जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांचे सर्वेक्षण पूर्ण – जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड

14

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.24जुलै):-सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या संदर्भात केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार विभागाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातील आंतरराज्य स्थलांतरीत कामगारांची माहिती सर्वेक्षणाद्वारे संकलीत करण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार 36 हजार 795 कामगार परराज्यातून जिल्ह्यात परतले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी बैठक घेऊन सर्वेक्षण तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार तीन स्तरावर ही माहिती संकलीत करण्यात आली. जिल्हा उद्योग केंद्रातर्फे नोंदणीकृत आस्थापनांमधील कामगारांची माहिती एकत्रित करण्यात आली. तर नगरपालिका आणि नगरपंचायत स्तरावर शहरातील व पंचायत समिती स्तरावर ग्रामीण भागातील माहिती संकलीत करण्यात आली.

सर्व माहितीचे एकत्रित संकलन जिल्हाधिकारी कार्यालय स्तरावर करण्यात आले. त्यानुसार महाराष्ट्रातून परराज्यात गेलेल्या तथापि आता परत महाराष्ट्रात आलेल्या कामगारांची संख्या 36 हजार 795 तर रोजगारासाठी परराज्यातून महाराष्ट्रात आलेल्या व परराज्यात न जाता लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातच राहिलेल्या कामगारांची संख्या 374 आहे.

महाराष्ट्रात आलेल्या कामगारापैकी अक्कलकुवा तालुक्यातील 3590, अक्राणी 5973, नंदुरबार 8256, नवापूर 3823, शहादा 9964 आणि तळोदा तालुक्यातील 5189 कामगार आहेत. तर लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रातच राहिलेले अक्कलकुवा तालुक्यातील 29, नंदुरबार 131, नवापूर 138 आणि शहादा तालुक्यातील 76 परराज्यातील कामगार आहेत.

सर्वेक्षणासाठी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी, जि.प. शाळेतील शिक्षक आदींनी सहभाग घेतला. सर्वेक्षणात कामगाराचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, बँक खात्याची माहिती आदी विविध 30 मुद्यांची माहिती संकलीत करण्यात आली. जिल्ह्यात अत्यंत वेगाने हे काम पूर्ण करण्यात आले. सर्वेक्षणातून प्राप्त माहिती असंघटित कामगार विकास आयुक्तांना पाठविण्यात आली आहे.