वाहन धारकांची स्पीड गन च्या नावाखाली होणारी सरकारी लूट थांबवा !

44

🔹अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर वाहन चालकांना भुर्दंड !

🔸रुपेश वाळके यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !

✒️मोर्शी(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मोर्शी(दि.3एप्रिल):-वरूड, मोर्शी, अमरावती महामार्गांवर व अमरावती शहरामध्ये वेलकम पॉइंट परिसरात, स्पीड गन च्या नावाखाली वाहन चालकांची सर्रास ऑनलाईन लुट सुरु आहे. वेलकम पॉइंट येथे व अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर कमी चा स्पीड लिमीट लावण्यात आला असून मोर्शी वरूड तालुक्यातील वाहन चालकांना २००० रुपयांचा ऑनलाइन फाइन दिल्या जात आहे. एखादया गाडीत अर्जेंट पेशंट जरी असला तरी त्या वाहनाला ऑनलाईन दंड ठोकल्या जात आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी तहसीलदार सागर ढवळे यांच्या मार्फत मुखमंत्री, उपमुख्यमंत्री यांना निवेदन देऊन अमरावती मोर्शी वरूड महामार्गावरील स्पीड गण मशीन बंद करून मोर्शी वरूड तालुक्यातील वाहन चालकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

शासनाच्या नियोजनशून्य ढिसाळ कारभाराने सरकारी तिजोरी खपाटीला घालवायची आणि मग ती भरण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुन्हा सर्वसामान्य जनतेचीच लूट करायची असा सगळा प्रकार सुरू असल्याची चर्चा वाहन धरकांमध्ये रंगत असून. जिल्ह्यात सगळ्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांच्या हाती सोपवण्यात आलेल्या स्पीड कॅमेरा लावलेल्या कार किंवा स्पीड गन हे सरकारी दरोडेखोरीचं उत्तम उदाहरण असल्याचं नागरिकांमध्ये बोलल्या जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली सुरू हा वसुलीचा प्रकार बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

कोणत्या रस्त्यावर किती वेगाने गाडी चालवावी हेच बहुतांश लोकांना माहीत नाही. त्यासाठी वेगमर्यादेचे फलक लावण्याचा नियम आहे, जेणेकरून लोकांना ते कोणत्या रस्त्यावर वाहनाचा वेग किती हे कळू शकेल. मात्र जबाबदार विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर एकाही ठिकाणी फलक लावल्याचे दिसत नाही. त्यामूळे वेग मोजणाऱ्या यंत्रातूनआतापर्यंत मोर्शी वरूड तालुक्यातील शेकडो वाहनांचे चालान कापण्यात आले.

गैर पद्धतीने वाहन चालवण्याऱ्यांवर कारवाई व्हावी यात गैर नाही. परंतु केवळ दंड वसुली करून जनतेला लुटण्यासाठी चा जो प्रकार सुरू आहे त्यामुळे वाहन चालकांनी अधिकाधिक वाहतूक नियमांचा भंग करावा आणि विभागाचे दंड वसुलीचं टार्गेट पूर्ण व्हावं याच उद्देशाने हा विभाग कार्यरत असल्याची तक्रार नागरिकांची आहे. हे स्पीड कॅमेरा म्हणजे सोन्याचे अंडं देणाऱ्या कोंबड्या असल्याचा समज विभागाचा झाला आहे. मोर्शी वरूड तालुक्यातील वाहन धारकांना अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर स्पीड लिमिट चा नावाखाली बसत असलेला हजारो रुपयांचा भुर्दंड शासनाने बंद करावा यासाठी शासनाला निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र जिचकार, उपाध्यक्ष रुपेश वाळके, विदर्भ ग्राहक संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ आनंद घोंगडे, सचिव प्रमोद राऊत, राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष हितेश साबळे, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष अंकुश घारड, अमोल महल्ले, यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती.

मुख्यमंत्री साहेब मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांना दिलासा द्या.अमरावती मोर्शी वरूड महामार्गावर व अमरावती शहराच्या सुरवातीला स्पीड कॅमेरा वाहन उभे करून मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांची होणारी लूट बंद करा अशी मागणी आम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, गृह मंत्री तथा उपमुख्यमंत्री अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे केली असून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आमच्या मागणीची दखल घेऊन मोर्शी वरूड तालुक्यातील नागरिकांची ऑन लाईन होणारी लूट थांबवावी.
– रुपेश वाळके उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.