भिती

26

एखादा जीवनकाळ यशस्वीरीत्या पूर्ण होण्यासाठी प्रत्येक प्राण्याला अन्न, निवारा या भौतिक वस्तू लागतात, त्यासोबत भिती नावाची अदृश्य पण जाणवणारी शक्ती सुद्धा लागते. भिती ही शक्ती म्हटल्यावर लोकांच्या भुवया उंचावणार हे मला माहित आहे.

भिती वाटणे हे सर्व प्राणीमात्रांना निसर्गाने उपजत दिलेले वरदान आहे असे मी मानतो. आज ही शक्ती नसती तर अनेक प्रजाती विलुप्त झाल्या असत्या. या वरदानामुळेच सुरक्षित राहण्यासाठी प्राणी नेहेमी लपून राहणे, गरज पडल्यासच बाहेर जाणे, तसेच बाहेर फिरताना आपण शिकार होऊ नये म्हणून इतर जातीच्या प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवणे, पाणवठ्यावर प्रत्येक घोट पाणी पिण्याआधी आसपास कानोसा घेणे, समजा संकट आलेच तर बचाव करण्यासाठी कोणत्या बाजूला पळाले तर बचाव होण्याची शक्यता जास्त याचा निर्णय घेणे, या क्रिया करु शकतात. समजा हरणाला, सशाला, भिती वाटत नसती तर ते प्राणी स्वतःच मांस भक्षी प्राण्यांच्या जवळ गेले असते अथवा ते प्राणी हल्ला करायला आल्यावर पळून जाण्याचा प्रयत्न न करता तिथेच उभे राहिले असते. या त्यांच्या कृत्याने त्यांचा वंश संपला असता, प्रजाती नष्ट झाली असती.

किडा, मुंगी पासून आकाराने अजस्त्र व हिंसक प्राणी सुद्धा नेहेमीच घाबरतात कारण निसर्गाने दिलेले हे वरदान, त्याचा त्यांच्याकडून पुरेपूर वापर केला जातो. वाघीण कितीही मोठया प्राण्याची शिकार करेल, मोठयात मोठया प्राण्याला ती स्वतःच्या व पिल्लांच्या भुकेसाठी मारेल, तिथे ती घाबरणार नाही, मात्र पिलांच्या सुरक्षेसाठी मात्र ती नक्कीच बचावात्मक पवित्रा घेऊन त्यांना झुडपात, झाडीत लपवून ठेवते. तिचे असंख्य शत्रू आहेत हे तिला जाणीवपूर्वक माहीत असते, त्यांच्या पासून तिला, स्वतःचा तसेच पिल्लांचा पण बचाव करायचा असतो याचे कारण त्या शत्रूंची भीती असलेला मेंदूतील इनबिल्ट प्रोग्रॅम कायमस्वरूपी काम करत असतो. “मी वाघीण मला काय कुणाची भीती” “मी माझी पिल्ले कुठेही बिनधास्त फिरु” “आमचे कोणीही काही वाकडे करू शकत नाही कारण आम्ही सर्वशक्तिमान आहोत” असले दांभिक विचार वाघिणीला कधीही सुचणार नाहीत, म्हणून बचावात्मक पवित्रा घेऊन अत्यंत सुरक्षित अश्या गर्द झाडी झुडपात ती प्रसवेल व पिलांचे पोषण करून त्यांना वाढवेल. इथे लक्षात असुद्या, की कोल्हे, लांडगे, तरस, जंगली कुत्रे सारख्या मांस भक्षी प्राण्यांची तिला भीती वाटते, हे प्राणी वाघिणीच्या पिल्लांना सहज ठार मारू शकतात. इथे तिला स्वतःच्या जीवाची भिती नसून पिल्लांच्या जीवाची काळजी हिच भिती असते. वास्तविक तिला या शूद्र प्राण्यांची एकटी असताना कधीच भीती वाटत नाही, वेळ प्रसंगी त्याही प्राण्यांना ती स्वतःचे भक्ष बनवते, पण पिल्ले झाल्यावर, आईच्या भूमिकेत तिचा भीतीचा प्रोग्रॅम ऍक्टिव्ह होऊन सुरक्षित राहण्यावर लक्ष केंद्रित करून लपून राहण्याला प्राधान्य दिले जाते.

मनुष्य प्राणी मात्र त्याच्या विचार करण्याच्या संपन्नतेमुळे या भितीचे कधी कधी अवडंबर माजवून नको ते विचार ठायी असल्यामुळे काल्पनिक भीतीने अर्धमेला होत असतो. फार पुढचा विचार करून, अनेक वयस्क लोक आमचे म्हातारपणी कसे होणार?, आमचा शेवट, हाल होऊन तर होणार नाही? मुले विचारपूस करतील का? असे म्हणत कुढत दिवस घालवतात.

अनेक लोकांना तर माझ्यामुळेच सगळे जग व्यवस्थित चालत आहे असे वाटते, माझ्यानंतर जगबुडी होईल अशी भिती असते. काही स्रियांना तर सतत वाटते, मी आहे म्हणून संसार सुरळीत सुरू आहे, माझ्यानंतर नवऱ्याचे, मुलांचे अवघड आहे, घरातल्या कुणालाच कशाची काळजी नाही असे गैरसमज असतात. खरं सांगायचे तर त्या इतकी जास्त काळजी करतात म्हणून घरातील इतर सदस्य बिनधास्त असतात.

