महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना

27

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

चंद्रपूर(दि.2जून):- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील नागरीकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले जाते. आर्थिक वर्ष 2023-24 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान योजनेअंतर्गत 80 व बीज भांडवल योजनेअंतर्गत 80 असे एकूण 160 लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप तसेच जनरल प्रशिक्षण योजनेअंतर्गत 320 प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

अनुदान योजना: या योजनेची प्रकल्प मर्यादा रुपये 50 हजार पर्यंत असून त्यातील 40 हजार रुपयापर्यंतचे कर्ज बँकेमार्फत दिले जाते. तर रुपये 10 हजार पर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बॅंक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.

बीज भांडवल योजना: योजनेची प्रकल्प मर्यादा रुपये 5 लाख पर्यंत असून प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बिज भांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. यातील 75 टक्के पर्यंतचे कर्ज बँकमार्फत दिले जाते, ज्यावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

प्रशिक्षण योजना : अनुसूचित जातीतील लाभधारकांना व्यवसायासाठी लागणारे तांत्रिक कौशल्य प्राप्त करण्यासाठी व संबंधित तांत्रिक व्यवसाय सुरू करण्याकरीता विविध व्यावसायिक ट्रेडचे शासनमान्य संस्थामार्फत 3 महिने मोफत प्रशिक्षण देण्यात येते. प्रशिक्षणार्थींना एक हजार रुपये प्रति महिना विद्यावेतन देण्यात येते.

योजनांच्या अधिक माहितीकरीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधावा.