✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार (दि.21जुलै):-जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर कोविड-19 बाबत सविस्तर माहिती देणारी सुविधा जिल्हाधिकारी कार्यालयातील सूचना विज्ञान केंद्रातर्फे (एनआयसी) विकसीत करण्यात आली आहे. या सुविधेमुळे जिल्ह्यातील कोविडच्या स्थितीबाबत वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याच्या संकेतस्थळावर ‘कोविड-19 अपडेट’ या नावाने टॅब तयार करण्यात आला आहे. nandurbar.gov.in/covid-19-updates/ ही लिंक क्लिक केल्यास जिल्ह्यातील कोविडबाबत माहिती प्रदर्शित होते.

या अंतर्गत आरोग्यदर्शक नकाशे,कोविड-19 डॅशबोर्ड, महत्वाचे आदेश आणि महत्वाचे दूरध्वनी क्रमांक व विविध सुविधांसाठी लिंक्स देण्यात आल्या आहेत. ‘आरोग्यदर्शक मॅप’ अंतर्गत उपलब्ध बेड्सची माहिती, प्रतिबंधीत क्षेत्र आणि रुग्णालयांची मा‍हिती त्यांच्या लोकेशनसह प्रदर्शित केली जाते. सबंधित लोकेशनजवळ त्या संदर्भातील सविस्तर माहिती देण्यात येते. प्रतिबंधीत क्षेत्रांची संख्या, सद्यस्थितीत ॲक्टीव्ह क्षेत्र आदीबाबतही सविस्तर माहिती या सुविधेमुळे उपलब्ध होणार आहे.

कोविड-19 डॅशबोर्डला क्लिक केल्यास एकूण रुग्णसंख्या, उपचार घेत असलेले रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू आदी माहिती आलेखासह प्रदर्शित करण्यात आली आहे. कोरोना चाचणीबाबत माहितीदेखील डॅशबोर्डच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या संदर्भातील आकडेवारीदेखील सोप्या पद्धतीने आणि तालुकानिहाय देण्यात आली असल्याने नागरिकांना आपल्या भागातील माहिती कळू शकेल.

जिल्हा प्रशासनातर्फे निर्गमित करण्यात आलेले विविध आदेश आणि कोविड संदर्भातील महत्वाच्या दूरध्वनी क्रमांकाची माहितीदेखील या एकाच ठिकाणी प्राप्त होणार आहे. आवश्यकतेनुसार यात सुधारणादेखील करण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे नागरिकांना जिल्ह्यातील कोविड संदर्भातील वस्तुस्थिती कळू शकेल.

ही सुविधा विकसीत करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी धमेंद्र जैन, एनआयसीचे सुरेंद्र पाटील, सुमीत भावसार आणि निरज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. नागरिकांनी ही माहिती जाणून घेण्यासाठी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

कोरोना ब्रेकिंग, महाराष्ट्र, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED