*२५ जुलै २०२० संध्याकाळी ६.०० वाजता*

🔺चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३८१

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.25जुलै):- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ३८१ वर पोहोचली आहे. काल रात्री दहा पासून आज सकाळी दहा पर्यंत २४ तासात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ आहे. कालपर्यंत ३५९ असणारी ही संख्या आज वाढवून ३८१ झाली आहे. आत्तापर्यंत २२० नागरिक कोरोना आजारातून बरे झाले असून १६१ बाधितांवर सध्या जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात आज पुढे आलेल्या रुग्णांमध्ये गडचांदूर ७, भद्रावती २, ब्रह्मपुरी १०, चंद्रपूर महानगरपालिका ३ अशा एकूण बाधिताचा समावेश आहे.
यामध्ये गोपाल पुरी बालाजी वार्ड चंद्रपूर येथील ३९ वर्षीय महिला १४ वर्षीय मुलगा हे संपर्कातून पॉझिटिव्ह झाल्याचे पुढे आले आहे. यवतमाळ वरून प्रवास केलेल्या पॉझिटिव्हच्या संपर्कातील हे बाधित आहेत.
राज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीतील चंद्रपूर वरून भद्रावती येथे जैन मंदिर अलगीकरण कक्षात हलविण्यात आलेले २६ वर्षीय दोन जवान पुन्हा पॉझिटिव्ह आले आहेत. आत्तापर्यंत ३० राज्य राखीव दलाचे पोलिस जवान पॉझिटिव्ह ठरले आहे.
गडचांदूर येथील लक्ष्मी थेटर वार्ड नंबर चार या भागात एका पॉझिटिव्ह मुळे शेजारील पाच जण पॉझिटिव्ह झाले आहेत. यामध्ये एका महिलेसह चार पुरुषांचा समावेश आहे.
याशिवाय कोरपना नंदा फाटा परिसरातील २९ वर्षीय युवक वाराणसी येथून आल्यानंतर संस्थात्मक अलगीकरणात होता. या युवकाचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.
कोरपना तालुक्यातील पालगाव येथील चेन्नई येथून आलेल्या नागरिकाच्या संपर्कातील 53 वर्षीय महिला पॉझिटिव्ह आली आहे.
चंद्रपूर शहरातील जटपुरा वार्ड येथील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नोकरीवर असणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आल्यानंतर २४ जुलैला जिल्हा सामान्य रुग्णालयात या कर्मचाऱ्यांना भरती करण्यात आले होते.
याशिवाय आज पुढे आलेल्या अहवालामध्ये दहा रुग्ण ब्रह्मपुरी तालुक्यातील आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कुडेसाघली पो.हालदा येथील चेन्नईवरून परत आलेल्या दहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. हे १० कामगार कुडेसाघली येथील शाळेमध्ये संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED