वारणेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था पुणे यांच्या वतीने सहकार ॲग्रो स्टार्टअप परिसंवाद संपन्न

34

✒️इसलामपूर प्रतिनिधी(इकबाल पीरज़ादे)

वारणानगर(दि.27मार्च):-तालुका पन्हाळा येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय आणि वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सहकार आणि ऍग्रो स्टार्टअप’ या विषयावर परिसंवाद संपन्न झाला. संस्थेच्या संचालिका डॉ. हेमा यादव यांनी वारणा विविध उद्योग आणि शिक्षण समुहाला भेट दिली.

प्रा. सुधीर देशपांडे,उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा.डॉ.महेश कदम प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.अध्यक्षस्थानी परिसंवादाचे संयोजक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.वैकुंठ मेहता राष्ट्रीय व्यवस्थापन संस्थेच्या सहकार व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख प्रा. सुधीर देशपांडे यांनी या वेळी सहकाराचे स्वरूप, गरज आणि महत्व या विषयावर सांगितले की, राष्ट्रीय स्तरावरून सहकार क्षेत्र समृद्ध आणि बळकट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून युवकांच्या पर्यंत सहकार चळवळीचे महत्त्व पोहोचविणे आवश्यक आहे.

वारणा सहकारातील आदर्श असून सहकारामुळेच वारणा परिसरातील लोकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात समृद्धी आली आहे. वारणेत सहकाराची तत्वे आणि नैतिक मूल्यांची जोपासना झाल्यानेच समाजाचे जीवनमान उंचावले आहे. तर दुसरे वक्ते वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्थेच्या उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा. डॉ. महेश कदम म्हणाले की, “सध्या अनेक ऍग्रो स्टार्टअप सुरू आहेत. आपण आपल्या नवकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यासाठी भारत सरकारच्या सहकार व कृषी विभागाची मदत घेतली पाहिजे. भारत सरकारकडून ऍग्रो स्टार्टअप साठी लाखो रुपयाचे अनुदान दिले जात आहे, त्याच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती आणि स्वावलंबी व्हा. रोजगार देणारे बना”, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ.कदम यांनी यावेळी ऍग्रो स्टार्टअप साठी सहाय्य करणाऱ्या अनेक कंपन्यांची माहिती ऑडिओ-व्हिडिओ द्वारा विद्यार्थ्यांना दिली.अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. चिकुर्डेकर म्हणाले की”वारणा सहकार” समूहाची सुरुवात सहकार महर्षी स्व. तात्यासाहेब कोरे यांनी अत्यंत कष्टातून केली. वारणेच्या उजाड माळावरती सहकार समूह उभा केला. साखर कारखान्याबरोबर अनेक उद्योग, व्यवसाय, दूध संघ , शिक्षण व्यवस्था, एक दुसऱ्याला पूरक असे तयार केले. हजारोंच्या हाताला काम मिळाले. आज जगाच्या नकाशावर वारणेची ओळख आज सहकार पंढरी अशी केली जाते. विज्ञान दिंडीचे वारकरी स्व. विलासदादा कोरे यांनी वारणा सहकार समूहाच्या विकासात वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवून विविध उद्योगांची भर घातली. आज वारणा विविध उद्योग समूहाचे अध्यक्ष व लोकप्रिय आमदार डॉ. विनयराव कोरे- सावकर जागतिकीकरणाच्या युगात वारणा सहकार अधिक समृद्ध व बळकट करण्यासाठी अहोरात्र कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.”

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. सी. आर. जाधव तर आभार प्रा. रोहित बसनाईक यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. आप्पासाहेब भुसणर यांनी केले. परिसंवादामध्ये चारशे हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सुधाकर खोत, डॉ. डी. आर. धेडे, प्रा. सुप्रिया कांडगावकर,डॉ.बी.के. वानोळे उपस्थित होते.