पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश प्रवर्ग ‘क’ महाराष्ट्र माध्यमिक डी.एड शिक्षक महासंघाच्या लढ्याला यश

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

चंद्रपूर(दि.27मार्च):-खाजगी शाळांतील शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेसाठी महाराष्ट्र खाजगी शाळा (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील नियम १२ अनुसूचि ‘फ’ मध्ये मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. त्यात माध्यमिक शाळेतील शिक्षकांची ज्येष्ठता प्रवर्गनिहाय दिलेली आहे. सदर प्रवर्गामध्ये पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश नसल्याने अनेक शाळा आपल्या मर्जीनुसार वाटेल तिथे पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश करून पदोन्नतीसाठी डावलल्या जात असायचे. यासाठी महाराष्ट्र माध्यमिक डी.एड शिक्षक महासंघाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करून पदवीधर डी.एड शिक्षकांवर होत असलेला अन्याय निदर्शनास आणून दिला.

महाराष्ट्र माध्यमिक डी.एड शिक्षक महासंघाने केलेल्या पाठपुराव्याची दखल घेऊन शासनाने प्रवर्ग ‘क’ च्या दुरूस्तीबाबत ८ जून २०२० ला अधिसूचना निर्गमित करून हरकती मागविल्या. सदर अधिसूचना निर्गमित होऊनही दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अधिसूचनेची कार्यवाही लागू होत नसल्याने महाराष्ट्र माध्यमिक डी.एड शिक्षक महासंघाने शासनाच्या विरोधात आंदोलन सुद्धा केलेले होते. अखेर आंदोलनाची दखल घेऊन आज प्रवर्ग ‘क’ मध्ये दुरुस्ती करून पदवीधर डी.एड शिक्षकांचा समावेश प्रवर्ग’क’मध्ये केल्याने पदवीधर डी.एड शिक्षकांना एक निश्चित स्थान तर मिळालेच तसेच *मुख्याध्यापक पदावरील* पदोन्नतीचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. या निर्णयाबाबत पद्मा तायडे (राज्य अध्यक्षा), बाळा आगलावे (राज्य सचिव), नंदकिशोर गायकवाड (राज्य कार्याध्यक्ष) यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

चंद्रपूर, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, वाशिम, विदर्भ, सामाजिक , सांस्कृतिक

©️ALL RIGHT RESERVED