बाबा हरदेवसिंहजी: मानवतेचे पुजारी!

67

(निरंकारी बाबा हरदेवसिंहजी महाराज पुण्यस्मरण व निरंकारी समर्पण दिन)

“जीवन के हैं दो किनारे एक जन्म हैं एक मरण।
जो जन्मा हैं वो मरता हैं धनवंता हैं या निर्धन।
जन्म मरण के बीच का जीवन श्रेष्ठ हैं अनमोल हैं।
कहें ‘हरदेव’ कि गुरु ज्ञान से पड़ता इसका मोल हैं।”
[ पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.१६०]

आजच्या बहुढंगी, बहुरंगी दुनियेत स्वतःला ईश्वरी अवतार मानून आपले बाजारमूल्य वाढविण्याची स्पर्धा भक्तीपंथात जोमाने फोफावलेली दिसून येत आहे. या स्पर्धेतूनच अनेक पाखंडी कलंकित होत आहेत, शांती, संयम आणि औदार्य अशा त्रिगुणांच्या अनोख्या संगमामुळे संतशिरोमणी हृदयसम्माट सत्यसम्राट बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी लाखो अनुयायी जोडले आणि मानवतेची पूजा करणारा निरंकारी पंथ जगभर पसरविला. संत निरंकारी मिशनमध्ये जगातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदू लागले, कारण कोणाच्याही व्यक्तिगत जीवनशैली किंवा श्रद्धा भावनांना धक्का न लावता केवळ मानवतेच्या आधारावर आपुलकी, प्रेम, सद्भावना, सामंजस्याने व एकोप्याने आनंदाने जीवन जगायला शिकवणारी विचारधारा युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजींनी जोपासली व वृद्धिंगत केली. बाबाजी यथार्थ व यशस्वी मानवी जीवन जगण्याची कला शिकवत असत. त्यांनी आध्यात्मिक व भौतिक जीवनाशी अशी सुंदर सांगड घातली, त्यामुळेच जगभर ही विचारधारा लोकप्रिय बनली व हवी हवीसी वाटू लागली. कारण संतोक्तीची प्रचिती त्यांच्या पावन सान्निध्याने आली. जगतगुरू जगतवंद्य संतश्रेष्ठ तुकारामजी महाराजांनी समजाविले होते-

“मागे पुढे ब्रह्म दाटे! म्हणती देव आहे कोठे!!
मृगा नाभिचा परिमळ! व्यर्थ फिरे रानोमाळ!!”
गुरुकृपा झाल्यावरी! ब्रह्म सृष्टी दिसे सारी!!
तुका म्हणे ऐसी भ्रांती! देव असता नाही म्हणती!!

संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या सामाजिक व आर्थिक परिषदेवर संत निरंकारी मंडळाला सल्लागाराचा दर्जा दिला. सन २०१३मध्ये बाबाजींना गांधी ग्लोबल फॅमिलीच्या वतीने प्रतिष्ठित महात्मा गांधी सेवा मेडलने सन्मानित करण्यात आले, तर सन २०१४मध्ये गांधी शांती पुरस्कार प्रदान करण्यात आला. दि.५ ऑगस्ट २०१५ रोजी इंग्लंडमध्ये स्वेच्छा सामाजिक सेवेसाठी देण्यात येणाऱ्या सर्वोच्च क्वीन्स गोल्डन ज्युबिली अ‍ॅवॉर्डने बाबाजींना सन्मानित करण्यात आले. कारण माणसाशी माणसे जोडून मानवता धर्म स्थापित केला. संतश्रेष्ठ गोस्वामी तुलसिदासजींच्या वाणीतून प्रत्यय आला-

“सुनहु देव सचराचर स्वामी।
प्रनतपाल उर अन्तरजामी।।
उर कुछ प्रथम वासना रही।
प्रभु पद प्रीति सरित सो बही।।”
(पवित्र रामचरित मानस: ५-४९-३)

(अर्थ: बिभिषणजीने कहा, हे देव, हे चराचर जगत के स्वामी! हे शरणागत के रक्षक! हे सबके हृदय के भीतर के जानने वाले! सुनिए, मेरे हृदय में पहले कुछ वासनाएँ थी। वह प्रभु के चरणों की प्रीतिरूप नदी में बह गईं।)

