श्रीजी रेसिडेन्सी आणि आदर्श लॉजला क्वॉरंटाईन रुमसाठी मान्यता

10

✒️मुज़म्मिल हुसैन(नंदुरबार,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9763127223

नंदुरबार(दि.24जुलै):- शहरातील श्रीजी रेसिडेन्सी लॉजमधील 20 खोल्या आणि आदर्श लॉजमधील 15 खोल्या स्वखर्चाने लॉज क्वॉरंटाईन होण्यास तयार असलेल्या रुग्णांसाठी क्वॉरंटाईन रुम म्हणून देण्यास सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी मान्यता दिली आहे.

क्वॉरंटाईन रुम म्हणून देण्यापूर्वी खोली, इमारत, जिना निर्जंतुकीकरण व साफसफाई करण्याची जबाबदारी मालकाची राहील. सर्व खोल्यांमध्ये स्वच्छता कीट असणे आवश्यक आहे. स्वच्छता कर्मचारी व लॉजचे इतर कर्मचारी यांना सर्व सुरक्षा साधने पुरविण्याची जबाबदारी मालकाची राहील. लॉजमधून बाहेर पडणारे बायो मेडीकल वेस्टेज निर्धारीत ठिकाणी टाकण्यात यावेत.

वैद्यकीय अधिकारी संशयिताची तपासणी करण्यास आले असताना त्यांना विनाअट प्रवेश देणे आवश्यक राहील. श्रीजी लॉजसाठी प्रती दिवस एका दिवसासाठी साधी रुम 1500, डिलक्स रुम 2000 आणि सुट 2500 रुपये आणि आदर्श लॉजसाठी साधी रुम 1200 आणि डिलक्स रुम 1500 रुपये असे दर निश्चित करण्यात आले असून त्यापेक्षा अधिक दराची आकारणी करता येणार नाही. क्वॉरंटाईन रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यास संपुर्ण खोली सॅनिटाईज करण्यात यावी. तसेच पुढील दोन दिवसापर्यंत इतर कोणत्याही संशयितास खोली देण्यात येऊ नये.

लॉज क्वॉरंटाईन झालेल्या संशयित रुग्णाचे रुम भाडे व इतर खर्च संबंधितांकडून घेण्यात यावा. एका रुममध्ये एकाच व्यक्तीस ठेवता येईल. एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्यास दोन अधिक एक मूल याप्रकारे खोली देता येईल. क्वॉरंटाईन संशयितास प्रशासनाची लिखित परवानगी असल्याशिवाय लॉजचे बाहेर जाऊ देता येणार नाही. कोरोना संशयिताशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीला लॉजमध्ये रुम देता येणार नाही.

प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणालाही लॉजमध्ये प्रवेश देण्यात येणार नाही. 50 वर्षावरील व्यक्तींना लॉजमध्ये कामावर ठेवता येणार नाही. क्वॉरंटाईन व्यक्तीचा मुळ पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आदी माहिती ठेवणे आवश्यक राहील. हॉटेलमधील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करून घेणे बंधनकारक राहील. लॉजच्या बाहेर कोविड विलगीकरण कक्षाचा बोर्ड लावण्यात यावा. संशयित रुग्णाचा वावर असलेल्या ठिकाणी 24 तास सीसीटीव्ही कार्यरत राहील याची दक्षता घ्यावी. शासनाकडून वेळोवेळी आलेल्या सुचनांचे पालन करणे बंधनकारक राहील.

रुग्णास देखील प्रशासनाच्या परवानगीशिवाय लॉजबाहेर जाता येणार नाही. रुग्णास रुमची स्वच्छता स्वत: करावी लागेल व रुमचे भाडे व इतर खर्च स्वत: करावा लागेल. प्रशासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या सुचनांचे पालन करणे व वैद्यकीय अधिकाऱ्यास सहकार्य करणे बंधनकारक राहील.

लॉज विलगीकरण कक्षाचे नोडल अधिकारी म्हणून नगरपालिकेचे सहाय्यक नगर रचनाकार देवदत्त मरकड यांची नेमणूक करण्यात आली आहे. रुग्णास समस्या आल्यास त्यांनी वैद्यकीय पथक किंवा तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यास सुचीत करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.