विदर्भात कोरोना रुग्णसंख्या दहा हजारांपार

31

✒️नागपुर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

नागपूर(दि.23जुलै):-विदर्भात सातत्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येने बुधवारी दहा हजारांचा टप्पा ओलांडला. २७५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिलासादायक बाब म्हणजे ६ हजार ८०८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

विदर्भातील पहिला करोनाबाधित नागपुरात ११ मार्च रोजी सापडला. त्यानंतर हळूहळू रुग्णसंख्या वाढत गेली. नागपूरपुरता मर्यादित असलेला करोना यवतमाळ आणि नंतर अकोल्यात पसरला. अनेक दिवस एकही रुग्ण नसलेल्या जिल्ह्यांतील रुग्णसंख्येने शंभर, दोनशे, पाचशेचे आकडे पार केले. बुधवारपर्यंतचा विचार करता नागपुरात सर्वाधिक ३,२९३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल अकोल्यात २,२४६, अमरावती १,४४५ तर बुलडाण्यात ८३४ रुग्णांची नोंद आहे. सर्वात कमी १०८ रुग्ण वर्धा जिल्ह्यात आढळले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात माओवादविरोधी अभियानात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या एसआरपीएफ आणि सीआरपीएफचे सुमारे २८६ जवान करोनाबाधित आढळले आहेत. हे चिंताजनक आकडे समोर येत असतानाच चंद्रपूर जिल्ह्याने करोनाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांची शून्य संख्या कायम राखण्यात यश मिळविले आहे.

विदर्भ आकडे:-

एकूण रुग्णसंख्या : १०,२०२

एकूण बरे झालेले : ६,८०८

एकूण मृत्यू : २७५

विदर्भातील करोनाचा लेखाजोखा

जिल्हा पॉझिटिव्ह बरे झालेले मृत्यू

नागपूर : ३,२९३…………. २,११३……………… ६३

भंडारा : २०८ ……………..१६४…………….. ०२

गोंदिया : २३५……………..२११……………..०३

गडचिरोली : ४२४……………..१७३…………….. ०१

चंद्रपूर : ३२४……………..१९५……………..००

वर्धा : १०८…………….५४…………….. ०४

यवतमाळ : ६५३………………४४२……………..२४

अमरावती : १,४४५……………..९८६……………..४१

अकोला : २,२४६…………….१,७९८…………….. १०४

बुलडाणा : ८३४………………४३७……………..२४

वाशीम : ४३२ …………….. २३५…………….. ०९

एकूण : १०,२०२……………. ६,८०८…………….२७५