राम मंदिराच्या भूमिपूजनाचे अखेर ठरले!

32

🔸५ ऑगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन; सर्व मुख्यमंत्र्यांना निमंत्रण

अयोध्या(दि 23जुलै):-अयोध्येत भव्य दिव्य असे राम मंदिर उभारले जाणार असून ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमादरम्यान १५० निमंत्रितांसह एकूण २०० जण उपस्थित राहणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टचे विश्वस्त स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली. तसेच या कार्यक्रमाला सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ५ ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन केले जाणार आहे. सोशल डिस्टन्सिंगचे भानही यादरम्यान ठेवण्यात येईल. या कार्यक्रमात १५० निमंत्रितांसह एकूण २०० पेक्षा अधिक जण सहभागी होणार नाहीत,ह्व अशी माहितीही स्वामी गोविंद देवगिरी यांनी दिली.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठी अनेकवेळा भूमिका मांडली आहे. त्यांचे कार्य यामध्ये खूप मोठे असल्याने आणि त्यांचा वारसा पुढे घेऊन जाणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले पाहिजे. तसेच या भूमिपूजनामध्ये प्रत्येकाने घरी किंवा मंदिरात जाऊन पूजा करून सहभागी व्हावे, असंही स्वामी गोविंद देवगिरी म्हणाले.

गोविंदगिरी महाराज म्हणाले, राम मंदिराची उभारणी गुजरातमधली सोनपुरा कुटुंब करणार आहे. याचं कुटुंबानं प्रसिद्ध सोमनाथाचे मंदिर, अंबाजींच्या मंदिराची उभारणी केली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या स्वामीनारायण मंदिराची उभारणीदेखील त्यांनी केली आहे. लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो (एलअँडटी) कंपनी त्यांच्यासोबत सहकार्य करुन या मंदिराची उभारणी करणार आहे.

राम मंदिराची उंची ठरल्याप्रमाणे १६१ फूट असणार आहे. हे मंदिर दोन मजली असेल या दोन मजल्यांच्यावर मंदिराचा शिखर असेल. संसद भवन ज्या प्रकारे एका उंच पायावर उभारण्यात आले आहे तशाच पद्धतीने उंच पाया घेऊन त्यावर १६१ फूटांचे मंदिराचे बांधकाम होणार आहे. अशोक सिंघल यांच्या उपस्थितीत सर्व चर्चा करुन सर्व प्रमुख संतांनी मिळून जो आराखडा ठरवला होता. तेच प्रारुप आबाधित ठेवलं आहे, त्यात शक्य तेवढी भव्यता आणावी यासाठी त्यात २० फूट उंची वाढवून एक मजला वाढवण्यात आला आहे. तसेच अधिक तीन शिखरे करण्याची योजना होती ती आता पाच शिखरांची झाली आहे, असंही यावेळी गोविंदगिरी महाराजांनी सांगितले.