटत होते. घरात एका पाठोपाठ एक असे चार मांजरीचे पिल्लू पाळून पाहिले, मात्र तीनचार-तीनचार महिन्यांच्या अंतराने बिचारे मरतच गेले.

आपणच महापातकी आहोत की काय? अशी अपराधीपणाची भावना मनात घर करून बसली आहे. घराच्या वळचणीत, खिडकीत किंवा विजेच्या तारांवर आपले घरटे बांधून रोज आनंदाने चिवचिवाट करणारी चिमणीही तेव्हा दिसेनाशी झाली होती. घरात इकडून तिकडे व तिकडून इकडे दिवसात कितीतरी चकरा मारणारी चिचुंद्री पण दिसेल तर शप्पथ! इतका मोठ्ठा फरक आपण त्या घटकेला अनुभवला आहे, हे पांढऱ्या शुभ्र स्पटिकाप्रमाणे सत्य आहे. नेहमी ये-जा करत असणारे आपले अत्यंत काळजीवाहू नातलगसुद्धा ही स्मशान शांतता अनुभवत होते. एवढा फरक काही काळ- दोन वर्षे घरात एकही स्त्री नसल्याने पडलेला दिसला. यावरून आपण सूज्ञ वाचक स्त्रीचे श्रेष्ठत्व मोठे किती? कसे? आणि का? याचा अंदाज अवश्य बांधू शकाल, यात तिळमात्रही शंका नाही!

घरातली क्षुल्लकशी वाटणारी धुणे, भांडी, झाडलोट, स्वयंपाक, पाणी, आदी कामे उरकताना आपल्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. घरबांधणी, घराची मालकी, राशनकार्ड, स्वयंपाकाचे गॅस कनेक्शन आधी सगळी जडावजड जबाबदाऱ्या तिने लिलया पेलल्या होत्या. खरे तर हे सगळे करताना आम्हास रडू कोसळत होते आणि ३३ कोटी देव आठवू लागले होते. वेळेवर आम्ही बापलेक अंघोळ, स्वयंपाक, जेवण, कपडे धुणे कधी केले काय नि कधी ना केले काय? विचारतो तरी कोण? नेहमीचा “अंघोळ करा, जेवण करा…” असा कळवळ्याचा सज्जड दम विरला होता. काळ्याकुट्ट अंधारातही काना न कोपऱ्यातील चकाकणाऱ्या वस्तू राहू द्या, परंतु लख्ख सूर्य प्रकाशातील अंगण तर “सद्या घरात सर्व माणसे मृतप्राय शरीरेच” असल्याची स्पष्ट साक्ष देत होते. घराचे घरपण, घरसजावट किंवा घरांगण स्वच्छता आदी एका स्त्रीजातीशिवाय शेकडो माणसेही पाहिजे तशी ठेवू शकत नाहीत. हे आज आपण पावन आंतरराष्ट्रीय महिला दिन निमित्त प्रामाणिकपणे मांडणे, आपले अहोभाग्य समजतोय! यंदा दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी मुलगा- इंजि.दुर्वांकुर यांचा विवाह उरकून सून- पल्लवीताई लक्ष्मीच्या पावलाने घरात आली आणि आमचा जीव भांड्यात पडला. आता खुप प्रसन्न वाटत आहे.

भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ रोजी साजरा करण्यात आला. दि.८ मार्च १९७१ला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे सन १९७५ हे वर्ष युनोने जागतिक महिला वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले, तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, शाळा, महाविद्यालय व अन्य कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा होऊ लागला आहे. आजच्या काळात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा होताना दिसून येतो. इ.स.१९७५ या जागतिक महिला वर्षाच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्र संघटनेने आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे ठरविले. सन १९७७ साली संयुक्त राष्ट्र संघटनेच्या समितीने विविध सदस्यांना आमंत्रित करून ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय स्तरावर महिलांचे अधिकार आणि जागतिक शांतता या हेतूने साजरा करावा, असे आवाहन का बरे केले असावे? क्रांतिसूर्य जोतीबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदींनी स्त्रीमुक्ती चळवळीत स्वतःला का समर्पित केले? याचे कोडे आज आपल्याला उलगडले आहे, हे पुनः पुन्हा सांगणे न लगेच!

!! पुरोगामी न्युज परिवारातर्फे जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!

✒️लेखक:-अलककार- श्री कृष्णकुमार गोविंदा निकोडे गुरुजी.
मु. पो. ता. जि. गडचिरोली,मोबा. नं. ७७७५०४१०८६