जादुटोण्याच्या संशयावर अपहरण करून वृद्धाचा खून

    41

    ✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    नागपूर(दि.22जुलै):-जादुटोणा केल्याच्या संशयातून जामठ्यातील ६५ वर्षीय वृद्धाचे अपहरण करून त्याचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी हिंगणघाट तालुक्यातील आजनगाव येथे उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून एका मारेकऱ्याला अटक केली आहे. रामभाऊ किसन नेवारे वय ६५ रा. जामठा,असे मृतकाचे, तर सागर येठी असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. त्याचे साथीदार फरार आहेत.
    सागर हा नेहमी आजारी राहतो. रामभाऊ यांनी जादुटोणा केल्याने प्रकृती खालावल्याचा संशय सागर याला आला. त्यामुळे त्याने अनेकदा रामभाऊ यांच्यासोबत वाद घातला. सोमवारी सकाळी रामभाऊ म्हशी चारण्यासाठी जामठा टी पॉइन्ट येथे गेले. सायंकाळ झाल्यानंतरही ते घरी परतले नाही. नातेवाइकांनी शोध घेतला. कारमधून काही युवकांनी त्यांना नेल्याचे रामभाऊ यांच्या नातेवाइकांना कळले. नातेवाइकांनी हिंगणा पोलिसांत तक्रार दिली. हिंगणा पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. दरम्यान, मंगळवारी सकाळी हिंगणघाट तालुक्यातील आजनगावर परिसरात एका वृद्धाचा मृतदेह आढळला. माहिती मिळताच पोलिस तेथे पोहोचले. शस्त्रांनी वार करून व दगडाने डोके ठेचून वृद्धाचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी मृतकाच्या खिश्यात चिठ्ठी आढळली. त्यावरून मृतकाची ओळख पडली. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सागर याला अटक केली. पोलिस त्याच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.