वि. स. पागे:रोजगार हमी योजनेचे जनक

11

✒️लेखक:-देवेंद्र भुजबळ (सेवानिवृत्त-माहिती संचालक,महाराष्ट्र शासन)मो:-9869484800

महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यांना संपूर्ण महाराष्ट्राच नव्हे तर सारा देश ओळखतो. रोजगार हमी योजनेच्या विधयेकावर विधान परिषेदेचे सभापती म्हणून बोलताना कै. वि.स. पागे यांनी ‘रोजगार हमी योजना राबवण्यासाठी महाराष्ट्र सरकार तर वाटचाल करीतच आहे, परंतु भारतातील सर्व प्रांत या दृष्टीने वाटचाल करतील, केंद्र सरकार या गोष्टीला आशीर्वाद देईल’, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. केंद्र सरकार आता राष्ट्रीय स्तरावर रोजगार हमी योजना राबवित असल्याने कै. वि.स. पागे यांनी काढलेले उदगार सार्थ ठरले आहेत.
कै. वि.स. पागे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बागणी येथे २१ जुलै १९१० रोजी झाला. सांगली येथील विलींग्डन महाविद्यालयातून संस्कृतसह बी.ए.ची पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी कोल्हापूर येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी संपादन केली. त्यानंतर काही काळ त्यांनी वकिली केली.
देशाच्या स्वातंत्र्याच्या ओढीने त्यांनी विद्यार्थी दशेतच १९३० च्या कायदे भंग चळवळीमध्ये, १९४० च्या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये व १९४२ च्या भारत छोडो आंदलनामध्ये सक्रिय सहभाग घेवुन कारावास भोगला होता. महात्मा गांधीं यांच्या विचारावर त्यांचा गाढ विश्वास होता. अध्यात्माबरोबरच त्यांना भांडवलशाही, लोकशाही, समाजवाद, साम्यवाद हे विषयही प्रिय होते. बहुभाषी असलेल्या पागे यांचे मराठी, हिंदी, संस्कृत, बंगाली व गुजराथी भाषांवर प्रभुत्व होते.
राज्यातील विविध क्षेत्रांशी त्यांचा अत्यंत जवळून संबध आलेला होता. राजकारण, समाजकारण सहकार, शेती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ते सातत्याने सक्रिय राहिले. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्य सैनिक समिती, महाराष्ट्र राज्य सहकारी मंडळ, गांधी स्मारक निधी, नशाबंदी मंडळ, सुरसिंगार संसद, अल्पबचत योजना सल्लागार समिती, राष्ट्रीय एकात्मता समिती, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अशा एक ना अनेक संस्थांच्या कार्यात त्यांनी मनस्वीपणे योगदान दिले. महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे महाराष्ट्र विधान परिषदेवर १९५२, १९५४, १९६०, १९६६ व १९७२ असे एकून पाचवेळा ते निर्वाचित झाले होते. त्यापैकी १९६० ते १९७८ पर्यंत अशी सलग १८ वर्षे त्यांनी विधान परिषदेचे सभापती पद भूषविले होते. त्याबरोबर अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदांमधून विविध संसदीय समस्यांवर आणि कार्यपद्धतीमधील अडचणींवर त्यांनी अभ्यासपूर्ण विचार प्रदर्शन केले. या परिषदांनी महत्वाच्या मुद्द्यांचा ऊहापोह करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण अहवाल सादर केला. आजही सर्व देशभरातील विधीमंडळाचे व संसदेचे पीठासीन अधिकारी सभागृहाच्या कामकाजाचे संचालन करताना, अडचणींची परिस्थिती ऊद्भवल्यास त्या अडचणीवर तोडगा काढण्यासाठी या अहवालाचा आधार घेतात. राष्ट्रकुल देशांच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये भाग घेऊन त्यांनी आपल्या विचारांचा आणि अनुभवाचा लाभ इतर देशांना दिला.
