चंद्रपुरात 18 मार्चपासून विभागीय सरस व हिराई महोत्सव

61

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.15मार्च):- विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा परिषद चंद्रपूर,यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्री करीता विभागीय सरस व हिराई महोत्सव-2023 चे आयोजन दिनांक 18 ते 21 मार्च 2023 या कालावधीत चांदा क्लब ग्राऊंड, वरोरा नाका, नागपूर रोड, चंद्रपूर येथे करण्यात आलेले आहे.

स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध होणाऱ्या दृष्टीने वस्तुंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता समुहामार्फत उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन म्हणजे ग्रामीण भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्य प्रदर्शन व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास वाढविण्यासाठीचा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये संबंधीत व्यवसायीक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.

या प्रदर्शनीमध्ये नागपूर विभागातील सर्व जिल्हयांसह एकूण 210 हुन अधिक महिला स्वयंसहाय्यता समुह सहभागी होणार आहे. जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनीचे उदघाटन दि. 18 मार्च 2023 ला सकाळी 11 वाजता मा. मंत्री, वने,सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार करणार आहेत. यावेळी सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. दिनांक 18 ते 20 मार्च या दरम्यान रोज सांयकाळी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.

प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून विविध गृहपयोगी उत्पादने विक्रीस उपलब्ध राहणार आहेत. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपेाळी, पुरणपोळी, झुनका भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ, कापडी बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळखत, चा समावेश आहे. या सोबतच स्वंयसहाय्यता समुहांचे खादयपदार्थाचे स्टॉल्स राहणार आहेत. यात पुरणपोळी, शाकाहारी तसेच मांसाहारी जेवण, झुणका भाकर, लांब पोळया आदीचा समावेश आहे.

चंद्रपूर शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी या प्रदर्शनीस भेट दयावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक जानसन यांनी केले आहे.