ज्येष्ठ अभिनेत्री फैयाज शेख यांना ‘रंगकर्मी सन्मान’ तर ‘चतुरंग’चे विद्याधर निमकर यांना ‘ध्याससन्मान’ जेष्ठ दिग्दर्शक राज दत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान!

45

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.23मार्च):- गुढीपाडवा आणि नूतन वर्षाच्या स्वागता निमित्त अॅड फिझ गेली १५ वर्षे ‘चैत्रचाहूल’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम करते. त्याचबरोबर सांस्कृतिक – सामाजिक क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केलेल्या व्यक्तीला ‘ध्यास सन्मान’ देऊन आणि रंगभूमीवरील मोलाच्या योगदानाबद्दल ‘रंगकर्मी सन्मान’ प्रदान करून समाजभानही जपते या वर्षी हे सन्मान चतुरंग संस्थेचे संस्थापक निमकर आणि प्रसिद्ध गायिका-अभिनेत्री फैयाज यांना ख्यातनाम दिग्दर्शक राजदत्त आणि न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

शिवाजी मंदिर येथे रंगलेला हा कार्यक्रम पत्रकार आणि संगीत रंगभूमीला पुनरुज्जीवन देणारे नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना समर्पित होता. त्यांच्या नाटकातील पदे वैशाली भडकमकर व सहकारी यांनी भरतनाट्यम या माध्यमातून, ज्ञानेश पेंढारकर व सुवर्णा कागल यांनी ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकातील प्रसंग सादर करून आणि विद्याधर गोखले यांचे नातू ओमकार दादरकर व संपदा माने यांच्या गायनातून सादर झाली.

‘विवेक व्यासपीठ’च्या सहकार्याने झालेल्या कार्यक्रमाचे औचित्य साधत अजित दांडेकर यांनी पोडियमला दिलेले ऑर्गनचे रूप कौतुकास्पद आणि लक्षणीय होते. अरुण जोशी यांची संहिता जुन्या संदर्भांचे दाखले देणारी, माहितीपूर्ण होती. ती संपदा कुळकर्णी व प्रमोद पवार यांच्या उत्कृष्ट निवेदनातून सादर झाली. कार्यक्रमाची भैरवी फैयाजजी यांनी गायल्याने कार्यक्रमाला वेगळीच उंची लाभली. महेंद्र पवार यांच्या संयोजनात एक उत्तम कार्यक्रम घडल्याची प्रतिक्रिया रसिक देत होते