मनुष्य देहाला कर्माची फळे भोगावीच लागतात. हभप.शंकर महाराज शेवाळे

33

🔹स्व.माणिकराव गुट्टे यांचा पुण्यस्मरण सोहळा संपन्न

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.7मे):-जन्माला आलेल्या कोणत्याही मनुष्य देहाला मागच्या जन्मीं केलेल्या कर्माची फळे भोगावी लागतात. संत सानिध्यात राहून मनुष्य जीवनाचे कल्याण होते. चांगले वाईट सगळं इथेच आहे. त्यामुळे जसे कर्म तसे फळ मिळते, असा उपदेश हभप.ॲड.शंकर महाराज शेवाळे यांनी केला.

शहरातील कापसे गार्डन येथे स्थानिक आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे वडील कै.माणिकराव गुट्टे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रमात कीर्तन सेवा करताना ते बोलत होते. यावेळी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे, युवा उद्योजक सुनिल भैय्या गुट्टे, स्वातीताई गुट्टे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आध्यात्मिक क्षेत्रात वारकरी संप्रदायाची ओळख फार मोठी आहे. संताची शिकवण – मानवतावादी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी असली तरीही आज समाज व्यसनाधीनतेने ग्रासला आहे. व्यसनामुळे हजारो लोकांचे संसार मोडकळीस आले आहेत. म्हणून तरुणांनी व्यसन करण्यापूर्वी कुटुंबाचा विचार करावा, असेही मत हभप.ॲड.शेवाळे यांनी उपदेशपर कीर्तनात मांडले.

कार्यक्रमाचे औचित्य साधून बोलताना प्रसिद्ध कीर्तनकार हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर म्हणाले की, देवाचा बाह्य रंग न पाहता अंतरंग ओळखला पाहिजे. देवावर प्रेम केलात तर देव आपल्याकडे धावून येईल. संतांच्या शिकवणीतून भगवंतांची जाणीव होते. भक्ती मार्गातून जीवन समृद्ध होते.

सकाळी १२ ते ०२ या वेळेत झालेल्या कीर्तन समाप्ती नंतर उपस्थितांनी भोजनाचा लाभ घेतला. कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिक, महिला, आबालवृद्ध यांच्यासह राष्ट्रीय समाज पक्ष व आ.डॉ.रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे सर्व पदधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*संतांनी जगण्याचा मार्ग दाखविला – आ.डॉ.गुट्टे*
मनुष्य जीवनाच्या उद्धारासाठी संत साहित्याचे विचार मार्गदर्शक आहेत. अभंगामधून आपणास जगण्याची दृष्टी दिली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आई-वडिलांची सेवा करावी. त्यामुळे मनाला समाधान मिळते. तरुणांनी आपले जीवन देश सेवेसाठी समर्पित करावे. कारण, संतांनी जगण्याचा मार्ग दाखविला आहे, असे प्रतिपादन आ.डॉ.गुट्टे यांनी केले.