स्वच्छता अभियान चळवळ व्हायला हवी – आ.डॉ.गुट्टे

29

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.6मे):-कोणतेही अभियान राबवताना हे माझे अभियान आहे, ही भावना मनात यायला हवी. माझे घर, माझे शहर असे जेव्हा लोक म्हणतात तेव्हा ही माझी नदी, तिच्या स्वच्छतेची जबाबदारी माझीही, असे त्यांनी म्हणायला हवे. तरच या अभियानाला खऱ्या अर्थाने बळ येईल, असे मत गंगाखेड विधानसभेचे आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केले.

शहरातील गोदाघाट येथे सुरू असलेल्या ‘गोदावरी स्वच्छता अभियान’ मोहिमेत त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत स्वच्छतेस हातभार लावला. त्यावेळी ते बोलत होते. दक्षिण काशी म्हणून ओळख गोदावरी नदीचे पावित्र्य जपले पाहिजे, या उदात्त भावनेत गेली अनेक महिने राजू देशमुख, राणी केंद्रे, ॲड.स्मिता देशमुख, श्रध्दा भोरफळे, प्रेमलता नावंदर यांच्यासह अनेक पर्यावरण प्रेमी नागरिक दर आठवड्यात साप्ताहिक स्वच्छता अभियान राबवित आहेत.

नदी स्वच्छतेतील मुख्य अडसर नदीत येऊन मिसळणाऱ्या सांडपाण्याचा आहे. जोपर्यंत नद्यांमध्ये येणारे सांडपाणी आणि यात टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर उपाय सापडत नाही, तोपर्यंत नदी स्वच्छतेत अडसर हा येणारच आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छता अभियान लोक चळवळ झाली पाहिजे, असेही आ.डॉ.गुट्टे यांनी म्हटले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिवाजीराव निरदुडे, माजी नगरसेवक राधाकिशन शिंदे, सत्यपाल साळवे, वैजनाथ टोले, उद्धवराव शिंदे, मुख्याधिकारी तुकाराम कदम, रासपा शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माणिकराव आळसे, इकबाल चाऊस, सतीश घोबाळे, संजय पारवे, व्यापारी आघाडीचे सचिन नाव्हेकर, खालेद शेख, सचिन महाजन, पत्रकार पिराजी कांबळे, महेश आप्पा शेटे यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी व माता-भगिनी उपस्थित होत्या.