
✒️नागपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)
नागपूर(दि.22जुलै):-रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला आरपीएफने गजाआड करून त्याच्याजवळून ३४ हजार ८५० रुपयांची ३१ ई- तिकिटे जप्त केली. दिनेश पाल (वय ४०) असे आरोपीचे नाव आहे.
धंतोलीतील ‘ग्लोबल टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स’मधून तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची गुप्त माहिती आरपीएफला मिळाली होती. त्यामुळे आरपीएफचे वरिष्ठ मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे याच्या मार्गदर्शनात विशेष पथक गठित करण्यात आले. या पथकाने वर्धा मार्गावरील ‘ग्लोबल टूर्स’च्या कार्यालयात धाड घातली. त्यावेळी तिथे रमेश पाल हजर होता. त्याला रेल्वे ई-तिकिटांच्या काळ्या बाजाराविषयी विचारले असता आपल्याला याबद्दल काही माहिती नसल्याचे त्याने सांगितले. त्याचप्रमाणे आपल्याकडे रेल्वे तिकिटांसाठीचा आयआरसीटीसीचा परवाना नसल्याचेही सांगितले. त्यामुळे त्याला चौकशीसाठी आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले. तेथे तज्ज्ञांनी त्याच्या मोबाइलची तपासणी केली असता त्याने वेगवेगळ्या वैयक्तिक आयडीद्वारे रेल्वेची ३१ तिकटे काढल्याचे सिद्ध झाले. सखोल चौकशीत, ‘आपण अशाप्रकारे तिकीट काढून ते अधिक पैसे घेऊन गरजूंना विकतो,’ अशी कबुली त्याने दिली. एका तिकिटामागे २०० ते ३०० रुपये अधिक घेत असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर त्याच्याजवळील तिकिटे व मोबाइल जप्त करण्यात आला. ही कारवाई धंतोली पोलिसांच्या सहकार्याने आरपीएफ निरीक्षक आर. आर. जेम्स यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक एस. पी. सिंह, महिला हेडकॉन्स्टेबल जे. जे. इंगळे, कॉन्स्टेबल अश्विन पवार, अमित बारापात्रे यांनी केली.