कै. पागे यांचे अत्यंत मुलभूत स्वरुपाचे योगदान म्हणजे रोजगार हमी योजना होय. अकुशल शेत मजुरांसाठी रोजगार मिळणे हा त्यांच्या चिंतनाचा सततचा विषय होता. ग्रामीण भागातील अकुशल शेतमजूर, लहान शेतकरी यांच्यासाठी आदर्श ठरलेली रोजगार हमी योजना देशाला मार्गदर्शनपर ठरली आहे. कै.वि.स. पागेंनी विपुल लेखन केले आहे. “काम करण्याचा हक्क” , “कथा ही रोहयोंच्या जन्माची “, “नवे राष्ट्रदर्शन: रोजगार हमी योजना”, “बेकारी निर्मूलनातून ग्रामविकास” या ग्रंथाबरोबरच ‘संत चोखामेळा’, ‘पहाटेची नौबत’, ‘अमरपक्षी’, ‘कविता मम नाद नौबदी’ हे काव्यसंग्रह, “निवडणुकीचा नारळ”, “विश्वदर्शन”, “तुका म्हणे जाऊ वैकुंठा चाल”’ ही नाटके त्यांनी लिहिली.
आज देशस्तरावर रोजगार हमी योजना राबविली जात असताना या योजनेविषयी विविध मान्यवरांनी व्यक्त केलेली मते उद्घृत करणे अप्रस्तुत ठरणार नाही. जेव्हा सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील ११ गावात पथदर्शक म्हणून रोजगार हमी योजना राबविली जात असल्याचे व ही योजना राज्यभर विस्तारीत करत करण्याचा विचार कै.वि.स.पागे यांनी पूज्य विनोबा भावे यांना सांगितला, तेव्हा विनोबाजी म्हणाले, “पागे ही योजना तर फारच छान आहे. बापूंचे ग्राम स्वराजाचे स्वप्न साकार होणार असे दिसते. आता ही योजना ११ गावांपुरती न ठेवता ती राज्यव्यापी, राष्ट्रव्यापी चळवळ करा.”
रिझर्व बँक आणि जागतिक बँकेनेसुद्धा या योजनेतून साध्य होणाऱ्या कार्याबद्दल गौरवोद्गार काढलेले आहेत. २१ डिसेंबर २००४ रोजी संसदेमध्ये ’द नॅशनल रुरल एम्पॉलयमेंट गॅरंटी विधेयक, २००४ मांडण्यात आले. केंद्र सरकारने या विधेयकाचा उद्देश व हेतू वाक्यामध्ये कै.वि.स.पागे यांच्या मूळ कल्पनेतून साकार झालेल्या महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या संदर्भात महाराष्ट्राने या बाबतीत सर्व प्रथम केलेल्या कार्याचा उल्लेख करुन महाराष्ट्र हे अशा स्वरुपाच्या कायद्यांचे मार्गदर्शक राज्य असल्याचे नमूद केले आहे.
विधान परिषदेच्या सभापती पदावरुन १९७८ साली निवृत्त झाल्यानंतर पागे यांनी त्यांच्या निधनापर्यंत निवृत्ती वेतनाशिवाय शासनाच्या विविध समित्यांवर पदाधिकारी म्हणून काम केल्याबद्दल केवळ एक रुपया नाममात्र वेतन घेऊन देशासमोर एक मोठा आदर्श निर्माण केला. दिनांक १६ मार्च १९९० रोजी त्यांचे निधन झाले. कै. वि. स. पागे यांनी विधिमंडळाच्या विविध विषयांवर अत्यंत मूलगामी व दिशादर्शक विचार मांडले. त्यांच्या विधान मंडळातील निवडक भाषणांचा व लेखांचा संग्रह महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातर्फे प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यांच्या नावाने विधीमंडळात अध्यासन सुरू करण्यात आले असून त्या मार्फत विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करण्यात येतात.
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राज्याच्याच नव्हे, तर आज देशाच्या विकास कामांना एक निश्चित दिशा दाखविण्याचे महान कार्य पांगेजींनी केले. त्यांच्या या कार्याबद्दल देश त्यांचा कायम ॠणी राहील. पागेजींच्या स्मृतींना विनम्र आदरांजली!