गारपीट नुकसानीचे पंचनामे करून संत्रा उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या – निलेश ठाकरे

34

🔹मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान 

🔸मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत 

✒️मोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)

मोर्शी(दि.2मे):-तालुक्यातील घोडदेव, सालबर्डी, डोंगर यावली, दापोरी, तसेच इतर अनेक ठिकाणी २७ एप्रिल रोजी वादळी वार्‍यासह गारपीट व अवकाळी पाऊस झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात झालेल्या गारपिटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले असून, त्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माथुराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष निलेश ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

निलेश ठाकरे यांनी जिल्हाधिकारी पवनी कौर यांना निवेदन देऊन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी मंत्री अब्दुल सत्तर यांच्याशी संपर्क साधून मोर्शी तालुक्यात गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली. तसेच शेतीच्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून शेतकर्‍यांना आर्थिक मदत देण्याची मागणी युवा उद्योजक निलेश ठाकरे यांनी केली.

मोर्शी तालुक्यात घोडदेव, सालबर्डी, डोंगर यावली, हीवरखेड, यासह तालुक्यातील विविध भागात व परिसरात २७ एप्रिल रोजी सायंकाळी गारांसह अवकाळी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या गारपिट व अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाली आहेत. काढणीला आलेल्या गहू, कांदा, भाजीपाला आदी पिके जमीनदोस्त झाली आहेत. तसेच संत्रा फळ बागांचे कधीही भरून न निघणारे मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे मोर्शी तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे .

अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकर्‍यांचे अर्थचक्र पुन्हा एकदा धोक्यात आले आहे. सरकारने लवकरात लवकर गारपीट व अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल व कृषी विभागाला द्यावेत. तसेच पंचनाम्याची प्रक्रिया लवकर पूर्ण करून सबंधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा. — निलेश ठाकरे संस्थापक अध्यक्ष मथुराबाई ठाकरे चॅरीटेबल ट्रस्ट .