बार्टीत भ्रष्ट लोकांना कामावर घेण्याच्या हालचाली-भ्रष्टांवर महासंचालक मेहरबान

36

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.28मार्च):- पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेत भ्रष्ट लोकांना पुन्हा रुजू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येथील निबंधकाला वसुली करण्यासाठी हे कर्मचारी सहकार्य करणार आहेत. त्यांच्या गैरव्यवहाराचे आरोप असतानाही नव्याने रुजू झालेले महासंचालक सुनील वारे मेहरबान कसे, असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आय.एल. नंदागवळी यांनी दिला आहे.

राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विकासासाठी स्थापन केलल्या पुण्यातील बार्टी संस्थेला काही भ्रष्ट अधिकाऱ्यांची कीड लागली आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी हे समाजाला वेठीस असून प्रचंड हानी पोहोचविण्याचे प्रयत्न करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथील गैरव्यवहार तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी उघडकीस आणला होता. याविरोधात त्यांनी कारवाई करून काही लोकांना घरचा रस्ता दाखविला होता. हे कर्मचारी बार्टीला पोखरून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न करीत होते.

त्यांच्या या गैरकारभारामुळे बार्टीची प्रतिमा मलिन झाली आहे. अशा भ्रष्ट कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले. तत्कालीन महासंचालकांनी त्यांच्याविरोधात कारवाई केली. मात्र, बार्टीतील काही लोकांनी महासंचालकांना बदनाम करून त्यांना पदमुक्त करण्यासाठी राजकीय दबावतंत्र वापरण्यात केला. तत्कालीन महासंचालक धम्मज्योती गजभिये यांना हटविण्यासाठी त्यांच्यावर विविध आरोप करण्यात आले. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी बार्टीला गावागांवात पोहोचविले. तसेच प्रशासनात मोठ्या प्रमाणात सुधारणा केल्या. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून राजकारण्यांच्या वरदहस्ताने बार्टीत गैरव्यवहार करणाऱ्यांना हे पाहावले नाही. कटकारस्थान करून त्यांच्याविरोधात जातीयवाद्यांना उभे केले.

भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भीमा कोरेगाव येथील भोजन निविदामध्ये घोळ केला. यासह अनेक प्रकरणात गैरव्यवहार आणि हस्तक्षेप केल्यामुळे तत्कालीन महासंचालक गजभिये यांनी त्यांच्यावर कारवाई करून पदमुक्त केले होते. यासोबत दोन महिला कर्मचाऱ्यांसह तिघांवर ही कारवाई केली होती. या तिन्ही भ्रष्ट लोकांना परत बार्टीत कामावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याकरिता नवे महासंचालक सुनील वारे यांनी सहमती दर्शविल्याची माहिती आहे. महासंचालक भ्रष्ट लोकांना परत घेऊन त्यांना पाठबळ देण्याचा प्रयत्न कशासाठी करीत आहेत, असा प्रश्नही यानिमित्ताने विचारल्या जात आहे. महासंचालकच जर भ्रष्ट लोकांना सहकार्य करीत असतील तर बार्टीचे भवितव्य धोक्यात आल्याचे संकेत मिळत आहेत.

@निबंधक इंदिरा अस्वार यांच्यावर महासंचालक कारवाई केव्हा करणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करावी म्हणून महासंचालकाने सामाजिक न्याय विभागाला पत्र दिले आहे. त्यावर नवीन महासंचालक सुनील वारे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. उलट त्यांना पुन्हा बार्टीत घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.सध्या त्यांचे प्रकरण मॅटमध्ये आहे. शासनाने त्यांच्यावर कारवाईसाठी प्रकरण हाताळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्याप्रमाणे माहिती आयोगाने दिलेल्या पत्रानुसार इंदिरा अस्वार यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार महासंचालकांना असून त्यांचे हात कोणी, कशासाठी बांधले, असा प्रश्न आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आय.एल. नंदागवळी, पुंडलिक घ्यार आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.