त्याच्या उलट, अनेज जण बऱ्याच वेळेस ज्याची भिती वाटून त्यापासून सुरक्षित राहायला पाहिजे तिथे विनाकारण कडमडून स्वतःचा जीव गमावतात किंवा आयुष्यभर अपंग होऊन राहतात. पोहायला येत नसतानाही पिकनिकला जाऊन खोल पाण्यात बुडून मरण्याची अनेक उदाहरणे आपण दररोज पेपर मध्ये वाचतो, याशिवाय अतिवेगाने गाड्या चालवून अपघात घडून जीव गमावतात, अत्यंत धोकादायक जागेवर जाऊन सेल्फी घेण्याच्या प्रयत्नात खोल दरीत पडतात, हिंस्त्र प्राण्यांच्या सोबत फोटो घेताना स्वतः शिकार होतात, अशी शेकडो उदाहरणे देऊ शकतो. या बाबतीत मनुष्य सोडून भूतलावरील एकही प्राणी असा स्वतःचा घात होईल अशी वर्तणूक कधीच करत नाहीत.

अतिआत्मविश्वास, (ओव्हर कॉन्फिडन्स), हा आपल्या बौद्धिक प्रगतीमुळे मिळालेला मानसिक रोग आहे, त्यातून काहीतरी अचाट, व जे सर्वसाधारणपणे अशक्य या सदरात मोडते अश्या जीवघेण्या कृती करण्याच्या प्रयत्नात अनेक जण जीव गमावून बसतात, इथे भिती या नैसर्गिक मिळालेल्या वरदानरुपी शक्तीला, आपल्या संपन्न बुद्धीच्या जोरावर आपण डावलतो व कमी लेखतो, त्यावर धाडस करणारी इच्छाशक्ती मात करते व आत्मघात होतो.

मनुष्य सोडून असले जीवघेणे स्टंट, प्रयोग जगातील कोणताही प्राणी काधीही करताना कुणालाही दिसणार नाही. मुळात प्राणी कधीही क्षमतेपेक्षा जास्त धाडस करत नाही, म्हणून वाघ, सिंह हे प्राणी सुद्धा सहज मिळणारी शिकार करतील, त्यात हरीण व त्या आकाराच्या प्राण्यांना नेहेमी अन्न म्हणून प्राधान्य देतील, कारण उदर भरण हा शुद्ध हेतू असतो, जिभेचे चोजले नसतात. उगीच वाघीण म्हणत नाही, “लई दिस झाले, एकच एक हरीण, चितळ, सांबर खाऊन कंटाळा आला राव, एखादा हत्ती, गेंडा, जिराफ मारून त्याची चव बघावी.” वाघिणीची पिल्ले ही आईजवळ असले हट्ट करणार नाहीत, ज्यामुळे आईच्या जीवाला धोका होऊ शकतो.

अपवाद मात्र दिव्यांच्या किड्यांचा आहे, मला आज पर्यंत हे समजले नाही हे किडे पेटत्या दिव्यात झोकून देऊन स्वतःची होळी का करून घेतात.

मनुष्य प्राणी अचाट बौद्धिक उन्नतीमुळे अनेक रुपात भिती पाहतो, त्यात काल्पनिक भितीच खूप असते. भित्या पाठी ब्रह्मराक्षस, या उक्तीप्रमाणे भूत, पिशाच्य, हडळ, चेटूक वगैरे तसेच जगबुडी, प्रलय, जगाचा अंत, अंतरीक्षातून एखादी वस्तू येऊन पृथ्वीचा नाश करेल अशी विविधतेने नटलेली भीती, तर काहींना माझी नोकरी गेली तर, मी अपंग झालो तर, मला कॅन्सर सारखा रोग तर नाही होणार, अशी भिती सतावते. अजून काहीजण कौटुंबिक काळजी करून मानसिक रोगी होतात, यामुळे त्यांना बीपी, डायबेटीस, सारख्या व्याधी जडतात.

इतर प्राण्यांना यातील एकही भिती नसते, कारण ते वास्तवात जगतात, भूतकाळ व भविष्यकाळ याचे त्यांना काही देणे घेणे नसते. त्यांची भितीची व्याख्या फारच मर्यादित स्वरूपाची असते, जी वर्तमानाला धरून असते.
एकूणच आपण जर भितीला सकारात्मक पद्धतीने समजून घेतले तर तिच्यापासून आपला पर्यायाने मानवजातीचा फायदा होऊ शकतो.

।। शूर आम्ही सरदार । आम्हाला काय कुणाची भीती ।।

इतकेच वाचून छाती फुगवणाऱ्याला वाघाच्या पिंजऱ्यात सोडा, मग समजेल.

कविला त्यातील दुसरे कडवे ….

।। देव, देश आणि धर्मापायी। प्राण घेतलं हाती।।

जास्त अभिप्रेत आहे, हे लक्षात घ्या.

✒️विजय लिमये(9326040204)नागपूर