चिमुर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढणार -माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम

44

✒️सुयोग सुरेश डांगे(विशेष प्रतिनिधी)मो:-८६०५५९२८३०

चिमूर(8 जून):- गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला कामास प्रारंभ करण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठीकडून मिळाल्या असून या क्षेत्रातून आपणच निवडणूक लढणार असल्याची घोषणा माजी राज्यमंत्री तथा आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी चिमुर विधानसभा क्षेत्रातील राजकीयदृष्टया अत्यंत दक्ष असलेल्या भिसी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.

महाविकास आघाडीत झालेल्या बैठकीत चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीची उमेदवारी राहणार असल्याचे ठरले असून आपल्याला पक्षश्रेष्ठीकडुन काम करण्याच्या सूचना मिळाल्या. त्यानुसार ७ जुन रोजी चिमूर व ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचा दौरा करीत आहोत, कार्यकर्त्याच्या भावना व जोश बघुन या क्षेत्रातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचाच विजय होईल असा आशावाद आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भिसी येथे आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यानंतर आयोजीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

चिमुर-गडचिरोली मतदार संघात आजपर्यंत कांग्रेसलाच उमेदवारी होती. मात्र मागील दोन निवडणुकीत भाजपचे अशोक नेते यांनी काँग्रेस उमेदवाराला हरवून निवडून आले. आगामी लोकसभा निवडणुक भारतीय जनता पाटीचा पराजय करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणुक लढणार आहो, आपल्याला पराजीत करण्याकरीता विरोधकांकडे उमेदवारच नसल्याचे त्यांनी सांगितले.

गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, अहेरी, आरमोरी विधानसभा क्षेत्र हे आपल्या स्व-जिल्हयातील असुन या क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रभाव आहे. गोंदीया जिल्हयातील आमगांव विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात कार्यकर्त्यांचे माध्यमातून रणनिती आखण्यात येईल. चंद्रपूर जिल्हयातील ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात कॉंसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलेली विकास कामे ही महाविकास आघाडीची जमेची बाजु आहे. आमदार विजय वडेट्टीवार हे आपल्या विजयासाठी मेहनत घेतील असा पूर्ण विश्वास आहे.

चिमूर विधानसभा क्षेत्रात भाजप आमदार बंटी भांगडीया यांचा जनाधार घसरला असल्याचे अनेक गोपनीय अहवाल तयार झाले आहेत. सोबतच विद्यमान खासदार अशोक नेते यांचा जनसंपर्क कमी असल्यामुळे जनतेच्या नजरेतुन ते उतरले आहेत त्यांनी आजपर्यंत जनतेच्या लक्षात राहील असे कुठलेच विकास कामे केली नाहीत. त्यामुळे आपल्याला विजयापासून कोणीच रोखू शकत नसल्याचा दावा आमदार आत्राम यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेला आमदार धर्मरावबाबा आत्राम यांचेसोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य, जेष्ठ नेते सहकार महर्षी अँड. बाबासाहेब बासाडे, हिराचंद बोरकुटे, जिल्हा सरचिटणीस अरविंद रेवतकर, जिल्हा सचिव श्रिनिवास शेरकी, चिमूर तालुका अध्यक्ष राजु मुरकुटे, अविशा रोकडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख श्रीहरी सातपुते यांचेसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान भिसी येथे आयोजीत केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कार्यकर्त्यासह सामान्य जनतेची उपस्थिती लक्षवेधक होती.