ग्लोबल वॉर्मिंग आणि जागतिक हवामान खात्याने भाकीत

26

यावर्षीचा उन्हाळा हा आजवरचा सर्वात कडक उन्हाळा समजला जात आहे. यावर्षी सर्वच शहरांचे तापमान ४० अंशाच्या पुढे गेले आहे काही शहरांचे तापमान तर ४२ ते ४५ अंशाच्या घरात आहे. वाढत्या तापमानाने देशातील जनता हैराण झाली आहे. उष्णता वाढल्याने उष्माघात होऊन अनेकांचे प्राणही गेले आहेत. केवळ आपल्या देशातच नाही तर संपूर्ण जगात हीच परिस्थिती आहे याला कारण आहे ते म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीवरील तापमानात होणारी वाढ. जेंव्हा पृथ्वीवरील सरासरी तापमान मर्यादित पातळीपेक्षा जास्त वाढते तेंव्हा ग्लोबल वॉर्मिंग ही समस्या उदभवते. ग्लोबल वॉर्मिंगची ही समस्या दरवर्षी वाढत जाईल असे भाकीत जागतिक हवामान खात्याच्या संशोधकांनी व्यक्त केले आहे. जागतिक हवामान खाते ( डब्लूएमओ ) ही संयुक्त राष्ट्र संघटनेची एक संघटना असून ती जागतिक हवामानावर संशोधन करते.

या संस्थेच्या संशोधकांनी १८५० ते १९०० या ५० वर्षाच्या कालखंडातील तापमामाच्या सरासरीचा आणि त्यानंतरच्या कालखंडाच्या सरासरी तापमानाचा तुलनात्मक अभ्यास केला. १८५० ते १९०० या कालखंडात औद्योगिकीकरणास सुरवात झाली नव्हती त्यामुळे कोळसा, गॅस आणि तेल यांच्या वापरास सुरवात झाली नव्हती. मात्र त्यानंतरच्या कालखंडात औद्योगिकीकरणास सुरवात झाली आणि जेंव्हा पासून औद्योगिकीकरणास सुरवात झाली तेंव्हापासून पृथ्वीच्या तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाल्याचा निष्कर्ष या संस्थेच्या संशोधकांनी काढला आहे. औद्योगिकरणास सुरवात झाल्यापासून म्हणजेच विसाव्या शतकाच्या सुरवातीपासून पृथ्वीचे तापमान वाढण्यास सुरवात झाली असून यापुढे जागतिक तापमान अधिक वेगाने वाढणार असल्याचा निष्कर्ष या संशोधकांनी काढला आहे. या निष्कर्षानुसार आगामी चार वर्षांत म्हणजे २०२७ पर्यंत म्हणजे पृथ्वीचे तापमान दीड डिग्रीने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही शक्यता ६६ टक्के संशोधकांनी वर्तवली आहे.

जागतिक हवामान खात्याने वर्तवलेले हे भाकीत जर खरे ठरले तर त्याचे मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतील. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे तापमान वाढत जाणार असल्याने युरोप, अमेरिकासह आशिया खंडात उष्णतेच्या लाटा येण्याची लाटा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळांची तीव्रता वाढेल. वनव्यांचे प्रमाण वाढेल. ज्या भागात पावसाची गरज आहे त्या भागात पाऊस न पडता अन्य भागात पाऊस पडेल. पावसाचे प्रमाण कमी होईल. अतिउष्णतेमुळे हिमनद्या वितळतील. त्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ होईल परिणामी पूर येतील. वाढत्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे जंगल प्रजातींवर परिणाम होईल. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जंगलांना आगी लागतील या आगीत अनेक पशुपक्षी व प्राणी मरण पावतील एकूणच ग्लोबल वॉर्मिंगचा फटका केवळ मानवजातीलाच नाही तर संपूर्ण जीवसृष्टीलाच बसेल. अर्थात याला आपणच म्हणजे मानवच जबाबदार आहे. मानवाने निसर्गात हस्तक्षेप केला जंगलतोड करून सिमेंटची जंगले उभी केली. औद्योगिकरणाच्या नावाखाली कार्बन उत्सर्जन वाढवले. वाहतुकीच्या नावाखाली प्रदूषण वाढवले.

अर्थात अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही आपण ग्लोबल वॉर्मिंगला थोपवू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे ग्रीनहऊस वायूंचे उत्पादन कमी करणे. जीवष्म इंधनाऐवजी इतर इंधन स्रोत वापरणे. झाडे लावून ती जगवली पाहीजेत. सर्वात महत्वाचे म्हणजे निसर्गात मानवाने केलेला हस्तक्षेप थांबवला पाहिजे. विकासाच्या नावाखाली होणारा पर्यावरणाचा ऱ्हास रोखला पाहिजे या आणि अशाप्रकारच्या उपाययोजना करून आपण तापमानवाढ नियंत्रणात आणू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग रोखण्याची जबाबदारी मानवाची आहे. ही समस्या केवळ एका देशाची किंवा एक प्रदेशाची नसून ती जागतिक समस्या आहे म्हणून ग्लोबल वॉर्मिंग रोखण्यासाठी जागतिक समुदायाने देखील कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.

✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)मो:-९९२२५४६२९५