सत्यसम्राट हृदयसम्राट बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचा जन्म दि.२३ फेब्रुवारी १९५४ रोजी दिल्ली येथे झाला. सन १९७१मध्ये त्यांनी निरंकारी सेवादलामध्ये प्राथमिक सदस्य म्हणून प्रवेश केला आणि सेवादलाची सुती खाकी वर्दी घालून सेवेचा आनंद लुटला. सन १९७५ मध्ये त्यांनी निरंकारी युथ फोरमची स्थापना केली. या फोरमचे लक्ष्य होते- साधे व सदाचारी जीवन जगणे, प्रेम व भक्तिपूर्ण सेवा, अनावश्यक उधळपट्टीला आळा आणि नशाबंदी साधणे. दि.२४ एप्रिल १९८० रोजी कट्टरपंथी धर्माधांनी मिशनचे तत्कालीन प्रमुख, सद्गुरू बाबा गुरुबचन सिंहजी यांच्यावर निशाना साधून शहीद केले. तरुण बाबा हरदेवांनी शरीररुपातील सद्गुरु व पिताही गमावला होता. निरंकारी मिशनच्या प्रत्येक अनुयायाचे धैर्य, संयम आणि सहनशीलता पणाला लागावी असा तो क्षण होता. दि.२७ एप्रिल १९८० रोजी बाबा हरदेवसिंहजींना मिशनचे सांप्रत सद्गुरू व प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. शांती, प्रेम आणि विश्वबंधुत्व स्थापन करण्याचे आश्वासन कृतीत उतरविण्यासाठी बाबा हरदेवसिंहजी महाराज यांनी देश-विदेशांमध्ये विस्तृत प्रचार यात्रा आयोजित केल्या. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी मिशन मानवता, विश्वबंधुत्व, प्रेम, शांती, समता, अहिंसा अशी महान ध्येये गाठणारी आध्यात्मिक चळवळ बनून नावारुपाला आली आहे. सर्व धर्मग्रंथांचे अमूल्य सारामृत त्यातून प्रवाहित केले. गुरु नानकदेवजींचे अनमोल वचन सार्थक वाटतात-

“गुरु किरपा जेहि नर पैं कीन्ही तिन यह जुगति पिछानी!
नानक लीन भयो गोबिंद सों ज्यो पानी संग पानी!!”
[पवित्र भजन संग्रह- गीता प्रेस: पृ.सं.१८०]

सन २०१६ मधील जून महिन्याच्या शेवटी होऊ घातलेल्या द्वितीय निरंकारी आंतरराष्ट्रीय संत समागमाच्या पूर्वतयारीची पाहणी करण्याच्या उद्देशाने ते कॅनडाच्या कल्याण यात्रेवर असतानाच दि.१३ मे २०१६ रोजी त्यांची गाडी अपघातग्रस्त झाली आणि त्यातच मानवतेचे कार्य करत असतानाच त्यांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला. धन्य धन्य ते हृदयसम्राट बाबा हरदेवसिंहजी महाराज आणि त्यांचे अहर्निश मानवोत्कर्षाचे आध्यात्मिक कार्ये! मिशनमधील त्यांच्या भरीव कार्याची आठवण म्हणून त्यांचा स्मृतिदिन हा मिशनतर्फे ‘निरंकारी समर्पण दिवस’ म्हणून पाळला जात आहे.

“मैं नही तो कुछ न होगा सोचना नादानी हैं।
सारे सिलसिले हैं मुझसे ये कहना बेमानी हैं।
ऐ मिट्टी के पुतले इतना क्यों करता अभिमान तू।
कहे ‘हरदेव’ इस दुनिया में दो दिन का मेहमान तू।”
[पवित्र सम्पूर्ण हरदेव बाणी: पद क्र.२८४]

!! पुरोगामी संदेश परिवारातर्फे समर्पण दिनी हृदयसम्राट बाबा हरदेवसिंहजी महाराजांना कोटी कोटी दंडवत प्रणाम जी !!

✒️संतचरणरज:-श्रीकृष्णदास (बापू) निरंकारी.द्वारा- प.पू.गुरुदेव हरदेव कृपानिवास.मु. रामनगर वॉर्ड नं. २०, गडचिरोली.जि. गडचिरोली. फक्त व्हॉट्सॲप- ९४२३७१४८८३.